सावंतवाडीला पावसाने झोडपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीला पावसाने झोडपले
सावंतवाडीला पावसाने झोडपले

सावंतवाडीला पावसाने झोडपले

sakal_logo
By

31653
सोनुर्ली ः पावसामुळे रस्त्यावर साचलेले पाणी.
31669
सावंतवाडी ः जाधववाडी येथील कोसळलेली घळण.

सावंतवाडीला पावसाने झोडपले

नदीनाले प्रवाही; काही भागांत पूरसृश्य स्थिती, अनेक पूल पाण्याखाली

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः गेले काही दिवस अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाने शनिवारी सकाळपासून सावंतवाडी तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने नदीनाले दुथडी भरून वाहू लागल्याने तालुक्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले.
मॉन्सूनला सुरुवात झाल्यापासून सावंतवाडी तालुक्यात म्हणावा तसा पावसाला जोर नव्हता. झालेल्या पावसाने नदीनाले प्रवाहित झाले, तरी पूरपरिस्थिती अद्यापपर्यंत निर्माण झाली नव्हती; मात्र शनिवारी पहाटेपासून पावसाने रुप बदलले असून, मुसळधार कोसळण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात सर्वत्र जोरदार पावसाने मुसंडी मारली आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील काही गावांमध्ये पूरसदृश्य स्थिती दिसली. शेतशिवारामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तेथे तळ्याचे रुप निर्माण झाले होते. सर्वत्र पाणीच पाणी असल्याने शेतीची कामे थांबली.
नदीनाले दुथडी भरुन वाहू लागल्याने सखल भागातील पुलांवरून पाणी वाहत होते. बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती पाहायला मिळाली. शहरातील मुख्य बाजारपेठेतही याचा परिणाम दिसला. एसटीच्या फेऱ्याही उशिराने दाखल होत होत्या. त्यामुळे वेळापत्रक पूर्ण कोलमडले होते. याचा फटका येथे बाजारासाठी आलेल्या ग्रामीण भागातील ग्राहकांना बसला.
दरम्यान, तालुक्यात आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिमखाना-जाधववाडी येथील घळण कोसळली. पालिका प्रसाशनाने जिमखाना ग्राउंडचा विस्तार वाढविण्यासाठी नाल्यावर स्लॅब घालण्यापूर्वी घळणीची जेसीबीने खोदाई केली होती. त्यावेळी जाधववाडी वस्तीतील लोकांनी मोठा विरोध केला होता; पण विरोधाला न जुमानता पालिकेने काम सुरू ठेवले. अखेर आज झालेल्या मुसळधार पावसाने ती घळण कोसळली. याचा फटका मोठ्या प्रमाणात जाधववाडी वस्तीला बसण्याची शक्यता आहे. केवळ २० फुटाच्या अंतरावर जाधववाडीतील लोकांची घरे असताना घळण कोसळण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच असल्याने घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जाधववाडीवासीय भयभीत झाले असून, पालिकेने यावर तातडीने तोडगा न काढल्यास पालिकेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचे सांगितले.
.................
आंबोली धबधबा पूर्ण क्षमतेने
आज सकाळपासूनच कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने आंबोलीतील मुख्य धबधबा तसेच इतर छोटे-मोठे धबधबे पूर्ण क्षमतेने
प्रवाहित झाले होते. त्यामुळे आंबोली वर्षा पर्यटनाला मूर्त स्वरुप प्राप्त झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71340 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..