टुडे पान दोन मेन-जिल्हा परिषदेची प्रभाग रचना निश्चित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे पान दोन मेन-जिल्हा परिषदेची प्रभाग रचना निश्चित
टुडे पान दोन मेन-जिल्हा परिषदेची प्रभाग रचना निश्चित

टुडे पान दोन मेन-जिल्हा परिषदेची प्रभाग रचना निश्चित

sakal_logo
By

जिल्हा परिषदेची प्रभाग रचना निश्चित
जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर ः पंचायत समित्यांच्या प्रभागांचाही समावेश
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २७ ः जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज जिल्ह्यातील ५५ जिल्हा परिषद व ११० पंचायत समिती मतदार संघांची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली. प्रारूप प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर आलेल्या ४० हरकतींमधील ४ हरकती स्वीकारल्यानंतर ही अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता यापुढे होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार होणार असल्याचे जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी जाहीर केले आहे.
राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती मतदार संघ वाढले आहेत. हे वाढलेले मतदारसंघ मालवण, कुडाळ, वेंगुर्ले, कणकवली व देवगड या पाच तालुक्यांत असून, त्यामुळे या पाच तालुक्यांत अस्तित्वात असलेल्या मतदार संघात फोडाफोडी झाली आहे. अनेक गावे नवीन मतदार संघात जोडली गेली आहेत.
राज्याने जिल्हा परिषदेसाठी कमीतकमी ५५ मतदार संघ निश्चित करण्याचे नवीन धोरण जाहीर केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिले ५० मतदारसंघ होते. आता त्यात पाच मतदारसंघ वाढल्याने ही संख्या ५५ झाली आहे. हे पाच जिल्हा परिषद मतदारसंघ वाढत असतानाच पंचायत समितीचे दहा मतदारसंघ वाढले आहेत. त्यामुळे पंचायत समिती सदस्यांची जिल्ह्यात असलेली १०० ही संख्या वाढून ११० एवढी होणार आहे. मतदारसंघ वाढत असल्याने साहजीकच अस्तित्वात असलेल्या मतदारसंघांची तोडफोड झाली आहे. अनेक गावे नवीन मतदारसंघात समाविष्ट झाली आहेत. यामुळे प्रस्थापित असलेल्या सदस्यांची हक्काची गावे दुसऱ्या मतदारसंघात गेल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यात पाच जिल्हा परिषद मतदारसंघ वाढत असले तरी सावंतवाडी या मोठ्या तालुक्यासह वैभववाडी व दोडामार्ग या तीन तालुक्यांत मतदार संघ वाढलेले नाहीत. तर मालवण, कुडाळ, वेंगुर्ले, कणकवली व देवगड या पाच तालुक्यांत मतदारसंघ वाढले आहेत. या पाचही तालुक्यांत प्रत्येकी एक जिल्हा परिषद मतदारसंघ व प्रत्येकी दोन पंचायत समिती मतदारसंघ वाढले आहेत. यामुळे या तालुक्यांच्या मूळ जिल्हा परिषद मतदार संघात एक मतदारसंघ, तर पंचायत समिती मतदारसंघात दोन मतदारसंघ वाढले आहेत.
................
नवीन प्रभाग
रचना जाहीर
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा अधिनियम, ५) चे कलम १२ पोटकलम (१) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वात्रिक निवडणुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम ५८ (१) (अ) अन्वये पंयायत समित्यांमधील निर्वाचक गणाची रचना व एकूण सदस्य संख्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणाबाबत जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या आदेशाच्या मसुद्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयातील फलकावर, जिल्हा परिषद कार्यालयातील फलकावर, सर्व तहसीलदार कार्यालयातील फलकावर, सर्व पंचायत समिती कार्यालयातील फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मुसुद्यास कोणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधी जी सकारण लेखी निवेदने, हरकती, सूचना जिल्हा परिषदेच्या बाबतीत जिल्हाधिकारी व पंचायत समितीच्या बाबतीत संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे ८ जून २०२२ पर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार दाखल झालेल्या हरकती निकालात काढत आज अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.
...................
हे आहेत ५५ जिल्हा
परिषद मतदार संघ
नव्याने जाहीर करण्यात आलेल्या ५५ जिल्हा परिषद मतदार संघात वैभववाडी तालुक्यात कोळपे, कोकिसरे, लोरे, कणकवली तालुक्यात खारेपाटण, कासार्डे, नांदगाव, फोंडा, नाटळ, जानवली, कलमठ, कळसुली, देवगड तालुक्यात विजयदुर्ग, पडेल, पोंभुर्ले, शिरगांव, नाडण, कुणकेश्वर, किंजवडे, मिठबाव, मालवण तालुक्यात आडवली-मालडी, आचरा, मसुरे मर्डे, सुकळवाड, गोळवण, पेंडुर, वायरी-भूतनाथ, कुडाळ तालुक्यात आंब्रड, कडावल, कसाल, ओरोस बुद्रुक, नेरुर तर्फ हवेली, तेंडोली, झाराप, तळुसुली तर्फ माणगाव, नेरुर कर्याद नारुर, माणगाव, वेंगुर्ले तालुक्यात म्हापण, आडेली, तुळस, मातोंड, उभादांडा, शिरोडा, सावंतवाडी तालुक्यात माडखोल, आंबोली, कोलगाव, तळवडे, माजगाव, इन्सुली, मळेवाड, आरोंदा, बांदा आणि दोडामार्ग तालुक्यातील मणेरी, साटेली-भेडशी, माटणे अशा प्रकारे एकूण ५५ जिल्हा परिषद मतदार संघ तयार करण्यात आले आहेत.
..................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71976 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top