सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाची घडी विस्कटली; ५१ कर्मचारी होणार कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाची घडी विस्कटली; ५१ कर्मचारी होणार कमी
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाची घडी विस्कटली; ५१ कर्मचारी होणार कमी

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाची घडी विस्कटली; ५१ कर्मचारी होणार कमी

sakal_logo
By

swt१६१०.jpg
29604
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याशी चर्चा करताना भाजप प्रदेश सचिव निलेश राणे. सोबत मेडिकल कॉलेज डीन डॉ. सत्यवान मोरे.

जिल्हा रुग्णालयाची घडी विस्कटली
भाजप शिष्टमंडळासमोर अधिकाऱ्यांची कबुली; शल्य चिकित्सक पदही होणार खालसा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १६ ः जिल्हा सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजला वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे येथील कर्मचारी मेडिकल कॉलेजला हस्तांतरित करण्यात येत असून एनएचएम अंतर्गत कार्यरत ५१ कर्मचारी कमी करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. काही दिवसांत जिल्हा शल्य चिकित्सक हे पद सुद्धा खालसा होणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली चर्चा करण्यास गेलेल्या भाजपच्या शिष्टमंडळाला दिली.
एनएचएम अंतर्गत १२ ते १३ वर्षे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करू नये, ही मागणी करण्यासाठी श्री. राणे व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आज जिल्हा जिल्हा रुग्णालयात भेट दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील, शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. सत्यवान मोरे यांच्यासह भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक संचालक बाबा परब, आनंद शिरवलकर, विनायक राणे, रुपेश कानडे, पप्या तवटे, दीपक नारकर, पांडुरंग मालवणकर, सुप्रिया वालावलकर उपस्थित होते.
यावेळी श्री. राणे यांनी एनएचएम कर्मचारी कमी का करता ? असा प्रश्न शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांना केला. यावर डॉ. पाटील म्हणाले की, हे रुग्णालय सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजला वर्ग केले आहे. परिणामी येथील सर्व अधिकारी व मालमत्ता ही मेडिकल कॉलेजकडे गेली आहे. परिणामी कंत्राटी स्वरूपात असलेला कर्मचारी कमी करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार ५१ कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येणार होते; परंतु यातील ३५ कर्मचारी अन्य योजनेत बसवून त्यांची सेवा कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे; मात्र उर्वरित कर्मचारी कमी केले जाणार आहेत, अशी माहिती दिली. जिल्हा रुग्णालय मेडिकल कॉलेजला वर्ग केल्याने जिल्हा शल्य चिकित्सक हे पद सुद्धा खालसा होणार असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.

चौकट
गरज पडल्यास संघर्ष उभारणार
तुम्ही आणखी दहा शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करा. त्याला आमचा आक्षेप नाही. आम्ही अभिनंदनच करतो; पण यामुळे गोरगरीबांना सेवा देणारी जिल्हा रुग्णालय आम्ही बंद करू देणार नाही. रुग्णाची हेळसांड होवून रुग्ण दगावल्यास प्रशासनाला जबाबदार धरणार आहे. तसेच एकही कर्मचारी कमी करू देणार नाही. तसे झाल्यास आम्हाला संघर्ष करावा लागेल. वेळ पडल्यास कॉलर पकडावी लागेल, असा इशारा यावेळी निलेश राणे यांनी दिला.

चौकट
जिल्हा रुग्णालयाचा दर्जा स्वतंत्र रहावा
जिल्हा रुग्णालय बंद करण्याचा घाट घातला आहे; परंतु या जिल्हा रुग्णालय अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत. त्यांचे काय करणार ? त्यांच्यावर नियंत्रण कोणाचे राहणार ? जिल्हा रुग्णालयात गरीबांना मिळणाऱ्या सर्व सेवा मेडिकल कॉलेज देणार का ? असे प्रश्न भाजप ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी उपस्थित करीत जिल्हा रुग्णालयाचा दर्जा स्वतंत्र राखून मेडिकल कॉलेज सुरू करावे, अशी मागणी केली.

कोट
शासकीय मेडिकल कॉलेजला जिल्हा रुग्णालय वर्ग करून मेडिकल कॉलेज व जिल्हा रुग्णालय या दोन्ही संस्थांची वाट लावली आहे. जिल्हा रुग्णालयात आता गरीबांना सेवा मिळणार नाहीत. येथील कर्मचारी कमी केले जात आहेत. ते अन्यत्र हलवित आहेत. तसेच मेडिकल कॉलेजला सुविधा नाहीत. केवळ पाच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पदे भरली नाहीत. तीन कोटींचे फर्निचर विकत घेतले. पण त्याचा पत्ता नाही. स्टाफ संकुल नाही. उपहारगृह नाही. बेड नाहीत. जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती विस्कटलेली आहे.
- निलेश राणे, प्रदेश सचिव, भाजप

जिल्हा रुग्णालय शासकीय मेडिकल कॉलेजजवळ हस्तांतरीत झाले आहे, हे खरे असले तरी जिल्ह्यातील नागरिकांना मिळणाऱ्या सेवा, होणारे उपचार कमी होणार नाहीत. उलट सेवेत श्रेणी वर्धन होणार आहे. कारण मेडिकल कॉलेजमुळे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. प्रत्येक विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर असणार आहेत. त्यामुळे आता चांगल्या दर्जाची सेवा नागरिकांना मिळणार आहे. सेवेत सुधारणा होणार आहे.
- डॉ. सत्यवान मोरे, डीन, सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68408 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top