चरित्रलेखनाचा मानदंड धनंजय कीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चरित्रलेखनाचा मानदंड धनंजय कीर
चरित्रलेखनाचा मानदंड धनंजय कीर

चरित्रलेखनाचा मानदंड धनंजय कीर

sakal_logo
By

(इये साहित्याचिये नगरी)

rat१p१९.jpg ः
३२८८४
धनंजय कीर
------------
चरित्रलेखनाचा मानदंड धनंजय कीर

‘नामूलं लिख्यते किंचित’ मूलाधार असलेली चरित्रे कशी लिहावी याचा आदर्श म्हणजे धनंजय कीर! धनंजय कीर यांचा जन्म रत्नागिरी येथे २३ एप्रिल १९१३ला झाला. घरची परिस्थिती गरिबीची होती. वडील सुतारकाम करत. त्यामुळे धनंजय कीर सुद्धा आरंभी शिल्पशाळेत स्कूल ऑफ इंडस्ट्रिजमध्ये शिकायला गेले. पुढे इंग्रजी शिक्षणासाठी रत्नागिरी हायस्कूल येथे गेले. या काळातच म्हणजे १९२७ च्या सुमारास त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दर्शन झाले. अंदमानातून सुटका करून १९२३ पासून सावरकरांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले होते. कीर सावरकरांच्या प्रथम दर्शनाने भारावले. आपल्या आत्मचरित्रात ते म्हणतात, ते जे दर्शन माझ्या मनावर ठसले ते अद्यापि स्मृतीत रेंगाळत आहे. ते दर्शन मला मंगलस्फूर्तिदायक व वीरश्रीयुक्त वाटले. सावरकरांना भेटावे, असे वाटले. अखेर पतितपावन मंदिरात भेटले.
हायस्कूलमध्येच त्यांचे इंग्रजी भाषेचे व्याकरण पक्के झाले. रत्नागिरीत त्यांचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने मुंबर्इला आले. विविध ठिकाणी लहान-मोठ्या नोकऱ्या केल्या व अखेर मुंबर्इ महापालिकेच्या शिक्षण विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळाली. कीरांनी लेखनाला सुरवात केली. इंग्रजी अधिक चांगले व्हावे म्हणून दादरच्या फ्री रिडिंग रूममधे वाचायला जात. काशिनाथ धुरू सभागृहातील पुस्तके वाचून काढली. त्या वेळी ''फ्री हिंदुस्थान'' नावाचे इंग्रजी साप्ताहिक निघत असे. कीरांनी या साप्ताहिकात अनेक लेख धनंजय या नावाने लिहिले होते. प्रत्यक्षात त्यांचे नाव अनंत होते; मात्र त्या वेळी न्यायाधीश असलेले व ''अमृतसिद्धि'' नाटकाचे लेखक वसंत शांताराम देसार्इ हे ''धनंजय'' या टोपणनावाने लिहित असल्याने अखेरिस कीरांनी ''धनंजय कीर'' या नावाने लिहायला सुरवात केली. आपण चरित्रलेखन करायचे, असा निश्‍चय करून त्यांनी चरित्र कसे लिहावे यासाठी अनेक पाश्‍चात्य लेखकांनी लिहिलेली चरित्रे अभ्यासली. तत्पूर्वी त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांमुळे त्यांच्यात विश्‍वास निर्माण झाला.
कीरांनी पहिले चरित्र लिहिले ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे! कारण, सावरकर ही व्यक्ती त्यांची आवडती होती. या चरित्रग्रंथासाठी त्यांनी ७०० ते ८०० ग्रंथांचा अभ्यास केला होता. सावरकर चरित्र १९५० साली प्रकाशित झाले. भंडारी ज्ञातीसंस्थेतर्फे त्यांचा या चरित्रग्रंथाबद्दल सत्कार करण्यात आला. धनंजय कीर यांच्यावर जसा सावरकरांच्या जीवनाचा व कर्तृत्वाचा प्रभाव पडला तसाच प्रभाव विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा पडला. १९३६ ला डॉ. बाबासाहेबांच्या हाताचे ठसे घेण्यासाठी कीर त्यांना भेटायला गेले होते. त्या वेळी ''बाबासाहेब हे विश्‍वविख्यात होतील'', असे कीर म्हणाले. विशेष म्हणजे धनंजय कीर हे ज्योतिषशास्त्र जाणणारे होते. त्यांच्या संग्रहात अनेक नामवंत व्यक्तींच्या हाताचे ठसे होते.
बाबासाहेबांच्या चरित्रग्रंथासाठी त्यांनी अनेकांचे उंबरठे झिजवले. १९५४ ला ते प्रसिद्ध झाले. हे चरित्र मराठीत १४ एप्रिल १९६६ ला प्रकाशित झाले. धनंजय कीर १९५४ ला डॉ. बाबासाहेबांना भेटायला गेले होते. तेव्हा बाबासाहेब फार आजारी होते. बाबासाहेब कीरांना म्हणाले ''कीर, महात्मा फुले यांचे चरित्र लिहिण्याचा माझा विचार होता. मला कार्यप्रवण करणारे ते माझे गुरू आहेत; परंतु आता माझी प्रकृती ढासळत असल्यामुळे ते कार्य माझ्या हातून सिद्धीस जार्इल किंवा नाही याची शंका आहे.'' त्यावर धनंजय कीरांनी ''बाबासाहेब आपले हे कार्य आपण पूर्ण करू शकला नाही तर मी तडीस नेण्याचा प्रयत्न करीन,'' असे सांगितले.
बाबासाहेबांना दिलेल्या शब्दाप्रमाणे कीरांनी महात्मा फुले यांचे चरित्र लिहिले. या शिवाय राजर्षी शाहू छत्रपती, लोकमान्य टिळक, कृष्णराव अर्जुन केळूसकर, लोकहितकर्ते बाबासाहेब बोले यांचीही चरित्रे लिहिली. ''कृतज्ञ मी कृतार्थ मी'' हे त्यांचे आत्मचरित्र म्हणजे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आरसा आहे.
भारत सरकारने त्यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेऊन त्यांना ''पद्मभूषण'' पदवी देऊन गौरवले. कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाने १९८० ला ''डॉक्टर ऑफ लेटर्स'' पदवी दिली. सदैव वाचन, आर्थिक ओढाताण असूनही हा अपरांताचा ज्ञानर्षि अखेरपर्यंत लिहित होता. अधू डोळे घेऊन अपुऱ्या जागेत आपल्या ग्रंथालयात लेखनात निमग्न असणारे पद्मभूषण अनंत विठ्ठल तथा धनंजय कीर १२ मे १९८४ ला निधन पावले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मुंबर्इ विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला धनंजय कीर यांचे नाव देऊन कीरांच्या ज्ञाननिष्ठेचा सन्मान केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73164 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top