
मेन करावी-आमदार नाईक ''फोटोसेशन''मध्ये व्यस्त
30088
राकेश कांदे
‘फोटोसेशन’मध्ये नाईक पटाईत
कांदेंचा आमदारांना टोला; प्रश्न सोडवायचे नसल्यास खुर्ची खाली करा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः कुडाळ तालुक्यातील आरोग्य यंत्रणा, एसटी बसस्थानक, नाट्यगृह तसेच तालुक्यातील इतर प्रश्न सोडविण्याऐवजी आमदार वैभव नाईक हे फोटोसेशन करण्यात पटाईत आहेत. तालुक्यातील प्रश्न सोडवायला जमत नसतील, तर त्यांनी त्यांची खुर्ची खाली करावी, असा टोला कुडाळ भाजप शहराध्यक्ष राकेश कांदे यांनी नाईक यांना लगावला.
येथील एमआयडीसीच्या शासकीय विश्रामगृहात श्री. कांदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, शक्तिकेंद्र प्रमुख राकेश नेमळेकर, महिला चिटणीस रेवती राणे, बाळा कुडाळकर, जितेंद्र यादव आदी उपस्थित होते.
कांदे म्हणाले की, जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथे महिला बालरुग्णालय आणले; मात्र अनेक वर्षे लोटली, तरीही हे रुग्णालय आमदार नाईक व विद्यमान पालकमंत्र्यांना सुरू करता आलेले नाही. येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोगतज्ज्ञ, ‘क्ष’ किरणतज्ज्ञ नाही. पदे रिक्त आहेत. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा योग्य नाही. मशिनरी धूळ खात पडली असूनही नाईक गप्प का? याबाबत भाजप शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी येथील रिक्त जागा भरण्याबाबत पाठपुरावा केला; मात्र शासनाकडून प्रतिसाद मिळत नाही, असे सांगितले. या ठिकाणी डॉक्टर नाहीत. आरोग्य स्थितीवर आमदार, पालकमंत्री का गप्प आहेत? त्यामुळे खासगी डॉक्टरांचे दवाखाने चालण्यासाठी पालकमंत्री व आमदारांची हातमिळवणी आहे का, अशी चर्चा जनतेत सुरू असून, या सर्वांचा फटका जनतेला बसत आहे. मोफत होणाऱ्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयात पैसे मोजावे लागत आहेत. नाईक मात्र आरोग्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांसोबत फोटोसेशन करण्यापलीकडे काहीच करीत नाहीत. त्यामुळे त्यांनी आरोग्य यंत्रणा सुधारावी. तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नियुक्त करावेत.
ते पुढे म्हणाले, ‘‘सुमारे दोन कोटी रुपये निधीच्या कुडाळ बसस्थानक इमारतीचे वाटोळे झाले आहे. त्याचा हिशेब जनतेला द्यावा. घाईगडबडीत उद्घाटन केले; मात्र येथे सोयीसुविधांचा अभाव आहे. कुडाळ शहरासाठी कायमस्वरुपी तलाठी नाही. मग विद्यार्थी, नागरिकांना दाखले कसे मिळणार? (कै.) मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृहातील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन हवेतच विरले. त्यामुळे आमदारांनी नाट्यकर्मी व नाट्यप्रेमींची थट्टा केली आहे.’’
..............
चौकट
...अन्यथा आंदोलन
कुडाळ भंगसाळ नदीवर कोट्यवधींचा निधी खर्च करून बांधण्यात आलेला बंधारा हा गळका झाल्याचा आरोप शिवसेनेचेच माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी केला होता. त्यामुळे अशा पद्धतीने कामे केली जात असतील तसेच आमदार आणि पालकमंत्री तालुक्यातील प्रश्न सोडवत नसतील, तर भाजप पक्ष गप्प बसणार नाही. प्रत्येक वेळी आंदोलन केले जाईल, असा इशारा श्री. कांदे यांनी यावेळी दिला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69075 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..