
रत्नागिरी- दिव्यांगत्व येऊनही मंदार आगरेने मिळवले 79 टक्के
-rat18p8.jpg
L30079
- संगमेश्वर ः दहावीमध्ये यश मिळवणाऱ्या मंदार आगरे समवेत रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, समीर नाकाडे, प्रिया बेर्डे व आगरे कुटुंबीय.
------------
दिव्यांगावर केली मात, आव्हानांशी भिडला, यशोशिखरावर झेंडा
मंदार आगरेने दहावीत मिळवले ७९ टक्के; आरएचपी फाउंडेशनची मदत; हस्तकलेतून साकारतो वस्तू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः पाच वर्षांपूर्वी अपघातनंतर कबड्डी खेळल्यानंतर आलेला ताप याचा परिणाम होऊन कमरेखाली संवेदना गेलेल्या मंदार रमेश आगरे याने जिद्द सोडली नाही. २०१९ मध्ये दहावीची परीक्षा देता आली नाही; पण यंदा त्याने जिद्दीने परीक्षा दिली आणि ७९ टक्के गुण मिळवले. अपंगत्व येऊनही रडत न बसता लढायला शिकला, याबद्दल त्याचे कौतुक करण्यात येत आहे.
रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचा (आरएचपी) सभासद असलेला मंदार तुळसणी (ता. संगमेश्वर) येथे राहतो. त्याच्या या यशाबद्दल आरएचपी फाउंडेशनतर्फे नुकतेच अभिनंदन करण्यात आले.
मंदारचा २०१७ ला आठवीत असताना दुचाकीवरून जाताना पडल्याने अपघात झाला होता. त्यानंतर दोन वर्ष तो सर्वसामान्य जीवन जगत होता. काहीच त्रास होत नव्हता. त्यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये दहावीत असताना कबड्डी खेळायला गेला होता. खेळून घरी परत आल्यावर दोन दिवस ताप आला आणि हळुहळू कमरेपासून ताकद कमी कमी होत गेली. त्यामुळे त्याला अपंगत्व आले. कमरेपासून खाली काहीही संवेदना जाणवत नाहीत. तो पॅराप्लेजिक असून, त्याला व्हीलचेअर वापरावी लागते. २०१९ मध्ये तो रुग्णालयात असल्याने दहावीची परीक्षा देता आली नव्हती. यावर्षी मंदारने जिद्दीने घरी बसून अभ्यास करून १० वीची परीक्षा दिली आणि घवघवीत यश मिळवले. मंदारने युट्युबवर पाहून पॅराप्लेजिक पेशंट कसे बेडवर, व्हीलचेअरवर बसतात ते पाहून शिकला. कोणाकडूनही विशेष प्रशिक्षण न घेता स्वत: स्वत:चे करायला शिकला.
..
चौकट
मदतीची गरज
मंदारची आई रेशमी पूर्वी शिवणकाम करायची; पण अपंगत्व आल्यामुळे तिने हे काम कमी केले आहे. वडील शेतीवाडी, मोलमजुरी करतात. त्यांनी मंदारसाठी खूप कष्ट केले असून त्याला पुढे शिक्षण देण्याची इच्छा आहे. याकरिता त्यांना मदतीची गरज आहे.
--------------------------------
चौकट 1
आरएचपीतर्फे प्रशिक्षण
आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे, प्रिया बेर्डे यांनी मंदारच्या घरी जाऊन त्याची सर्व माहिती घेतली. त्याच्या दहावीतील यशाबद्दल अभिनंदन केले. त्याला पॅराप्लेजिक रुग्ण स्वत: पोट कसं साफ करतात, युरिन इन्फेक्शन होऊ नये, बेडसोअर होऊ नये, यासाठी कशी काळजी घ्यायची? बेडवरून व्हीलचेअरवर आणि व्हीलचेअरवरून कमोड कसा वापरायचा, व्हीलचेअर पायऱ्यांवरून कशी चढवायची, उतरवायची, नाष्टा, जेवण, झोपणे, उठणे, व्यायामाच्या वेळा या विषयी सविस्तर माहिती आणि प्रशिक्षण दिले. अपंगत्वाचा दाखला, एसटी पास, रेल्वे पास, युनिक आयडी, शासकीय योजना, दिव्यांग निधी याविषयी माहिती आणि आवश्यक कागदपत्र या विषयी पूर्ण माहिती दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69144 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..