
सुसाट महामार्गावर अपघाताचे सापळे
29254
नांदगाव ः येथील अनधिकृत मिडलकटवर झालेला अपघात.
सुसाट महामार्गावर अपघाताचे सापळे
मिडलकट कारणीभूत; तब्बल ५० ठिकाणी अनधिकृत उभारणी, रोज दुर्घटना
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १५ ः मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण ते झाराप या हद्दीपर्यंत तब्बल ५० ठिकाणी अनधिकृत मिडलकट ठेवले आहेत. याखेरीज तीव्र उतार आणि त्यानंतर येणारे वळण यामुळेही वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटत असून, महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. चौपदरीकरण पूर्णत्वास आले तरी अपघातांचे प्रमाण कायम राहिले आहे. महामार्गावर सरासरी प्रत्येक दिवसाला एक अपघाताची घटना घडत आहे.
राजापूर ते गोवा हद्दीपर्यंत चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे महामार्गावर १०० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने वाहने हाकली जात आहेत. यात अनधिकृत मिडलकटवरून अचानक एखादे वाहन समोर आले, तर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. याखेरीज ठिकठिकाणी तीव्र उतार आणि त्यानंतर वळणांचा रस्ता असल्यानेही वाहन चालकांचे नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना वाढत आहेत.
महामार्गावर सरासरी प्रत्येकी चार किलोमीटर अंतरावर मिडलकट ठेवला जातो. त्यानुसार सिंधुदुर्ग हद्दीतील ७३ किलोमीटरच्या मार्गावर अधिकृतपणे १८ ठिकाणी मिडलकट ठेवण्यात आले आहेत. तसेच या मिडलकटच्या ठिकाणी सिग्नल व्यवस्था, महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे; मात्र तब्बल ५० ठिकाणी अनधिकृत मिडलकट आहेत. हे मिडलकट अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहेत. या अनधिकृत मिडलकटवरून वाहने ओलांडताना आतापर्यंत दुचाकीवरील चार जणांचा बळीही गेला आहे. याखेरीज इतर वाहनेही अपघातग्रस्त होत आहेत; मात्र हे अनधिकृत मिडलकट बंद करण्याबाबत महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग ठेकेदार यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
महामार्गावर कणकवली शहरालगतच्या जानवली ते तळेरे या २३ किलोमीटर क्षेत्रात तब्बल २९ ठिकाणी अनधिकृत मिडलकट आहेत. तर कणकवली ते ओरोस या २३ किलोमीटर अंतरावर ६ अधिकृत आणि ८ अनधिकृत, ओरोस ते कुडाळ १५ किलोमीटर अंतरात ३ अधिकृत आणि १२ अनधिकृत, कुडाळ ते झाराप १२ किलोमीटर अंतरात ४ अधिकृत तर ६ अनधिकृत मिडलकट आहेत. हे सर्व अनधिकृत मिडलकट बंद करण्याबाबत महामार्ग विभागाचे पोलिस निरीक्षक अरुण जाधव यांनी महामार्ग प्राधिकरणला पत्रही दिले आहे; मात्र याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही.
................
चौकट
वळणांचा धोका कायम
महामार्ग चौपदरीकरण होताना वळणे हद्दपार होण्याची अपेक्षा होती; मात्र पूर्वीच्याच आराखड्यात काही फेरबदल करत नव्याने रस्ता तयार करण्यात आला. त्यामुळे महामार्गावर वळणांचा धोका कायम राहिला आहे. यात नांदगाव तिठा ते हुंबरट, साकेडी फाटा ते जानवली-बौद्धवाडी, खारेपाटण ते नडगिवे घाटी, हॉटेल नीलम्स कंट्रीसाईड ते जानवली ग्रामपंचायत हे टप्पे अपघातांचे ‘हॉटस्पॉट’ झाले आहेत. भरधाव येणाऱ्या चालकांचे या ठिकाणी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वारंवार अपघात होत आहेत. या ठिकाणी वाहनाचा वेग नियंत्रित राहावा, यासाठी रम्बलर्स गतिरोधक टाकावेत. तसेच वाहन गती कमी करण्याचे निर्देश लावावेत, अशी मागणी चालकांतून होत आहे.
-----------
कोट
महामार्गालगतची अतिक्रमणे तसेच अनधिकृत मिडलकट बंद करण्याबाबतची कार्यवाही सुरू केली होती; मात्र प्रत्येक मिडलकट बंद करताना तसेच अनधिकृत बांधकामे हटवताना प्रचंड विरोध होतो. राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडूनही मोठा दबाव आणला जातो. काम थांबविले जाते. त्यामुळे चौपदरीकरणाची अनेक कामे अजूनही पूर्ण करता आलेली नाहीत.
- महेश खाटी, शाखा अभियंता, महामार्ग प्राधिकरण.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68048 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..