
कमलाकर सारंग! बस्, नाम काफी है..
swt2829.jpg
32463
श्रीनिवास नार्वेकर
नाट्यनिपुण सिंधुदुर्ग
कमलाकर सारंग! बस्, नाम काफी है..
- श्रीनिवास नार्वेकर
बंडखोरीचा स्वभाव कोकणी माणसाच्या रक्तातच रुजलेला असतो. बाहेरून फणसासारखा काटेरी असला तरी आतून रसाळ गर्यासारखा गोड असतो कोकणी माणूस. तो जेवढा स्वत:च्या प्राणापलीकडे जीव लावतो, तेवढाच स्वत:च्या जीवावर बेतलेलं असेल, तर प्राणपणानं लढतोही आणि समोरच्याला गारदही करतो. कमलाकर सारंग हे असंच एक नाव. अवघ्या मराठी रंगभूमीला आणि सिंधुदुर्गालाही अभिमान बाळगायला लावणारं!
मालवणच्या समुद्रकिनार्यावरील एक छोटंसं छान टुमदार गाव आणि त्या गावातला सारंग. कमलाकर सारंग. बस्स्, नाम काफी है! एक किस्सा वाचल्याचा आठवतो, नाटकाचं नाव नाही आठवत.. विजया मेहता एका नाटकाची ऑडीशन घेत होत्या. स्पर्धेसाठी त्या एक नाटक करत होत्या. बाईंच्या नाटकात काम करायला मिळणं, म्हणजे अहोभाग्यच. सारंगनाही त्यांच्याकडे काम करायचं होतं. सारंग गेले ऑडीशनला; पण काय झालं कोण जाणे, बाईंनी ऑडीशनमध्ये सारंगना सहजपणे डिस्कार्ड केलं. सारंगना राग येणं साहजीकच. ''बाई एकदा स्वत:हून बोलवतील मला नाटक करायला..'' असं म्हणून सारंग बाहेर पडले. भविष्यात खरोखरच तसं झालं. नंतर केव्हातरी एका नाटकासाठी बाईंनी स्वत:हून बोलावलं सारंगना.
नाटकातला आणि जीवनातला असे दोन्ही लढे सारंग लढत राहिले; पण नाटक सोडलं नाही. प्रसंगी एका क्षणात नोकरी सोडली, पण नाटक नाही सोडलं. नाटकासाठी असे निर्णय घ्यायला प्रचंड आत्मविश्वास आणि असे जुगार खेळण्याची तयारी, दोन्ही लागतं. सारंगमध्ये या दोन्ही गोष्टी होत्या. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे बंडखोरीचा स्वभाव रक्तातच. त्यामुळे प्रत्येक वेळी काही ना काही वेगळं करून पाहण्याची सवय. कमी-अधिकाचा, नफ्या-तोट्याचा विचार न करता आपल्याला आवडणारं किंवा ''मला जे करायचं आहे ते'' नाटक करण्याची वृत्ती.
स्पर्धेची नाटकं, आंतरबँक एकांकिका स्पर्धांसाठीच्या एकांकिका असा बराच व्याप सारंगांच्या नावावर आहे. माझ्या आठवणीप्रमाणे स्पर्धेसाठी ''राणीचा बाग'' नाटक करताना लालन पैंगणकरांशी सारंगांची गाठ पडली आणि हळूहळू पैंगणकरांचा सारंग होण्याचा प्रवास सुरू झाला. मग जोडीनं बरीच नाटकं केली दोघांनी. ''वसू भगत'' नाव घेतल्यावर पटकन एका नाटकाचं नाव समोर येतं, ते म्हणजे ''जंगली कबुतर''. एक उत्तम नाटक, शीर्षकामुळे काहीसा प्रतिकूल परिणाम झाला, पण सारंगांचं दिग्दर्शन आणि निळू फुलेंचा अभिनय यामुळे त्या नाटकाला उत्तम व्यावसायिक कोंदण मिळालं.
घरटे अपुले छान, बेबी, खोल खोल पाणी, रथचक्र, आरोप, सूर्यास्त, लग्न अशी उत्तमोत्तम नाटकं सारंगांच्या दिग्दर्शनामध्ये रंगभूमीवर आली. जयराम हर्डीकर आणि लालन सारंग या दोनच कलाकारांचं सुरेश खरेंचं ‘आरोप’ हे सारंगांनी दिग्दर्शित केलेलं वेगळं नाटक. रथचक्र आणि सूर्यास्तलाही मराठी रंगभूमीच्या इतिहासात वेगळं महत्व आहे. अभिनय असो किंवा लेखन-दिग्दर्शन असो, व्यावसायिक रंगभूमीवर सारंगांनी मोजकी नाटकं केली, पण जी केली ती आजही आपलं वेगळं अस्तित्व राखून आहेत.
''सखाराम बाईंडर'' हे सारंगांच्या आयुष्यातलं एक महत्वाचं पान. त्यांचं अवघं आयुष्य खळबळवून टाकणारं. त्या बाईंडरच्या दिवसांत त्यांनी किती काय काय सोसलं, पण त्यातूनच नाटकासाठीचा एक आदर्शवत् लढा उभा राहिला. व्यावसायिक रंगभूमीवरचं दिग्दर्शक म्हणून सारंगांचं पहिलं नाटक. सुरुवातीचे काही प्रयोग झाल्यानंतर ''बाईंडर''वर बंदी आली, तेव्हा तेंडुलकरांनीही विषय सोडून दिला असताही कदाचित; पण बहुधा कमलाकर सारंग नावाचा लढवय्या रंगकर्मी ठामपणे उभा राहिला आणि बाईंडरचा पुढला इतिहास तर सर्वज्ञात आहे. ''मी बाईंडर लिहिला नसता तर आज सारंग जिवंत असता,'' असं एकदा विजय तेंडुलकर म्हणाले होते. खरंच, सखाराम बाईंडर आलं नसतं, तर कमलाकर सारंग कदाचित अधिक काळ जगले असते आणि कदाचित कमलाकर सारंग, विजय तेंडुलकर, सखाराम बाईंडर, निळू फुले आणि लालन सारंग यांच्या नावे मराठी रंगभूमीवर निर्माण झालेला लढा आणि इतिहास कदाचित निर्माणही झाला नसता. बाईंडरच्या निमित्ताने उलगडले गेलेले राजकीय-सामाजिक पदरही कदाचित उलगडले गेले नसते. थोडक्यात ''बाईंडरचे दिवस''ही लिहिलं गेलं नसतं; पण खंत ही की, काही मोजकी मंडळी वगळता बाईंडरच्या लढ्यामध्ये मराठी रंगभूमी कमलाकरच्या पाठीशी फारशी उभी राहिली नाही. चालायचंच...
आजच्या या लेखाचा योग इतका चांगल्या पध्दतीने साधला गेलाय की, आज २९ जून - सारंगचा जन्मदिन आहे. जोपर्यंत मराठी रंगभूमीवर नाटकासाठी लढा देण्याची चर्चा होत राहील, नाटकाच्या भल्यासाठी प्रतिकुलतेच्या विरोधात पाय रोवून प्रतिकार होत राहील, तोपर्यंत ''बाईंडर''चं आणि सारंगचं नाव नक्कीच राहील आणि ते लढा देणार्यांना प्रेरणा देत राहील. आणि हा असा लढा देणारा माणूस आपल्या सिंधुदुर्गातला आहे, हे कांकणभर अधिक अभिमानाचं!
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72410 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..