
कणकवलीत 27.67 कोटींची शिल्लक
swt२८६.jpg
32299
कणकवली नगरपंचायत
कणकवलीत २७.६७ कोटींची शिल्लक
सभेत वार्षिक लेखे : नगरपंचायतीची रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड मोहीम
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २८ : येथील नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत आज वार्षिक लेख्यांना मंजूरी देण्यात आली. यात नगरपंचायतीकडे २७ कोटी ६७ लाख ७२ हजार रूपये शिल्लक राहिले आहेत. तर महसूली खर्च ६ कोटी १३ लाख आणि भांडवली खर्च ९ कोटी ९७ लाख रूपये झाला आहे. शहरात नव्याने झालेल्या सर्व रस्ता दुतर्फा स्थानिकांना विश्वासात घेऊन वृक्ष लागवड मोहीम राबविण्याचाही ठराव सभेत घेण्यात आला.
कणकवली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अॅड. विराज भोसले, रवींद्र गायकवाड, अभिजित मुसळे, नगरसेविका मेघा सावंत, कविता राणे, उर्मी जाधव, सुमेधा अंधारी यांच्यासह नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी सभेला उपस्थित होते.
नगरपंचायत सभेत २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे लेखे नगरपंचायतीच्या लेखापाल प्रियांका सोन्सूरकर यांनी सादर केले. यात नगरपंचायत फंड तसेच विविध योजनांच्या माध्यमातून महसूली जमा ६ कोटी ७४ लाख तर भांडवली जमा ५ कोटी ४६ लाख रूपये शिल्लक आहेत. आरंभिक शिल्लक ३१ कोटी ५७ लाख रूपये असल्याची माहिती देण्यात आली. आतापर्यंत विविध योजनांसाठी महसूल खर्च ६ कोटी १३ लाख आणि भांडवली खर्च ९ कोटी ९७ लाख रूपये झाले आहेत.
मागील तीन वर्षात ठेकेदारांची अनामत रक्कम, बयाणा रक्कम ही कोट्यवधीमध्ये आहे. भू संपादनासाठी साडे चार कोटी रूपयांचा निधी शासनाकडून आला आहे. त्यामुळे २७ कोटी ६७ लाख रूपये शिलकीचा फुगवटा दिसत असल्याची माहिती उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली. आतापर्यंत ४६ लाख ७८ हजार ३८० रूपयांची बयाणा रक्कम ठेकेदारांना परत केल्याची माहिती लेखापाल सोन्सूरकर यांनी दिली.
कणकवली शहरात गेल्या दीड वर्षात अनेक नवीन रस्त्यांची कामे झाली आहेत. या रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड केली जावी, असा ठराव अबिद नाईक यांनी मांडला. रस्त्यासाठी केवळ १२ मिटर जागा संपादीत केली आहे. त्यापुढील जागा खासगी मालकीची आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीबाबत चर्चा करून निर्णय घ्या, असे उपनगराध्यक्ष हर्णे यांनी सुचविले. सभागृहात यावर चर्चा झाल्यानंतर खासगी जागेत जमीन मालकांच्या संमतीने उत्पन्न देणारी झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरपंचायत निधीतून ही झाडे लावण्यात येणार आहेत. त्याची देखभाल स्थानिक जमीन मालकांनी करावी असेही ठरविण्यात आले.
चौकट
‘तो’ कचरा हटविणार
नगरपंचायत इमारती बाहेर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, लोखंडी कचरा साठवून ठेवण्यात आला आहे. पाच वर्षापासून हा कचरा तसाच असल्याने रोगराईची शक्यता आहे. त्यामुळे हा कचरा तातडीने हटवा, अशी मागणी अबिद नाईक, अभिजित मुसळे यांनी केली. नगराध्यक्ष श्री. नलावडे यांनी लिलाव करून हा कचरा हलवा, असे निर्देश प्रशासनाला दिले. मुख्याधिकाऱ्यांनीही यावर तातडीने कारवाई करावी, असे पत्र देत असल्याचेही श्री. नलावडे म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72207 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..