यंदा नेत्यांचे दातृत्व गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा नेत्यांचे दातृत्व गायब
यंदा नेत्यांचे दातृत्व गायब

यंदा नेत्यांचे दातृत्व गायब

sakal_logo
By

00613
41600

यंदा नेत्यांचे दातृत्व गायब

निवडणुकांपुरती मदत; शैक्षणिक साहित्य वाटपाकडे दुर्लक्ष

संतोष कुळकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २५ ः शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपामध्ये अग्रेसर असलेली राजकीय, सामाजिक नेतेमंडळी यंदा गेली कुठे? असा प्रश्‍न तालुक्यातील पालकांना पडला आहे. अलीकडे कुठल्याही निवडणुकांची धांदल नसल्याने विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष अनियमित होते. त्याआधी निवडणुका आल्यावर राजकीय मंडळींना आठवतात ती शाळकरी मुले. आपल्यासह नेत्यांची छायाचित्रे छापलेल्या वह्या शाळांमध्ये जाऊन वाटण्याची पूर्वी चढाओढ असे. यातून आपली छबी, नेत्यांची छायाचित्रे, पक्षाची निशाणी विद्यार्थ्यांमार्फत घरी पालकांपर्यंत पोचविण्याचे प्रभावी माध्यम म्हणून याकडे पाहिले जात होते. यातून एकीकडे गरीब, गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्याचा आभास निर्माण करण्याबरोबरच आपले राजकीय हित यातून साध्य करण्याची मोहिमच जणू कार्यकर्ते आखत असत. यातून खरी शैक्षणिक मदत करण्याची भावना किती असायची, हा संशोधनाचा विषय ठरेल; मात्र दरवर्षी शाळा सुरू झाल्यावर वह्या तसेच अन्य शैक्षणिक साहित्य भरलेली वाहने शाळांसमोर लागत. विद्यार्थ्यांना त्याचे वाटप होई. त्याची छायाचित्रे काढून प्रसिद्धीही मिळविली जाई. यातील खरी धडपड असायची ती राजकीय चेहरा, संभाव्य उमेदवार घराघरापर्यंत पोचला पाहिजे. यासाठी त्यांचेच कार्यकर्ते यासाठी जीवाचे रान करताना आढळत असत. कोरोनाची गेली दोन वर्षे सोडली, तर यंदा नियमितपणे शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत; परंतु विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात पुढे करण्यासाठी यंदा अजूनतरी कोणीही धजावलेले दिसत नाही. खरेतर शैक्षणिक साहित्य दरवर्षी लागणारे असते. त्यामुळे मदत करणाऱ्यांना कोणताही हेतू समोर ठेवून मदत करायची नसेल, तर विद्यार्थ्यांना केव्हाही मदतीचा हात देता येऊ शकतो; परंतु यंदा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी कोणीही अजून आले नसल्याचे चित्र आहे. काही स्वयंसेवी संस्था, व्यक्तीगत पातळीवरील काही दानशूर आपल्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देतच असतात; मात्र त्यातही त्यांना कधी प्रसिध्दीची आवश्यकता भासत नसावी. एका हाताने दिलेले दुसऱ्या हाताला कळू नये, त्याला ‘दान’ म्हणतात; परंतु काहीवेळा तसे होताना दिसत नाही. काहीतरी मिळविण्यासाठी काहीतरी देण्याची पध्दत असल्याचे दिसून येते. आता जवळपास कुठल्याही निवडणुका नसल्याने विद्यार्थ्यांना आता कोण वह्या तसेच शैक्षणिक साहित्य देणार? असा प्रश्‍न काही गरीब पालकांसमोर पडला आहे. त्यामुळे ‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पालकांनी पाल्याची आबाळ होऊ नये, यासाठी स्वतःच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्याचेही बोलले जात आहे.
..............
चौकट
शैक्षणिक साहित्याचे दर वधारले
वाढत्या महागाईमुळे शैक्षणिक साहित्याचे दरही वधारले आहेत. कागदाच्या किंमती वाढल्याने वह्यांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशावेळी शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले असते, तर गरीब पालकांना आर्थिक हातभार लागला असता, असे चित्र आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71292 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..