
रत्नागिरी ः शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात मित्रपक्षांचे प्रयत्न
बाळासाहेबांचे हिंदुत्व
पुढे नेण्यासाठी शिंदेंसोबत
उदय सामंत; जनतेने गैरसमज करून घेऊ नये
रत्नागिरी, ता. २८ ः राज्यसभा निवडणुकीत सेनेने दिलेला उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले. काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे कारस्थान घटक पक्षांकडून सुरू आहे. त्याला कंटाळून मी गुवाहाटीला आलो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय मी घेतला. असं असलं तरी आजही मी शिवसेनेतच आहे. त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी, कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, आमदार उदय सामंत यांनी सोशल मीडियाद्वारे केले.
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला साथ दिली आहे, तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी उदय सामंत हे देखील गुवाहाटीला पोहोचले. त्यांनी देखील एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. दरम्यान, उदय सामंत यांनी मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर मोठा आरोप केला आहे. राज्यसभेत शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून घटक पक्षांकडून प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी आपली बाजू मांडताना सांगितले. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान घटक पक्षांकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो असल्याचे उदय सामंत म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्च्या शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला; मात्र घटक पक्षाने हा उमेदवार निवडून येऊ नये यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप सामंत यांनी यावेळी केला.
या बंडाळीच्या सुरवातीला ठाकरेंच्या सोबत असलेले उदय सामंत धक्कादायकरित्या विरोधकांना जाऊन मिळाले. त्यामुळे उदय सामंत यांच्याविरोधात वातावरण गेले, यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी आजही मी शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी, कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असं आवाहनही त्यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72381 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..