
पान एक-संततधार सुरूच
31991
रहाटेश्वर ः येथून पावणाई गावाला जोडणाऱ्या पुलावर पाणी आले होते.
जिल्ह्यात मुसळधार
मालवणमध्ये वस्तीत पाणी; करुळ घाटात दगड रस्त्यावर
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २६ ः मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे नदीनाले दुथडी भरून वाहू लागलेत. मालवण मेढा, कोथेवाडा परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने तेथील घरांना धोका निर्माण झाला आहे. करुळ घाटातदेखील किरकोळ दगड रस्त्यावर आले होते. या मार्गावरून वाहत असलेल्या पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. रहाटेश्वर (ता.देवगड) येथून पावणाई गावाला जोडणाऱ्या पुलावर पाणी आले. पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली. काल दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. काल रात्रभर मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या बहुतांश भागाला झोडपून काढले. आज पहाटेपासून पावसाच्या सरींवर सरी कोसळत होत्या. सकाळी ११ नंतर पावसाचा जोर अधिकच वाढला. संततधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
मालवण तालुक्यातील मेढा येथील मौनीनाथ मंदिर, दोन पिंपळ, कोथेवाडा येथे गटारात पाणी तुंबल्यामुळे येथील काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसण्याची शक्यता आहे. घाट परिसरात पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे डोंगरावरून येणारे पाणी रस्त्यावरून वाहत होते. या पाण्याचा वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. भुईबावडा घाटातदेखील तशीच स्थिती जागोजागी निर्माण झाल्याचे चित्र होते. मालवण, वेंगुर्ले आणि देवगड या किनारपट्टीच्या तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस सुरू होता. देवगड तालुक्यात पावसामुळे रहाटेश्वर-पावणाई गावाला जोडणाऱ्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. याशिवाय सखल भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. वैभववाडी, कणकवली या तालुक्यांनाही पावसाने चांगलेच झोडपले. सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांतही सरींवर सरी कोसळत होत्या. गड, शुक, भंगसाळ या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास जिल्ह्याच्या काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतमळ्यांमध्ये पाणीच पाणी साचले आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांनाही पूर्ण क्षमतेने सुरुवात केली आहे. दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी भातरोप लागवडीस प्रारंभ केला आहे.
चौकट
पुढील तीन दिवस धोक्याचे
जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असून, नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच अजून दोन-तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आणखी दोन दिवस पाऊस मुसळधार पाऊस झाल्यास जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71780 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..