सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्रीपदी केसरकर की राणे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

deepak kesarkar and nitesh rane
पालकमंत्रीपदी केसरकर की राणे?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्रीपदी केसरकर की राणे?

ओरोस - उध्दव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने राज्यात सत्ताबदल होणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजप व शिंदे गट सत्तेवर आला आहे; मात्र यामुळे जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलणार आहेत. जिल्ह्यात विरोधात असलेली भाजप सत्तेत येत आहे. सत्तेत असलेली शिवसेना सुद्धा सत्तेत राहणार आहे. परिणामी आता जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? शिवसेनेचे दीपक केसरकर की भाजपचे नितेश राणे? ही चर्चा रंगू लागली आहे.

मुख्यमंत्री असलेल्या ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातील ३९ आमदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र झाल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेने दाखल केलेली याचिका फेटाळल्यानंतर ठाकरे यांनी बुधवारी (ता. २९) रात्री उशिरा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. परिणामी राज्यातील महविकास आघाडी सरकार बरखास्त झाले. परिणामी भाजपला सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये दोन शिवसेनेचे तर एक भाजप आमदार आहेत. शिवसेनेच्या दोन आमदारांतील सावंतवाडीचे आमदार केसरकर शिंदे गटात सहभागी झाले आहेत. दुसरे कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक हे पक्षप्रमुख ठाकरे यांच्या सोबत मूळ शिवसेनेत राहिले आहेत. भाजपचे एकमेव आमदार नितेश राणे हे कणकवली मतदार संघातून निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ आमदारांत राणे हे एकमेव भाजप आमदार आहेत.

भाजप व शिंदे गटाची सत्ता स्थापन झाल्यावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद कोणाकडे राहणार? भाजप की शिंदे गट? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. युतीच्या काळात केसरकर यांनी पाच वर्षे पालकमंत्री म्हणून काम केलेले आहे. तसेच ते शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे त्यांना मंत्री पद मिळण्याची दाट शक्यता आहे. तर तळकोकणातील दोन्ही जिल्ह्यात भाजपचे एकमेव असलेले आमदार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. त्यामुळे राणे यांनाही संधी मिळू शकते? असे बोलले जात आहे. या दोन जिल्ह्यात भाजप वाढविण्यासाठी पक्षाचा पालकमंत्री असणे गरजेचे असल्याचे भाजप कार्यकर्ते बोलत आहेत; मात्र याचवेळी नितेश राणे यांचे वडील नारायण राणे केंद्रात महत्वाच्या खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे एकाच घरात दोन मंत्री पदे दिली जातील का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्याचा विचार करता नारायण राणे गेली सात वर्षे विरोधात आहेत. मागील पाच वर्षे ते काँग्रेस व स्वतःच्या स्वाभिमान पक्षात होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर नितेश राणे भाजपमधून निवडून आले; मात्र याचवेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. त्यामुळे जिल्ह्यात राणे यांना विरोधात राहावे लागले; मात्र साडे सात वर्षांनी राणे सत्तेत येणार आहेत. गेल्या साडेसात वर्षात केसरकर व राणे यांच्या राजकीय वैर खूपच वाढले आहे. एकमेकांचे खच्चीकरण करण्यात दोन्ही बाजूने तसू भरही कसर सोडण्यात आलेली नाही. एकमेकांना कायम कोंडीत पकडण्यात आले आहे; मात्र त्यांनाच आता मांडीला मांडी लावून बसावे लागणार आहे.

दोघांपैकी कोणीही पालकमंत्री झाला तरी त्यांना एकमेकांशी जुळवून घ्यावे लागणार आहे. एकमेकांना पाण्यात पाहणारे हे दोन्ही आमदार सत्ता स्थापन झाल्यावर कोणती भूमिका घेणार? याकडे राजकीय लक्ष राहिले आहे; मात्र याचवेळी गेल्या साडेसात वर्षात राज्यातील सत्तेच्या माध्यमातून मूळ शिवसेनेत राहिलेले वैभव नाईक यांनी आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला आहे; मात्र त्यांना आता विरोधात बसावे लागणार आहे. दरम्यान, जिल्ह्याचे पाकमंत्री कोण होतात? केसरकर की राणे? यावरून जिल्ह्यातील राजकीय स्थिती ठरणार आहे.

संघटना पातळीवर होणार बदल?

शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्याची झळ जिल्ह्यातील शिवसेनेला बसली आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेनेच्या संघटनेत बदल होणे अटळ आहे; मात्र ते किती प्रमाणात होणार ? यासाठी किती काळ लागेल? याचे उत्तर येणारा काळच देणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72870 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top