
राणीसाहेबांच्या आजारपणामुळे चिंतेचे सावट
पाऊलखुणा ः भाग - ७४
राणीसाहेबांच्या आजारपणामुळे चिंतेचे सावट
लिड
बापूसाहेब महाराजांनी आपले आयुष्य सावंतवाडीकरांसाठी वाहिले होते. यामुळे शक्यतो हे संस्थान सोडून बाहेरगावी जाणे टाळायचे. श्रीमंत राणीसाहेब पार्वतीदेवी यांचे आजारपण महाराजांच्या आयुष्यात चिंतेचे सावट घेऊन आले. डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी युरोपात जायचा सल्ला दिला; मात्र शक्य तितके इथेच उपचार करून काही गुण येतो का, याचे प्रयत्न महाराज आणि स्वतः राणीसाहेबांनी केले.
- शिवप्रसाद देसाई
---------------------
बापूसाहेब महाराज आणि राणीसाहेब सावंतवाडीकर प्रजेच्या सुखदुःखाशी एकरुप झाले होते. प्रजा सुखी, संतुष्ट रहावी, यासाठी ते दोघेही आपले सुख पणाला लावायला कायमच तत्पर असायचे. महाराज शक्यतो संस्थान सोडून दीर्घ मुदतीसाठी बाहेरगावी जायला तयार नसायचे. त्यामुळे परदेश प्रवास ही तर त्यांच्यासाठी खूप दूरची गोष्ट. अशातच राणीसाहेबांचे आजारपण या राज परिवारावर चिंतेचे सावट आणणारे ठरले. १९३५च्या सुरुवातीपासूनच राणीसाहेबांची प्रकृती बिघडू लागली. सावंतवाडीत होणाऱ्या उपचारांना प्रतिसाद मिळेना. त्यामुळे पुढच्या उपचारांसाठी मुंबईत जाणे भाग होते; मात्र मुंबईत जावे की न जावे यातच बरेच दिवस निघून गेले. मुंबईत गेल्यास दरबाराची कामे तुंबून राहण्याची भीती होती. ते महाराजांना पटत नव्हते; मात्र प्रकृती अधिकच बिघडू लागल्याने मुंबईत जायचे जवळजवळ निश्चित झाले. याच दरम्यान दरबाराच्या कामासाठी महाराजांना दिल्लीत जावे लागले. यालाच जोडून मुंबईत उपचारासाठी जायचे नियोजन झाले.
महाराज आधी दिल्लीत गेले. ते तेथील काम आटोपून परत मुंबईत आले. इकडे राणीसाहेब त्याचदरम्यान सावंतवाडीहून मुंबईत पोहोचल्या. तेथे नामांकित डॉक्टरांकडून राणीसाहेबांची प्रकृती तपासण्यात आली. मूत्राशयात खडा असावा, असा बहुतेक डॉक्टरांचा अंदाज होता. तसे उपचार सुरू करण्यात आले; मात्र त्याला तितकासा प्रतिसाद मिळेना. त्याकाळात मुंबईतील डॉक्टर राजेरजवाड्यांना उपचारासाठी युरोपात जायचा सल्ला सर्रास द्यायचे. राणीसाहेबांसाठीही डॉक्टरांनी तो सल्ला दिला; मात्र शक्य तितके उपचार येथेच करायचे आणि शेवटचा उपाय म्हणून युरोपचा पर्याय समोर ठेवायचा निर्णय राजेसाहेब आणि राणीसाहेबांनी घेतला. यातच फेब्रुवारी १९३५ मध्ये बापूसाहेबांची प्रकृती खालावली. त्यांना ताप येऊ लागला. प्रकृती जास्तच ढासळू लागली. जवळपास आठ दिवसांनी महाराजांना थोडे बरे वाटले; मात्र अशक्तपणा आला होता. त्यामुळे हे कुटुंब मुंबईतच काही दिवस राहिले. मार्चची अखेर येतायेता मुंबईत उष्मा वाढायला लागला. हे वातावरण तापदायक होते. त्यामुळे हवापालटासाठी बंगळूरू (बंगलोर) येथे जायचा बेत ठरला. म्हैसुरच्या महाराजांच्या ‘ब्यू फोर्ट’ या बंगल्यात ते राहायला गेले. महिनाभर राहूनही राणीसाहेबांना आराम मिळेना. तेथेही उष्मा वाढू लागला. यामुळे एप्रिलच्या अखेरीस त्या सगळ्यांनी पुन्हा मुक्काम हलवला. राजकुटुंब सावंतवाडीत यायला निघाले. वाटेत बेळगावात दोन दिवस मुक्काम करून त्यांनी आंबोली गाठली. आंबोलीत राणीसाहेबांना थोडा आराम मिळाला; पण मेच्या अखेरीस प्रकृती पुन्हा ढासळली. कोल्हापूरचे कोरडे हवामान आरोग्यासाठी चांगले असल्याचा सल्ला त्यांना दिला गेला. त्यामुळे तेथूनच हे कुटुंब कोल्हापुरात दोन आठवड्यांसाठी मुक्कामाला गेले. कोल्हापुरच्या छत्रपतींचे पाहुणे म्हणून त्यांनी तेथे मुक्काम केला. तेथेही राणीसाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा होईना.
