
कठोर श्रमाला पर्याय नाही
L३०७३७
- कुडाळ ः ''गप्पाटप्पा'' कार्यक्रमात बोलताना सुषमा ठाकुर. (छायाचित्र ः अजय सावंत)
कठोर श्रमाला पर्याय नाही
सुषमा ठाकुर-पाटणकर ः कुडाळात ''गप्पाटप्पा'' कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ ः दुसऱ्याचे यशापयश आपल्याला बोधप्रद असते. त्यातून बोध घेत आपण आत्मविश्वासपूर्वक यशाचा मार्ग निवडला पाहिजे; मात्र कठोर श्रमास पर्याय नाही. नकारात्मक गोष्टींकडे लक्ष न देता सकारात्मक विचार करा. यशस्वी लोकांकडून आपल्या कौशल्याबाबत जाणून घ्या, असे प्रतिपादन जे. पी. मॉर्गन बँकेच्या उपाध्यक्षा सुषमा ठाकुर-पाटणकर यांनी पत्रकारांशी ''गप्पाटप्पा'' कार्यक्रमात केले.
जगातील सर्वात श्रीमंत अमेरिकन बँकेच्या व्हाईस प्रेसिडेंट सिंधुदुर्ग कन्या सौ. सुषमा ठाकुर खासगी दौऱ्यानिमित्त सिंधुदुर्गात आल्या होत्या. यानिमित्त येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सौ. ठाकूर कुडाळ हायस्कूलच्या माजी विद्यार्थी असून, जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात झाली. सध्या त्या अमेरिकेतील अॅमेझॉन प्रांतात पती रितेश पाटणकर यांच्या समवेत वास्तव्याला आहेत. त्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत अशा जे. पी. मॉर्गन बँकेच्या व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्या टोकियो लाईफ इन्शुरन्सच्या व्हाईस प्रेसिडेंट होत्या. त्यानंतर काही काळ व्होडाफोन आणि मेटलाईफ या कंपनीच्या जनरल मॅनेजर पदापर्यंत त्यांनी झेप घेतली होती.
यावेळी सौ. ठाकुर म्हणाल्या, "वाईट गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता त्यातील चांगल्या गोष्टी हेरून त्या आत्मसात करा. हे मला जमणारच नाही, हा न्यूनगंड टाका. आपली कोणीही कितीही हेटाळणी केली, तरी प्रयत्न सोडू नका. प्रगती करण्यासाठी इंग्रजीची भीती बाळगू नका. तिला सामोरे जा. मग भीती आपोआपच दूर होईल. खडतर मार्गावरून चालत यशस्वी झालेल्यांचा आदर्श समोर ठेवा; मात्र एखादा प्रगतीचा मार्ग निवडताना त्यातील धोके अगोदर ओळखा, म्हणजे मार्गात संकटे येणार नाहीत. आजच्या आधुनिक युगात आपण तंत्रज्ञानाचा कसा वापर करतो, यावर यशापयश अवलंबून आहे. प्रामाणिकता आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर कष्ट करण्याची तयारी असेल, तर या जगात कठीण काहीच नाही. शंभर टक्के प्रयत्न करा आणि मग देवाला हाक मारा. तो नक्कीच तुम्हाला यशस्वी बनवेल. आई-वडिलांचा विसर पडू देऊ नका. ध्येय निश्चित करा व झपाटून कामाला लागा." मेहनती व टॅलेंटेड मुलांसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सूचित केले. यावेळी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमृता गाळवणकर, प्रा. अरुण मर्गज, बॅ. नाथ पै फिजियोथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूरज शुक्ला उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69929 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..