‘प्रधानमंत्री आवास’चे प्रस्ताव रखडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘प्रधानमंत्री आवास’चे प्रस्ताव रखडले
‘प्रधानमंत्री आवास’चे प्रस्ताव रखडले

‘प्रधानमंत्री आवास’चे प्रस्ताव रखडले

sakal_logo
By

‘प्रधानमंत्री आवास’चे प्रस्ताव रखडले

सातबाराची अडचण; उद्दिष्टपूर्ती करणे बनले अवघड

विनोद दळवी : सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २१ ः प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रस्ताव प्राप्त होण्यास मोठी दिरंगाई होत आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षातील अद्याप ७९८ प्रस्ताव अप्राप्त आहेत. घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या नावे सात बारा नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे.
केंद्र सरकार संचलित प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत घर बांधणीसाठी एक लाख २० हजार रुपये दिले जातात. या व्यतिरिक्त स्वच्छ भारत अभियांमध्ये समावेश असल्यास १२ हजार रुपये आणि महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ९० दिवसांची १८ हजार रुपये मजुरी दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याला १४८३ घरकुले मंजूर करण्याचे उद्दिष्ट २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलेले आहे. मात्र, यासाठी आवश्यक प्रस्ताव तालुकास्तरावरून अद्याप प्राप्त होताना दिसत नाहीत. केवळ ६८५ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. ७९८ प्रस्ताव अजून आवश्यक आहेत. यामुळे गरिबांना घरे देण्यासाठी शासन राबवित असलेल्या या योजनेची १०० टक्के अंमलबजावणी होण्यास अडचण निर्माण झाली आहे.
शासनाने ड यादी अंमलबजावणी सुरू केल्यानंतर २०२१-२२ या पहिल्या वर्षात १४८३ एवढे उद्दिष्ट जिल्ह्याला दिले होते. याचबरोबर प्रत्येक तालुक्याला त्यातील उद्दिष्ट देत गावोगावचे लाभार्थी थेट शासनाने निवडले होते. यासाठी जिल्हास्तरावर कार्यरत असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने प्रस्ताव प्राप्त होण्यासाठी तालुकास्तरावर पाठपुरावा केला होता. त्यातून आतापर्यंत ६८५ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मात्र, उर्वरित प्रस्ताव प्राप्त होत नाहीत. घरकुल मंजूर होवून प्रस्ताव प्राप्त न झालेल्या लाभार्थ्यांमधील अनेक लाभार्थ्यांच्या नावे सातबारा नाही. त्यामुळे लाभार्थी प्रस्ताव सादर होत नाहीत, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून देण्यात आली.
-------------
चौकट
१९५९ नावे ग्रामसभेने वगळली
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची ड यादी शासनाने २०२१-२२ पासून सुरू केली आहे. ड यादीसाठी जिल्ह्यातून सर्व्हे करून पाठविलेल्या यादीतील सुमारे १६ हजार नावे शासनाने वगळली होती. ड यादीसाठी क्लिष्ट नियम लावल्याने केवळ १९ हजार १६५ लाभार्थी यादी मंजूर झाली होती. त्यानंतर पात्र नसल्याने यातील आणखी १९५९ लाभार्थी गावोगावच्या ग्रामसभेने कमी केली आहेत. त्यामुळे आता केवळ १७ हजार २०६ लाभार्थ्याना ड यादीतून घरकुले मिळणार आहेत. यातील १४८३ लाभार्थी पहिल्या वर्षासाठी निवडले होते.
--------------
चौकट
२०२२-२३ चे उद्दिष्ट रखडले
शासनाने ड यादी अंमलबजावणी करताना उद्दिष्ट देण्याचे निकष बदलले आहेत. २०२१-२२ पासून लाभार्थी निवड थेट शासन करीत आहे. शासनाने निवडलेले लाभार्थी व दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाल्या शिवाय पुढील उद्दिष्ट मिळत नाही. नवीन लाभार्थी निवड करता येत नाही. २०२१-२२ चे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने २०२२-२३ हे आर्थिक वर्ष सुरू होवून तीन महिने होत आले तरी या वर्षाचे उद्दिष्ट शासनाकडून प्राप्त झालेले नाही. त्यामुळे २०२१-२२ च्या उद्दिष्टातील लाभार्थी संपल्या शिवाय पुढील लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही.
--------------
कोट
प्रधानमंत्री आवास योजना ड यादीचे २०२१-२२ करिता १४८३ चे उद्दिष्ट प्राप्त आहे. पैकी ६८५ प्रस्ताव प्राप्त झाले असून अद्याप ७९८ प्रस्ताव आवश्यक आहेत. यामध्ये देवगड-१०८, दोडामार्ग-६२, कणकवली-११९, कुडाळ-१८२, मालवण-५३, सावंतवाडी -१५९, वैभववाडी-३२, वेंगुर्ले-८३ असे प्रस्ताव येणे बाकी आहेत.
- जगदीश यादव, विस्तार अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69921 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top