
ग्रामपंचायतींनी आपद्ग्रस्तांना मदत द्यावी
ग्रामपंचायतींनी आपद्ग्रस्तांना मदत द्यावी
सतीश प्रभू ः जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २४ ः निसर्गाच्या प्रकोपामुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रामीण भागातील जनतेचे घर, इमारतींचे व गाईगुरांचे गोठे असलेल्या मांगरांचे मोठे नुकसान होते. अशा आपद्ग्रस्त जनतेला ग्रामपंचायतीकडून तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी बांदिवडे बुद्रुकचे माजी सरपंच सतीश प्रभू यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्तीमध्ये सामान्य माणूस भरडला जातो. आपत्तीमध्ये ग्रामीण भागातील जनतेला कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा वेळेवर उपलब्ध न झाल्याने जीवित हानी होणे, मालमत्तेचे नुकसान होणे, घरे-मांगर कोसळणे इत्यादी घटना घडतात. त्यानंतर शासनाची आपत्कालीन यंत्रणा, महसूल यंत्रणा खडबडून जागी होते. नुकसानीचे पंचनामे, पंचयाद्या होतात. कोटीच्या कोटी उड्डाणांचे नुकसानीचे आकडे जाहीर होतात; मात्र सामान्य जनतेला किती मदत मिळते? त्यामुळे घरे, इमारती, मांगर आदींचे नुकसान झाल्यास त्या आपदग्रस्ताला किमान ५ हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत ग्रामस्तरावरील शासन असलेल्या ग्रामपंचायतींनी द्यावी. कारण इमारत कर ग्रामपंचायतीकडे प्रथम जमा होतो. सध्या ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती डबघाईची राहिलेली नाही. ''कर रजिस्टर''मधील कराचे उत्पनाचे आकडे नजरेखालून घातले, तर छोट्या ग्रामपंचायतींकडे किमान ४ ते ५ लाख व मोठ्या ग्रामपंचायतींकडे २५ ते ३० लाखाच्या घरात वार्षिक उत्पन्न इमारत कर रुपाने जमा होते. शिवाय शासनाचा निधी, बँकेकडून मिळणारे व्याज आदी जमेच्या बाबी आहेतच.
---
शासन निर्णय गरजेचा
ग्रामपंचायतीकडून झालेल्या मदतीतून आपद्ग्रस्त ग्रामस्थ घराच्या डागडुजीसाठी पत्रे, सिमेंट, चिरे आदी साहित्य थोड्या प्रमाणात घेऊ शकेल. आपद्ग्रस्तांना ग्रामपंचायतीकडून तातडीची मदत होण्यासाठी शासन निर्णय होणे गरजेचे आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी श्री. प्रभू यांनी निवेदनातून केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71295 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..