
कणकवलीत आजपासून बॉक्सिंगचा थरार
30781
कणकवली ः येथील राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेची माहिती देताना संघटनेचे पदाधिकारी डॉ. राजाराम दळवी, सुभाष दळवी आदी.
कणकवलीत आजपासून ‘बॉक्सिंग’
राज्यस्तरीय स्पर्धा; जिल्हा हौशी बॉक्सिंग संघटनेचा पुढाकार
कणकवली, ता. २१ ः राज्य बॉक्सिंग असोसिएशनशी संलग्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बॉक्सिंग संघटनेच्यावतीने राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २२ ते २८ जून या कालावधीत येथील चौंडेश्वरी सभागृहात होत असून, जिल्हा संघटनेच्या वतीने प्रत्येक तालुक्यात नवीन शाखा सुरू करून शालेय विद्यार्थ्यांना बॉक्सिंगचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. संघटनेचे सचिव डॉ. राजाराम दळवी यांनी आज ही माहिती दिली.
येथील चौंडेश्वरी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेला संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दळवी, एकनाथ चव्हाण आदी उपस्थित होते. डॉ. दळवी म्हणाले, ‘‘स्पर्धेचे उद्घाटन उद्या (ता. २२) सकाळी अकराला आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कोकण विभागीय शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील, नगराध्यक्ष समीर नलावडे आदी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात प्रथमच बॉक्सिंग स्पर्धा होत आहे. महाराष्ट्र संघटनेशी संलग्न असलेला जिल्हा संघटना नोंदणीकृत आहे. या संस्थेची नोंदणी १९९८ मध्ये झाली. त्यानंतर मान्यवरांच्या माध्यमातून जिल्ह्यात बॉक्सिंग प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सध्या मालवण, देवबाग, आंबोली येथे प्रशिक्षण सुरू आहे. जिल्ह्यातील तरुणांना बॉक्सिंग क्षेत्रामध्ये संधी मिळावी, या उद्देशाने खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरविण्यात येत आहे.’’ यावेळी महाराष्ट्र रेफरी समितीचे चेअरमन व तांत्रिक अधिकारी (मुख्य) राजन जोथाडी, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना उपाध्यक्ष भरतकुमार व्हावळ, खजिनदार कृष्णा मातेफोड, सदस्य एकनाथ चव्हाण, नरेंद्र सावंत, विजय घरत, संतोष गुराम, श्रीकृष्ण आजगावकर, सर्वेश दळवी, रुपेश दळवी आदी उपस्थित होते.
--
४०० खेळाडूंचा सहभाग
स्पर्धेसाठी राज्यभरातील विविध जिल्हे आणि शहरी भागातील ३५० ते ४०० खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. १७ ते १८ वयोगटातील स्पर्धकांना सहभाग दिला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य असोसिएशनतर्फे ही १८ वी युवा महिला स्पर्धा २२ ते २४ जून या कालावधीत होणार असून, ८० वी पुरुष गटातील स्पर्धा २८ जून पर्यंत होणार आहे. सकाळी अकरापासून ही स्पर्धा सुरू होणार असून, प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्थाही आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70047 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..