
मंडणगड ः पाचरळ येथील घराचे अतिवृष्टीने नुकसान
Rat३०p३.jpg
L३२७१०
ः पाचरळ ः पावसाने दत्ताराम चव्हाण यांच्या घराची झालेली पडझड.
........
अतिवृष्टीने पडझड, शेतीच्या कामांची गडबड
पाचरळ येथील घराचे दीड लाखांचे नुकसान; पाऊस सुरूच, लावणीच्या कामांना वेग
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३० ः गेल्या दोन दिवसापांसून तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, काही ठिकाणी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. तालुक्यातील पाचरळ येथे दत्ताराम गोविंद चव्हाण यांच्या घराची पडझड झाली. यामध्ये १ लाख ४९ हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे.
बाणकोट मार्गावरील मालेगाव-नायनेदरम्यान रात्री अकराच्या सुमारास भला मोठा दगड आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. जेसीबीने तो दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. २९ जूनला मंडणगड तालुक्यात सरासरी ८१ मिलीमीटर इतका पाऊस झाला असून, तालुक्यात एकूण ४८१ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पाणथळ खलाटी भागात शेतकरी भातलावणी करण्याच्या कामाकडे वळला असल्याचे चित्र आहे तर उकारी भागात अजून रोपांची वाढ लावणीयोग्य झाली नाही. नदीनाले प्रवाहित झाले असून, विहिरी तुडूंब भरल्या आहेत. अनेक मार्गावर रस्त्याच्या बाजूला गटारे नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून गेल्याने मातीचा भराव रस्त्यावर जमा झाल्याचे चित्र आहे. त्यातून वाहन चालवताना दुचाकीचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील पूरगाव येथे विहिरीचा कठडा कोसळल्याने ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून, बुधवारी (ता. २९) दिवसभर पावसाचाच होता. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूणसह लांजा, राजापुरात संततधार पाऊस पडत होता. त्यामुळे जगबुडी, वाशिष्ठी, अर्जुना, काजळी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.
जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासात सरासरी १२ मिलीमीटर पाऊस झाला. त्यात मंडणगड २५, दापोली १३, खेड ४, गुहागर ६, चिपळूण ६, संगमेश्वर १३, रत्नागिरी १२, लांजा २२, राजापूर ७ मिमी नोंद झाली. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात मान्सून स्थिरावलेला नव्हता. शेवटच्या टप्प्यात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेतील सरासरीमधील तफावत कमी होऊ लागली आहे.
--------------------------------
चौकट
गतवर्षी ११८१ मि.मी. नोंद होती
१ ते २९ जून या कालावधीत ५८८ मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे तर गतवर्षी ११८१ मि.मी. नोंद होती. ६०० मि.मी. पावसाची तफावत होती. पाऊस अस्थिर असल्यामुळे भातलावणीच्या कामांवर परिणाम झालेला होता. गेले चार दिवस पाऊस सुरूच राहिल्याने लावणीच्या कामांना वेग आला आहे.
..
एक नजर..
चोवीस तासात सरासरी पाऊसः १२ मिलीमीटर
तालुक्यात एकूण पावसाची नोंदः ४८१ मिलीमीटर
मंडणगडमध्ये सर्वाधिकः २५ मिलीमीटर
..
एक दृष्टिक्षेप...
मालेगाव-नायनेदरम्यान रस्त्यावर मोठा दगड; वाहतूक ठप्प
नदीनाले प्रवाहित झाले; विहिरी तुडूंब, पाणी रस्त्यावर
विहिरीचा कठडा कोसळल्याने ८० हजारांचे नुकसान
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72888 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..