
चिपळूण - इच्छूकांकडून प्रभागांचा सर्व्हे आणि मतदारांचा अभ्यास
चिपळूण पालिका निवडणूक;लोगो
..
L30120ः संग्रहीत
...
इच्छुकांकडून प्रभागांचा सर्व्हे आणि अभ्यासही
इच्छुकांची संख्या वाढणार; मतदारांची मनधरणी सुरू
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः वॉर्ड आरक्षणासह प्रभागरचना गुलदस्त्यातून बाहेर पडल्यानंतर निवडणुकीची ‘फील्डिंग’ लावण्यासाठी इच्छुक उमेदवार आता प्रभागाचा सर्व्हे आणि मतदारांचा अभ्यास करत आहेत. आपला प्रतिस्पर्धी कोण असेल, याचा कानोसा घेण्यात अनेकजण मग्न आहेत. आपल्या प्रभागात कोण उमेदवार असू शकतो, याचे निरीक्षण मतदारांनी सुरू केले आहे.
पावसाच्या तोंडावरच पालिका निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे. पालिका प्रशासन आपत्तीचा सामना करण्यात मग्न असले तरी इच्छुक मात्र निवडणुकीच्या तयारीत गुंतले आहेत. पावसाच्या धारा पडत नसल्या तरी गल्लीबोळात सार्वजनिक ठिकाणी निवडणुकीच्या चर्चेच्या धारा मात्र कोसळू लागल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार का, शिवसेना कोणाबरोबर जाईल, मनसे-भाजप युती होणार की नाही? आमदार शेखर निकम, भास्कर जाधव, माजी आमदार रमेश कदम, सदानंद चव्हाण यांच्यासह दुसऱ्या फळीतील नेत्यांची भूमिका काय असेल? यावर चर्चा रंगत आहेत.
त्यामुळे पालिका हीच चर्चेचे केंद्रबिंदू ठरत आहे. इतर मागासवर्गीय प्रभागविना प्रथमच एकूण १४ प्रभागांत ही निवडणूक होणार आहे. प्रभाग क्र. ८ मधील महिला उमेदवाराची जागा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाली आहे. त्या जागेसह राजकीय मंचावर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ५० हून अधिक उमेदवार रिंगणात होते. या वेळी मात्र अनेक माजी नगरसेवकांसह नवखे उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. येथील पालिकेची निवडणूक पक्ष आणि स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या आघाड्या करून लढवली गेली. या वेळी आघाडी आणि युतीची शक्यता आहे. तत्पूर्वी, उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. अनेकजण, ‘एकटाच आलो आहे,’ अशी सावधगिरीची भूमिका घेऊनच मतदारांना समक्ष भेटत आहेत. निवडणुका नेमक्या किती महिन्यात होतील, हे अद्याप स्पष्ट नसल्याने मतदारांची मनधरणी आणि मतदार संघात आपले वर्चस्व राखण्यात प्रत्येक इच्छुक आपले कौशल्य पणाला लावणार आहे.
..
चौकट
काही प्रभाग आव्हानात्मक...
या वर्षीच्या पंचवार्षिक निवडणुकीत इच्छुकांच्या संख्येचा आलेखसुद्धा पूर्वीपेक्षा वाढता असेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पूर्वी बारा प्रभागांतून २४ नगरसेवक निवडून आले होते. या वेळी प्रभागसंख्या वाढली आहे. पूर्वीच्या मतदार संघाच्या विभागणीमुळे काही प्रभाग आव्हानात्मक असणार आहेत. प्रत्येक उमेदवाराला आपले कसब पणाला लावावे लागणार आहे. प्रत्येक प्रस्थापित आपला वॉर्ड ‘सेफ’ व ‘फेव्हरेबल’ असल्याचे सांगत असला तरी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन,’ असे रोखठोकपणे सांगण्याचे धाडस कोणी करत नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69118 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..