विधवा प्रथा बंद करण्याबाबत निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधवा प्रथा बंद करण्याबाबत निवेदन
विधवा प्रथा बंद करण्याबाबत निवेदन

विधवा प्रथा बंद करण्याबाबत निवेदन

sakal_logo
By

विधवा प्रथा बंद करण्याबाबत निवेदन
संगमेश्वरः मौजे नांदळज गावातील विधवा प्रथा नांदळज ग्रामपंचायतीने बंद करावी आणि सामाजिक आदर्श घडवावा यासाठी सरपंचाना निवेदन देण्यात आले. एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या महिलेचे कुंकू पुसले जाते, हिरवा चुडा फोडला जातो, सौभाग्याचे सगळेच अलंकार सामाजिक दृष्टिकोनातून हिसकावून घेतले जातात. या सामाजिक प्रथा बंद करणे कायद्याच्या आणि समाजाच्या दृष्टिकोनातून गरजेचे आहे. सामाजिक दृष्टिकोनातून विधवा स्त्रियांना कोणत्याही मंगल कार्यक्रमात बोलावले जात नाही. त्यांचा उचित मानसन्मान केला जात नाही. भारतीय समाजातील कोणत्याही महिलेला कायद्यानुसार योग्य तो सन्मान मिळाला पाहिजे आणि याची सुरवात गावखेड्यातून झाली पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतींना दिलेल्या आदेशानुसार, विधवा प्रथा बंद करण्यात याव्यात याची दखल घेऊन कोकणातील नाणीज, दापोली या ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्या आहेत. अशाप्रकारे मौजे नांदळज गावातील विधवा प्रथा नांदळज ग्रामपंचायतीने बंद करावी आणि सामाजिक आदर्श घडवावा यासाठी सरपंच दिलीप गोवळकर यांना पंचशील बुद्धविहार सेवा संघ (रजि.) यांच्याकडून विनंतीवजा निवेदन देण्यात आले.
------------
खासदार किर्तीकरांकडून कबड्डी मॅट भेट
देवरूख ः संगमेश्वर तालुक्यात कबड्डी स्पर्धांसाठी आणि सरावासाठी मॅट नसल्याने खेळाडूसह स्पर्धा आयोजकांची मोठी अडचण होत होती. ती अडचण देवरूखचे जावई व राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी सेनानेते खासदार गजानन कीर्तिकर यांना सांगताच त्यांनी ही अडचण दूर करण्याचा शब्द दिला. त्या शब्दाची पूर्तता करत खासदार किर्तीकरांनी सोळजाई क्रीडा मंडळाला स्वखर्चातून मॅट उपलब्ध करून दिले. या मंडळावर भाऊंचे नेहमीच कृपाशिर्वाद आणि प्रेम राहिले आहे. त्यांनी आपल्या स्पर्धेदरम्यान ग्रामीण भागात कबड्डी वाढून प्रो कबड्डीसारख्या मोठ्या स्पर्धेची तयारी करता यावी व मॅटवर सराव करता यावा तसेच जास्तीत जास्त स्पर्धा मॅटवर खेळवता याव्यात म्हणून मॅट देतो, असे सांगितले होते.
-------------
करबुडे शाळेत प्रवेशोत्सव
रत्नागिरीः जिल्हा परिषदेत केंद्रीय शाळा करबुडे बौद्धवाडी नं. १ (ता. जि. रत्नागिरी) येथे शाळा प्रवेशोत्सव, नवागतांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वाटप व शाळापूर्व तयारी मेळावा असा भव्यदिव्य कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यकामासाठी केंद्रप्रमुख कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रभातफेरी काढण्यात आली.
----------------
ऐन पावसात बिबट्याची दहशत
साखरपाः येथे सोनारआळी नजीक असणाऱ्या दत्तात्रय भाटकर यांच्या मालकीचा पाळीव कुत्रा रात्री दीड वाजण्याच्या सुमारास बिबट्याने फस्त केला. तेथे राहत असलेल्या भाटकर कुटुंबीयांनी व शेजाऱ्यांनी या घटनेचा आवाज ऐकला; परंतु वाघाच्या भीतीने कुणी पुढे जाण्याचे धाडस केले नाही. मागील वर्षापूर्वी याच कुत्र्याच्या शोधात चक्क दुसऱ्या मजल्यावरील जिन्यावर बिबट्या चढल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता; मात्र त्या वेळी बंदिस्त असल्याकारणाने त्याच्या तावडीत तो सापडला नव्हता. काल मात्र पाळीव कुत्रा बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडला. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही बंद असल्याने घटना कैद झाली नाही. भरवस्तीतील बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत तसेच परिसरातील अन्य पाळीव प्राणीदेखील बिबट्याने फस्त केले आहेत. त्यामुळे वनविभागाने या घटनेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
-----------
56 व्या वर्षी मिळवले 56 टक्के गुण
संगमेश्वर ः नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी निकालात अनेक कौतुकास्पद गोष्टी समोर येत आहेत. यापैकीच एक म्हणजे मुळच्या संगमेश्वर तालुक्यातील परचुरी गावातील पण सध्या मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या स्वाती पवार यांची. त्यांनी वयाच्या 56व्या वर्षी दहावीची परीक्षा दिली आणि योगायोग असा की, त्यांना 56 टक्के गुण मिळाले. गृहिणी असलेल्या स्वाती यांनी जिद्द म्हणून दहावीची परीक्षा दिली आणि त्यात त्यांनी यश मिळवले. स्वाती यांना तीन मुले असून, दोन मुलींची लग्नं झाली आहेत. त्यांना एक नात आहे. मुलगा इंजिनियर असून, पती बेस्टमधून सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्या सगळ्या कुटुंबाचा डोलारा सांभाळून त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70116 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top