
पान एक-सावंतवाडीत केसरकरांविरुध्द घोषणाबाजी
32234 -
सावंतवाडी ः येथे सोमवारी आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोरून शक्तिप्रदर्शन करत निघालेली शिवसेनेची रॅली. (छायाचित्र ः रुपेश हिराप)
सावंतवाडीत केसरकरांविरुद्ध घोषणाबाजी
शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन; पाऊस असूनही रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः येथील आमदार दीपक केसरकर यांचा शिंदे गटात सामील झाल्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने आज रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले. त्यात केसरकरांच्यां निवासस्थानासमोर थांबून घोषणाबाजी करण्यात आली. रॅलीचे येथील गांधी चौकात सभेत रूपांतर झाले. त्यात शिवसेना नेत्यांनी केसरकरांच्या भूमिकेवर सडकून टीका केली. रॅलीव्दारे उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवित शक्तिप्रदर्शनही करण्यात आले.
सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गवळी तिठा ते शिवाजी चौक ते गांधी चौकापर्यंत रॅली निघाली. शिवसेनिकांमधून व्यक्त होणारा संताप लक्षात घेता सावंतवाडी पोलिसांनी केसरकरांच्या निवासस्थानासमोर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. रॅली मार्गावरही बंदोबस्त होता. दंगल नियंत्रक पथकाच्या तुकडीने केसरकरांच्या निवासस्थानाला संरक्षण दिते. ‘आम्ही मावळे शिवसेनेचे, आम्ही उद्धव ठाकरेंसोबत’ असे फलक रॅलीत झळकविण्यात आले. पाऊस आणि शेतीची कामे असतानाही शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे रॅलीत सहभाग दर्शविला. केसरकरांविरोधातील राग रॅलीतून समोर आला.
रॅली केसरकरांच्या निवासस्थानासमोर येताच काही मिनिटे शिवसैनिकांनी जोरदार घोषणा दिल्या. आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाध्यक्षा जान्हवी सावंत, कोकण पर्यटन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, सावंतवाडी तालुका संपर्कप्रमुख शैलेश परब, अतुल रावराणे, सतीश सावंत, सावंतवाडी मतदारसंघप्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, बाबूराव धुरी, महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे, सुकन्या नरसुले, रश्मी माळवदे, युवा सेनेचे योगेश नाईक, पंकज शिरसाठ, गुणाजी गावडे, सागर नाणोसकर, मदन राणे, अॅड. हर्षद गावडे सहभागी होते.
शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या केसरकरांना करोडो रुपयांचे आमिष दिसले; मात्र बाळासाहेबांनी कमावलेली करोडो रुपयांची जनता दिसली नाही, असा हा ''दीपक'' सावंतवाडीतून कायमचा बुजवा, असे आवाहन शिवसेना नेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले. केसरकर कसे गद्दार निघाले ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आत्तापासूनच जिल्हा परिषदनिहाय बैठका घेऊन जनतेला जागृत करा, असेही आवाहन त्यांनी केले. तुम्ही कधीही आवाज द्या. मी सदैव तुमच्यासोबत असेन, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, ‘‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवबंधन बांधणाऱ्या केसरकर यांनी साईबाबांची शपथ घेऊन मी शिवसेना सोडणार नाही, असे सांगितले होते; मात्र हेच साई बाबाला मानणारे केसरकर आज शिवसेनेला कायमचे संपले आहेत. मुळात आज गद्दार असणाऱ्या केसरकरांना शिंदे गटाचे प्रवक्ते बनवण्यात आले आहे; मात्र एकनाथ शिंदे यांना कोणाला प्रवक्ते बनवायचे, ही अक्कल वेळीच येवो.’’
आमदार नाईक म्हणाले, ‘‘शिवसेनेत अनेक सच्चे शिवसैनिक आहेत. त्यामध्ये शब्बीर मणियार, भाई गोवेकर यांसारखे चेहरे नेहमीच समोर असतात; मात्र शिवसेनेने यांना कधीच काही दिले नसताना बाहेरून आलेल्या केसरकरांना आमदार केले, मंत्रिपद दिले, तरीही ते शिवसेनेच्या बाहेर गेले. संजय राऊत यांना कमी बोला, असे ते सांगत आहेत; मात्र ज्या सावंतवाडीच्या जनतेने तुम्हाला शिवसेनेच्या चिन्हावर निवडून दिले ते तुमच्याकडे राजीनामा मागणार नाहीत का, आज तुम्ही उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर काडीमोड घेण्यास सांगत आहात, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला, मुळात उद्धव ठाकरे यांनी एक फोन अमित शहा यांना केला तर ते कधीही शिवसेनेसोबत जुळवून घ्यायला तयार आहेत; मात्र ही शिवसेना जनतेची असून ती कुणासमोर झुकणार नाही.’’
पारकर म्हणाले, ‘‘अनेक संकटे आली; पण शिवसेना कधीच डगमगली नाही. आजच्या संकटावरही उद्धव ठाकरे मात करतील. त्यांनी वर्षा बंगला सोडला त्यावेळी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले. थंड दहशतवाद जोपासून संधिसाधूगिरीने तीन वेळा आमदार झालेल्या केसरकरांना येथील जनता कधीच माफ करणार नाही.’’ यावेळी संजय पडते, सतीश सावंत, जान्हवी सावंत यांनी आपले विचार मांडले.
देवाला साकडे
शिवसेना या संकटातून नक्कीच बाहेर पडणार आहे. आमदार, मंत्री बाहेर पडले तरी शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेना पुन्हा उभी राहील, असे सांगत दुधवडकर यांनी देवा शिवसेनेवरील हे संकट कायमचे टळो, अशी प्रार्थना केली.
केसरकर समर्थकांची रॅलीकडे पाठ
रॅलीत शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व केसरकर समर्थकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. शिंदे गटात केसरकर सामील झाल्यानंतर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपतही केसरकर समर्थक कुठेच दिसले नाहीत.
राष्ट्रवादीचा पाठिंबा
रॅलीला महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान, राकेश नेवगी यांनी गांधी चौक येथे रॅलीत सहभाग घेतला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72094 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..