
भाजप सोबत जाण्यातच शिवसेनेचे हित ः केसरकर
L31147 - दीपक केसरकर
भाजप सोबत जाण्यातच
शिवसेनेचे हित ः केसरकर
मला शिवसैनिक अडवू शकत नाही
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २२ : शिवसेनेने भाजपसोबत युती करावी, अशी माझी ठाम भूमिका आहे. मी, गेली दोन वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांनी आता योग्य तो निर्णय घ्यावा, असे आमदार दीपक केसरकर यांनी आज मुंबईत स्पष्ट केले. मला कुठल्याही शिवसैनिकाने अडवू नये. अशा दहशतवादी प्रवृत्ती विरोधातच मी संघर्ष केला. त्यामुळे मला पुन्हा संघर्ष करायला भाग पाडू नका, असा इशाराही त्यांनी शिवसैनिक आणि शिवसेना नेत्यांना दिला आहे.
मुंबईतील ‘मातोश्री’ येथून बाहेर पडताना आमदार केसरकर यांना काही शिवसैनिकांनी रोखून धरले होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आज श्री. केसरकर यांनी मुंबईत प्रसार माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, ‘‘मी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी भाजपकडूनही मला ऑफर होती. त्यावेळी मी शिवसेनेत राहिलो काय किंवा भाजपमध्ये असलो काय, तुम्हाला फरक पडणार नाही. एवढेच नव्हे, तर जेव्हा वेळ येईल, तेव्हा भाजप आणि शिवसेनेला एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करेन, अशी भूमिका मी भाजप नेत्यांना सांगितली होती. माझी हीच भूमिका आजही कायम आहे. भाजपसोबत जाण्यातच शिवसेनेचे हित आहे.’’
ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री विधानसभा भंग करण्याची शिफारस राज्यपालांना करू शकतात; मात्र ती बाब मान्य करणे किंवा नाही हा तांत्रिक मुद्दा आहे. विधानसभा भंग करणे, हा सध्या महत्त्वाचा मुद्दा नाही, तर घर जळत आहे. त्यामुळे पहिल्यांदा आग विझविण्याला प्राधान्य द्यायला हवे. भाजपसोबत युती करण्यासाठी शिवसेनेचे आमदार आग्रही आहेत. एकनाथ शिंदे यांचेही तेच मत आहे. आपणही त्या मताशी ठाम आहोत आणि आपली ही भूमिका मी मुख्यमंत्र्यांना सांगितली आहे. आता मुख्यमंत्र्यांनीच यावर निर्णय घ्यावयाचा आहे.’’
मला अडविण्याचा प्रयत्न करू नये
‘मातोश्री’ वरून बाहेर पडल्यानंतर मंगळवारी मला शिवसैनिकांकडून अडविण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी मी अनिल देसाई यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला. त्यानंतर शिवसैनिक बाजूला झाले; मात्र आज दिवसभर माझ्या मुंबईच्या निवासस्थानासमोर शिवसैनिक आहेत. हा प्रकार चुकीचा आहे. तुम्ही असा कुणावरही दबाव आणू शकत नाही. अशाच दबावाविरोधात याआधी मी संघर्ष केला आहे. त्यामुळे मला पुन्हा संघर्ष करायला कुणी भाग पाडू नये, असा इशाराही श्री. केसरकर यांनी दिला. मला कुठल्या पक्षात जायचे असेल तर तो निर्णय मी जाहीरपणे घेऊ शकतो, तेवढी हिंमत माझ्यात आहे. माझी जी भूमिका होती, ती मी शिवसेना पक्षप्रमुखांकडे मांडली आहे. निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असेही श्री. केसरकर म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70512 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..