
वीजबिल थकल्याने कारवाई
वीजबिल थकल्याने कारवाई
सातार्डा ः साटेली तर्फ सातार्डा येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे तीन महिन्यांपासूनचे वीजबिल थकल्याने महावितरणकडून साटेली ग्रामपंचायत कार्यालयाचा व पाणीपुरवठा नळयोजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. चार दिवसांपासून साटेली ग्रामपंचायत कार्यालय काळोखात आहे. महावितरणचे रेडी उपकार्यालयाचे सहाय्यक अभियंता सावळाराम पेडणेकर यांनी ही कारवाई केली. ग्रामपंचायत कार्यालयाचे ८६ दिवसांचे दोन हजार तीनेश रुपये व पाणीपुरवठा नळयोजनेचे ८४ दिवसांचे तीन हजार सहाशे रुपये वीज बिल थकीत आहे. गावातील नळयोजना पाणीपुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचे कामकाजही ठप्प आहे.
----------------
कणकवलीत बुधवारी आरोग्य शिबिर
कणकवली ः पितांबरी व विवेक मार्केटिंगच्यावतीने कणकवली तेली आळी येथील सिंधुसागर कॉम्प्लेक्स येथे बुधवारी (ता.२९) मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच दरम्यान होणाऱ्या शिबिरात सहभागी रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला दिला जाणार आहे. शिबिरात पाठदुखी, मानदुखी, खोकला यांसह विविध आजारांवर तपासणी होणार आहे. शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विवेक करंदीकर यांनी केले आहे.
------------------
माजगावात गव्यांकडून हानी
सावंतवाडी ः पावसाने दमदार सुरुवात केली आहे. बळीराजा शेतीच्या कामात मग्न आहे. मात्र लावणीला योग्य झालेला तरवा गवारेडे फस्त करत असल्याने बळीराजा चिंताग्रस्त आहे. माजगाव-चिपटेवाडी येथे बळीराजाच्या काबाडकष्टामुळे तरवा लावणीयोग्य झाला आहे. तो तरवा गवे फस्त करत असल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला होता. शेतीच्या कामांनीही वेग घेतला आहे. काही दिवसांत पेरणी व लावणीची कामे अंतिम टप्पात येतील; मात्र, गव्यांच्या भीतीने केलेली मेहनत वाया जाईल की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना आहे.
--------------
वसुधाज् योगाचे परीक्षेत यश
वेंगुर्ले ः भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या योगा सर्टिफिकेशन बोर्डाच्या लेव्हल - २ (वाय. सी. बी. लिव्हल-२) म्हणजेच योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर या अतिशय उच्च दर्जाच्या व जागतिक पातळीवर घेतल्या जाणाऱ्या योग प्रशिक्षण देण्याच्या मान्यताप्राप्त परीक्षेत वेंगुर्ले येथील डॉ. वसुधाज् योगा अॅण्ड फिटनेस अॅकॅडमीने यावर्षीही ७५ टक्के एवढी निकालाची परंपरा राखली आहे. ॲकॅडमीच्या यशाचे कौतुक होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71759 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..