हवापालट करून आरोग्य सुधारणार नाही, हे एव्हाना लक्षात आले होते. उलट प्रकृती आणखीच खालावत होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा सावंतवाडी गाठली. तेथे पुण्याहून डॉ. भडकमकर आणि बडोद्याहून डॉ. चंद्रचुड या तज्ज्ञांना बोलावण्यात आले. त्यांनी उपचार सुरू केले. एक-दोन महिने आराम मिळाला, पण सप्टेंबरमध्ये आजाराने पुन्हा उचल खाल्ली. यामुळे मुंबईत पुन्हा तपासणीसाठी जाण्याचा निर्णय झाला. सप्टेंबरच्या मध्याला राजकुटुंब पुन्हा मुंबईला गेले. डॉ. तिरोडकर, डॉ. पुरंदरे, डॉ. गिल्डर, डॉ. भरुचा, डॉ. मुळगावकर आदींनी तपासणी करून उपचार करून पाहिले; पण गुण येईना. अशा स्थितीत राणीसाहेबांना युरोपात नेणेही कठीण होते. त्यामुळे पुण्यात डॉ. भडकमकर यांच्या निरीक्षणाखाली उपचार करण्याचे ठरले. त्यानंतर ऑक्टोबरच्या मध्याला हे सर्वजण पुण्यात गेले. तेथे महिनाभर डॉ. भडकमकर यांनी उपचाराची पराकाष्ठा केली; पण यश न आल्याने त्यांनी व डॉ. खानोलकर यांनी त्यांना पुन्हा युरोपात जाण्याचा सल्ला दिला.
अखेर परदेशात जाण्याचा निर्णय पक्का झाला. त्याकाळातही वैद्यकीय संशोधनाचे माहेरघर असलेल्या व्हिएन्ना येथे जाण्याचा बेत निश्चित झाला. १९ डिसेंबर १९३५ ही तारीख ठरली. त्यादिवशी राजपरिवार इटालियन कंपनीच्या ‘काँते व्हर्दे’ या बोटीने जायचा निर्णय झाला. हा मोठा दौरा असल्याने राज्यकारभाराची व्यवस्था लावणे आवश्यक होते. यामुळे महाराज पुन्हा सावंतवाडीत आले. संस्थानचा कारभार पाहण्यासाठी दिवाण, सरन्यायाधीश, नायक दिवाण यांचे कॉन्सील नेमून त्यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर कोल्हापुरात जाऊन त्यांनी दक्षिणेकडील संस्थानांच्या व्हाईसरॉय प्रतिनिधींची भेट घेतली. आप्तेष्टांचे निरोप घेऊन महाराज मुंबईकडे निघाले. राणीसाहेब, युवराज, तिन्ही राजकन्या आधीच पुण्याहून मुंबईत पोहोचले होते. या युरोप प्रवासात राजकुटुंबातील मंडळींशिवाय राजकन्यांच्या गव्हर्नेस मिसेस पार, मेडिकल ऑफिसर डॉ. चिंतामण हरी कर्णिक, डॉ. जी. के. देशपांडे यांच्याशिवाय दोन नोकर, चपराशी इतकी मंडळी होती.
.............
चौकट
ध्यास प्रजेचा
राणीसाहेबांच्या उपचारासाठी महाराज म्हैसुरला गेले होते. तेथेही संस्थानमध्ये सुधारणांचे विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. या काळात त्यांनी म्हैसुर संस्थानच्या राज्यकारभारातील पध्दतीचा अभ्यास केला. निरनिराळ्या उद्योगधंद्यांचे निरीक्षण करून उपयुक्त गोष्टींची टाचणे काढली. मिळालेल्या संधीचा त्यांनी संस्थानसाठी असा फायदा करून घेतला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71634 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..