
संजय साटमांची राष्ट्रीय वेटलिफ्टींगमध्ये बाजी
L32725
कानपूर ः राष्ट्रीय वेट लिफ्टींग स्पर्धेत मिळालेल्या सुवर्ण व रौप्य पदकासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय साटम.
संजय साटमांची राष्ट्रीय
वेटलिफ्टींगमध्ये बाजी
कानपुरातील स्पर्धा ः सुवर्णासह दोन पदकांची कमाई
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३० ः सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या बॉम्ब शोधक पथकातील ५४ वर्षीय सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय साटम यांनी उत्तरप्रदेश राज्यातील कानपूर येथे पार पडलेल्या वेटलिफ्टींग स्पर्धेतील ९३ किलो गटात सुवर्ण व रौप्य अशी दोन पदके कमावली आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग पोलिस दलात अभिनंदन होत आहे.
उत्तरप्रदेश राज्यातील कानपूर येथे २० ते २२ जून या कालावधीत इंडियन पॉवरलिफ्टींग फेडरेशन व भारतीय ऑलिम्पिक फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीयस्तरावरील वेटलिफ्टींग स्पर्धा झाली. या स्पर्धेत १७ राज्यातील ६०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग जिल्हा बॉम्ब शोधक पथकात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय साटम यांनीही सहभाग घेतला होता. श्री. साटम यांनी ९३ किलो गटात सहभाग घेताना अन इक्युप बेंच प्रेस प्रकारात १२२.०५ किलो वजन उचलून रौप्य पदक मिळविले. तर इक्युप बेंच प्रेस प्रकारात १३५ किलो वजन उचलत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. यापूर्वी छत्तीसगड येथे झालेल्या पॉवरलिफ्टींग स्पर्धेत इक्युप आणि अन इक्युप या दोन्ही प्रकारात त्यांनी दोन सुवर्ण पदके मिळविले आहेत. श्री. साटम हे वेटलिफ्टींगचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सुवर्ण पदके मिळविली आहेत. वर्षात एक किंवा दोन सुवर्ण पदके मिळविण्याचा त्यांचा विक्रम आहे. जिल्ह्याचा आदर्श खेळाडू म्हणून त्यांना यापूर्वी सन्मान मिळाला आहे.
श्री. साटम यांनी जिल्हा पोलिस दलातील बॉम्ब शोधक पथकात सेवा बजावताना हा खेळ जोपासला आहे. यासाठी ते दररोज सिंधुदुर्गनगरी ते देवगड-जामसांडे असा प्रवास करून सराव करतात. त्यांना मुख्य प्रशिक्षक गणेश वायंगणकर व प्रवीण गुरव यांचे मार्गदर्शन लाभत आहे. मुंबई येथील श्री. दरेकर हे त्यांचे मूळ गुरू असून, स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, होम डीवायएसपी श्रीमती गायकवाड यांचे सहकार्य लाभले. आगामी एशियन पॉवरलिफ्टींग, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टींग व ऑल इंडिया पॉवरलिफ्टींग पोलिस या स्पर्धांमध्ये सहभागी होणार असल्याचे श्री. साटम यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72863 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..