
हत्तींचा मोर्चा घोटगेवाडीकडे; नुकसान सत्र सुरू
swt2029.jpg
30614
घोटगेवाडीः हत्तींनी माड बागायतीचे नुकसान केले.
हत्तींचा मोर्चा घोटगेवाडीकडे
नुकसान सत्र सुरूः बागायती जमीनदोस्त
सकाळ वृत्तसेवा
साटेली भेडशी, ता. २०ः हत्तींनी आता आपला मोर्चा घोटगेवाडीकडे वळवला आहे. हत्तींच्या कळपाने रविवारी रात्री (ता. १९) तेथील सत्यवान बेर्डे यांच्या केळी, काजू व माड बागायतीचे नुकसान केले. मुंबई सोडून गावी येत त्यांनी गेल्या चार वर्षांत स्वतःला शेती बागायतीत झोकून दिले होते. काबाडकष्ट करत त्यांनी शेती बागायती फुलवली; मात्र हत्तींनी त्यांची बाग जमीनदोस्त करत त्यांची उमेदच खच्ची केली.
हत्तींनी बेर्डे यांच्या बागेतील जवळपास दोनशे केळी, पंधरा ते वीस काजूची कलमे आणि दहा ते पंधरा कवाथे जमीनदोस्त केले. हातातोंडाशी आलेली बागायत उद्ध्वस्त होताना पाहून बापलेकाला अश्रू अनावर झाले होते. वन कर्मचारी येतील, पंचनामे करतील, शासन तुटपुंजी भरपाई देईल; पण इतकी वर्षे राब राब राबून उभी केलेली बाग पुन्हा होती तशी मिळणार नाही. पुन्हा तितकी वर्षे राबावे लागेल आणि पुन्हा हत्ती येणार नाहीत याची खात्रीही असणार नाही. त्यामुळे पुढे काय करायचे, असा प्रश्न बेर्डे कुटुंबीयांना पडला आहे. त्यांच्याप्रमाणे तिलारी खोऱ्यातील सर्वच शेतकरी हत्तींच्या उपद्रवामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69796 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..