गुंतवणूक शून्य पण परिणाम अनन्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुंतवणूक शून्य पण परिणाम अनन्य
गुंतवणूक शून्य पण परिणाम अनन्य

गुंतवणूक शून्य पण परिणाम अनन्य

sakal_logo
By

(धरू कास उद्योगाची ................लोगो)

rat21p23.jpg
30716
प्रसाद जोग

इंट्रो
उद्योग सुरू करायचा म्हणजे खूप मोठे भांडवल हवे, चकाचक ऑफिस असायलाच हवे, नोकरदार वर्ग हवाच असे काही नाही. उद्योग करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते उद्योजकीय गुणसंपदा. उद्योजकीय संकल्पना जर सक्षम असेल व त्यामध्ये चार पैसे मिळवून द्यायची ताकद असेल तर उद्योग सुरू करण्यासाठी फार मोठ्या भांडवलाची व ऑफिस सेटअपची गरज लागतेच असे नाही. हे कसे त्याची नोंद येथे केली आहे.......
- प्रसाद जोग
-------------------------------------------
गुंतवणूक शून्य पण परिणाम अनन्य
उद्योजकता म्हणजे पैसे निर्माण करण्याची क्षमता. पैशाची निर्मिती ही गुंतवणुकीतून पैशातून, श्रमातून, स्वत:च्या कौशल्यातून, स्वयंप्रेरणेने केलेल्या सुयोग्य अथक प्रयत्नातून, निरीक्षणातून, स्वयंरोजगारातून, संवाद कौशल्यातून, कमिशन बेस उद्योग व्यवसायातून, समुपदेशन व मार्गदर्शनातून तसेच काही मूल्यवर्धित सेवा देऊन करता येते. श्रममूल्ये व जीवनमूल्ये शैक्षणिक वयात मुलांना कळली. त्यांच्यात आपण उद्योजकीय कलागुण रुजवले व त्यांना त्यांचा जीवनउद्देश काय असावा, हे समजून सांगितले तर भावी पिढी उद्योजकतेचे धडे गिरवू शकते. उद्यमशीलतेचा हा प्रवास जरी खडतर असेल तरी अशक्यप्राय नाही. आपण खूपदा एखाद्या उद्योजकाने शून्यातून व्यवसाय सुरू करून मोठे यश प्राप्त केले असे वाचतो पण त्या उद्योजकाने आपल्या बुद्धिमत्तेची, श्रमांची, मूल्यांची, वेळेची गुंतवणूक स्वतःच्या उद्योग व्यवसायात केलेली असते. मी कोण? माझ्यामध्ये काय क्षमता आहेत? मी माझ्या श्रमाचे, बुद्धीकौशल्याचे काय मूल्य ठरवू शकतो हे का एकदा उद्योजकाला कळले तर त्याला आपल्या उद्योग संकल्पनेला मूर्त स्वरूप देणे शक्य होते. प्रत्येक बिझनेस आयडिया ही पहिल्यांदा मानवी मेंदूतच तयार होत असते व उद्योजकांच्या प्रयत्नशील स्वभावामुळे, जोखीम घेण्याच्या वृत्तीमुळे फलद्रूप होत असते. गुंतवणूक शून्य स्वरूपात करावयाची असल्यास उद्योजकाला आपल्या बौद्धिक संपदेवर अवलंबून निर्धारित वेळेत आपल्या ध्येयाच्या दिशेने आगेकूच करता येते; पण त्यासाठी सुयोग्य नियोजन व व्यवस्थापन तंत्र आत्मसात करावे लागते.
सकारात्मक, आशावादी, रिसोर्सफूल उद्यमशील व्यक्तिमत्त्व अगदी पहिल्यापासून उद्योगनिर्मिती स्वबळातून करू शकते; पण तशी जिगर हवी. विवेक बिंद्रा यांचा बडा बिझनेस सुरू झाला तो अगदी शून्य रूपयातूनच.. आपल्याकडे उमदे व्यक्तिमत्व असेल, संवादकौशल्य असेल तर कोचिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्ही स्वतःला बिनदिक्कतपणे उद्योजक म्हणून निश्चितच घडवू शकता. उद्योजकीय गुणसंपदा या मोठ्या हिमतीने व उत्साहाने नवउद्योजकाला आपल्या अंगात बाणवाव्याच लागतात. स्वतःला आपण जसे आहोत तसे स्वीकारून स्वतःमध्ये ध्येय साध्य करण्याची विजुगिशू वृत्ती आली की, बरेचसे काम सोपे होऊन जाते.
कोकणात शून्य गुंतवणुकीत करता येणारे खूप उद्योग-व्यवसाय आहेत जसे की, बंद घरांचे व्यवस्थापन करायला घेऊन त्यातून घरमालकांना उत्पन्न मिळवून देण्यासाठी विस्तृत पर्यटन आराखडा तयार करून तो कार्यान्वयित करण्याचा कसोशीने प्रयत्न करणे. कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दुभाषी सेवा उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू करणे, पर्यटनदूत म्हणून गावातील जीवनशैली पर्यटकांना दाखवून त्याचे ब्लॉग बनवणे, शाळा-कॉलेजमध्ये उद्योजकीय शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणे, भाषांतराचे काम करून देणे, सर्व सेवा पुरवठादार यांचे एकत्रिकरण करून त्यांच्या कामाची माहिती देणारी वेबसाइट बनवून त्यातून सेवा व्यवसाय वाढीस नेणे, समुपदेशन व प्रशिक्षणवर्ग चालवणे. औषधी वनस्पती यांची ओळख करून घेऊन त्यांची लागवड करणे, फळबागा राखायला घेणे, सहकार तत्त्वाची कास धरणे, खेकडे पालन, पुस्तकलेखन, भाषांतर, लिप्यंतर, सल्ला सेवा, कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इंट्रा डे, शेअर मार्केट, मोटिव्हेशनल ट्रेनिंग, स्किल स्कूल्स, लाईफ कोचिंग, इंटेरिअर डिझायनिंग, बागांची निर्मिती करून देणे (land scaping),इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, रीसेलिंग, घरगुती पॅकेजिंग वर्क्स, सोशल मीडिया मार्केटिंग, पी. आर. एजन्सी, योगा ट्रेनिंग, यू ट्यूब चॅनेल चालवण्याचा उद्योग, इव्हेंट मॅनेजमेंट, संहितालेखन, जेंट्स पार्लर सर्व्हिसेस, मसाजकेंद्र, डेस्टिनेशन वेडिंग assignment घेण्याचा व्यवसाय...इत्यादी.
शून्य आपण ज्याला म्हणतो त्यात अखंड ब्रह्मांड निर्माण करण्याची क्षमता आहे; पण शून्य हे अनन्यसाधारण तेव्हाच सिद्ध होते जेव्हा उद्योजक एक उद्योग संकल्पना मोठ्या हिमतीने प्रत्यक्षात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतो. अग्निपथावरून चालायची जिद्द दाखवत असतो.

(लेखक उद्योग प्रेरणा प्रशिक्षक आहेत.)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69995 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top