
‘लोकाधिकार’च्या सावंतवाडी संघटकपदी अक्षय तळवडेकर
‘लोकाधिकार’च्या सावंतवाडी
संघटकपदी अक्षय तळवडेकर
ओटवणे ः महाराष्ट्र लोकाधिकार समितीवर सावंतवाडी तालुका संघटक म्हणून सरमळे येथील अक्षय तळवडेकर यांची निवड करण्यात आली. लोकाधिकार समितीच्या बैठकीत समितीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रसाद करंदीकर यांनी ही निवड केली. यावेळी लोकाधिकार समितीचे राज्य उपाध्यक्ष दीपक कुडाळकर, कार्याध्यक्ष अविनाश पराडकर, उपकार्याध्यक्ष राजेश माने, जिल्हा सरचिटणीस कमलेश चव्हाण, जिल्हा संघटक प्रसाद मडगावकर, जिल्हा संपर्कप्रमुख जाफर शेख, जिल्हा सचिव विनोद चव्हाण, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उमेश सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख रत्नाकर जोशी, विष्णू चव्हाण, ययाती नाईक, पायल ढवळी, विष्णू परब, आशिष खानोलकर आदी उपस्थित होते. अॅड. करंदीकर यांनी कर्जदार व जामीनदारांना असलेल्या कायदेशीर हक्कांची माहिती दिली. श्री. चव्हाण यांनी समितीमार्फत जनतेच्या हितासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. श्री. पराडकर यांनी जिल्ह्यात अनेक वित्तीय संस्थांनी वसुलीसाठी अनेक थकित कर्जदारांवर केलेल्या चुकीच्या व अन्याय्य गोष्टींविरोधात समितीच्या माध्यमातून वेळोवेळी केलेल्या कायदेशीर व धडक कारवाईची माहिती दिली.
------------------
दोडामार्गात पुन्हा दुचाकी चोरी
दोडामार्ग ः दोडामार्गात पुन्हा दुचाकी चोरीस जाण्याची घटना घडली आहे. धाटवाडीतील पुंडलिक गडकरी यांनी घराजवळ उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी रात्री पळविली. चोरीच्या वाढत्या प्रकारामुळे येथील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोडामार्गात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मागील अडीच महिन्यांत दोन दुचाकी चोरीस गेल्या आहेत. गुरुवारी रात्री तिसरी दुचाकी चोरीची घटना घडली. या घटनांकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात हे प्रमाण अधिकच वाढले जाईल, अशी चर्चा नागरिकांत आहे. पोलिसांनी या चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
-------------------
अपघात प्रकरणी संशयित निर्दोष
कुडाळ ः कुडाळ-वेंगुर्ले राज्य मार्गावर टेम्पोने दुचाकीस्वारास धडक देऊन साथीदाराच्या दुखापतीस व गाडीचे नुकसानीस कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून आरोपी फजुद्दीन अनुबक्कर भालेकर (रा. झाराप) यांची न्यायदंडाधिकारी अश्विनी बाचुलकर यांनी निर्दोष मुक्तता केली. १५ जुलै २०१९ ला सकाळी पावणे नऊच्या सुमारास पिंगुळी-काळेपाणी येथे घटना घडली होती. या घटनेवेळी संशयित तीन चाकी टेम्पो कुडाळहून वेंगुर्लेच्या दिशेला घेऊन जात होता. तर फिर्यादी पत्नीसमवेत दुचाकीने कुडाळच्या दिशेला जात होता. यावेळी संशयिताने कोणताही इशारा न दाखविता अचानक उजव्या बाजूला वळण घेतल्याने धडक होऊन फिर्यादी व त्यांची पत्नी जखमी झाली होती. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले होते. याबाबत आरोपी विरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र कुडाळ न्यायालयात पाठविले होते. संशयितातर्फे अॅड. संजीव प्रभू यांनी काम पाहिले.
---------------
कणकवलीत आज ‘नशाबंदी’
सिंधुदुर्गनगरी ः जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त जिल्ह्यात ठिठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (ता. २६) नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, शाखा सिंधुदुर्ग, कणकवली कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तरुणांना नशेच्या पदार्थांपासून लांब ठेवण्यासाठी नशेच्या विरोधात प्रतिबंधात्मक जनजागृती करण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून कणकवली कॉलेज, कणकवली येथे सकाळी नऊ ते अकरा दरम्यान विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सकाळी साडेदहाच्या दरम्यान कणकवली कॉलेज ते आप्पा पटवर्धन चौक अशी जनजागृती फेरी होणार आहे. सहभागी व्हावे, असे आवाहन नशाबंदी मंडळाने केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71367 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..