
निकृष्ट गव्हाचे वितरण थांबवा
निकृष्ट गव्हाचे वितरण थांबवा
गोपाळ गवस ः धान्य ऑफलाईन वितरीत करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
साटेली भेडशी, ता. ३० ः मोर्ले, केर, मांगेली, घोटगे या गावातील शिधापत्रिका धारकांना ऑफलाईन धान्य वितरीत करावे आणि निकृष्ट काळ्या गव्हाचे वितरण थांबवावे, अशी मागणी मोर्लेचे माजी सरपंच गोपाळ गवस यांनी दोडामार्ग तहसीलदार आणि पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, दोडामार्ग तालुक्यातील नवीन रेशनिंग दुकान असलेल्या गावामध्ये वितरण करण्याकारिता गेल्या वर्षभरात सुरवात करण्यात आली. त्यानुसार मोर्ले, केर, मांगेली, घोटगे या गावामध्ये देण्यात येणारे धान्य १७ जूनला गोदामातून दुकानात वितरण करण्यात आले. संबंधित दुकानदाराने ऑनलाईन पावत्याही काढल्या; पण दोन दिवसांनी ई-पॉस मशीनवर ऑनलाईन धान्य दिसत नाही. त्यामुळे धान्य दुकानदारांना धान्य वितरण करणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे त्या-त्या गावातील बरीच कुटुंबे धान्यापासून वंचित राहिली आहेत. दोन गावातील कुटुंबापैकी कोणालाच धान्य वितरीत केलेले नाही. महिना संपायला आला तरी धान्य पुरवठा झालेला नाही. त्याची तत्काळ दखल घ्यावी आणि ऑफलाईन धान्य वितरीत करावे, असे श्री. गवस यांनी म्हटले आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तालुक्यांतील कुटुंबांना अगदी निकृष्ट दर्जाचा गहू वितरीत केला जात आहे. काळा झालेला गहू वितरत केला जात आहे. तरी पुढील महिन्यापासून चांगल्या गव्हाचा पुरवठा करावा; अन्यथा तो गहू स्वीकारला जाणार नाही. तरी वरीलप्रमाणे दोन्ही मागण्यांचा विचार करावा असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72872 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..