
रत्नागिरी ः कुख्यात गुंड साहिल काळसेकरचे तुरूंगातून पलायन
32680ः संग्रहीत
........
साहिल काळसेकर चौथ्यांदा तुरूंगातून पळाला!
कुख्यात गुंड मुळचा चिपळूणचा; रत्नागिरी पोलिसांनी लावली फिल्डिंग
रत्नागिरी, ता. २९ ः जिल्ह्यातील कुख्यात गुंड साहिल काळसेकरसह अन्य २ गुंडांनी अमरावतीच्या कारागृहातून मध्यरात्री पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. साहिल काळसेकर अन्य दोन कैद्यांसह पळून गेला आहे. काळसेकर मुळचा चिपळूणचा आहे. तिथे तो येण्याच्या शक्यतेने चिपळूण आणि रत्नागिरी पोलिसांनी फिल्डिंग लावली आहे.
जिल्ह्यात पोलिसांच्या नाकीनऊ आणलेला आणि पोलिसांवर हल्ला करणारा साहिल काळसेकर चिपळूण शहरापासून काही अंतरावर असलेल्या शिरलबन मोहल्ल्यात वास्तव्याला होता. तो मूळचा चिपळूण तालुक्यातील नायशी येथील आहे. नायशी येथील पाणी कर्मचारी घाग याच्या खुनाच्या आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. त्यानंतर त्याने रत्नागिरी येथे पोलिस हवालदार वाजे यांच्यावर चिऱ्याने हल्ला केला होता. त्यानंतर त्याच्या हाताचा चावा घेऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याची वाढती गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याला अमरावती येथे कारागृहात ठेवले होते. तिथे शिक्षा भोगत असताना नुकतेच त्याने पलायन केले असून, तो चिपळूणला येण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.
पसार झालेल्या कैद्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना घाटमधील २ कैदी तर जन्मठेपेची शिक्षा भोगणारा रत्नागिरी जिल्ह्यातील साहिल काळसेकर हा एक कैदी आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. रोशन गंगाराम उईके, सुमित शिवराम धुर्वे आणि जन्मठेपची शिक्षा भोगत असलेला काळसेकर अशी पसार झालेल्या ३ आरोपींची नावे आहेत.
----------------
चौकट
मध्यरात्री नेमकं काय घडलं?
सर्व कैदी झोपेत होते, अशावेळी या तिघांनी पळून जाण्याचा प्लॅन आखला. याची भनक दुसऱ्या कैदांना लागू दिली नाही. शिवाय कारागृह पोलिसांनाही काही कळलं नाही. मध्यरात्री सर्व झोपलेले असताना हे सुरक्षा भिंतीजवळ आले. तिथून त्यांनी सुरक्षा भिंत ओलांडली. त्यानंतर पळून गेले. एवढी मोठी सुरक्षा भिंत असताना ती त्यांनी कशी ओलांडली असेल, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.
..
चौकट
२८ गंभीर गुन्हे
या आधी, तीनवेळा साहिल काळसेकर कारागृहातून पळाला आहे. एकूण २८ गंभीर गुन्हे साहिल काळसेकरवर दाखल असून, त्यामध्ये खून, दरोडे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. साहिलने न्यायालयातही न्यायाधीशांवरही सुनावणीवेळी चप्पल फेकली होती तसेच अनेक लोकांवर हल्ला केल्याचे गुन्हे त्याच्यावर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यामध्ये दाखल आहेत.
..
चौकट
सुरक्षा व्यवस्था काय करत होती
अमरावती मध्यवर्ती कारागृहात मध्यरात्री थरारक घडना घडली. अमरावतीचे मध्यवर्ती कारागृह बंदिस्त आहे. या कारागृहातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तीन कैदी पळून गेले. विशेष म्हणजे कारागृहाच्या भिंतीवरून त्यांनी उड्या मारल्या. त्यामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्था काय करत होती, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ३ कैद्यांनी कारागृह पोलिसांना गुंगारा दिला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72737 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..