पांगरी घाटात दरड रस्त्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Landshlip on road in Pangri ghat kokan
पांगरी घाटात दरड रस्त्यावर

पांगरी घाटात दरड रस्त्यावर

देवरूख - बावनदी-देवरूख मार्गाचे रुंदीकरण करताना पांगरी घाटात खोदाई करताना हवे तसे लक्ष देण्यात आले नाही. याचाच फटका कालपासून सुरू असलेल्या पावसात वाहनचालकांना बसला. शुक्रवारी (ता. १ जुलै) सकाळी दरड रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. स्थानिक ग्रामस्थांनी आणि वाहनचालकांनी श्रमदान करून रस्त्यावरची दरड अर्धी बाजूला केली नंतर एकेरी वाहतूक सुरू आहे.

बावनदी ते देवरूख अशा सुमारे २५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेले तीन वर्ष सुरू आहे. यावर्षी पाटगाव घाटी वगळता ते पूर्ण झाले आहे. रस्त्याचे काम दर्जेदार झाले असले तरी गटारांच्या कामाबद्दल ओरड आहे. याच भागात सुमारे ३ किलोमीटरचा पांगरी घाट येतो. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दरी-नदी अशा स्थितीत हा घाट आहे. या घाटात गेली काही वर्षे दोन ते तीन क्रशर सुरू आहेत. त्यामुळे आधीच डोंगऱाचा भाग नरम पडला होता.

या भागात सुरूंग लावण्याचेही प्रकार होतात. परिणामी, डोंगर खचण्याचे प्रकारही वाढले आहेत. अशा स्थितीत दोन वर्षे सुरू असलेल्या रुंदीकरणामुळे डोंगराची मोठ्या प्रमाणात कटाई करण्यात आली. ही कटाई करताना तिरकी होणे गरजेचे होते; मात्र बऱ्याचशा भागात डोंगर सरळ कापण्यात आल्याने याची माती आणि दगड खाली येण्याचा धोका आहे ,असे जाणकार सांगत होते. तेच आज सिद्ध झाले.

संगमेश्वर तालुक्यात गुरुवारपासून पावसाचा जोर आहे. याचाच फटका बसून ही दरड खाली आली. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक मोठी दरड दगडांसह रस्त्यावर आली. यामुळे वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने, या वेळी कोणतेही वाहन आले नसल्याने अनर्थ टळला. स्थानिक ग्रामस्थांनी आणि वाहनचालकांनी श्रमदान करून रस्त्यावरची दरड अर्धी बाजूला केली.

यामुळे एकेरी वाहतूक सुरू झाली तर बांधकाम विभागाचे कर्मचारी आल्यावर जेसीबीच्या साहाय्याने ही दरड पूर्णपणे हटवण्यात आली. आता वाहतूक सुरळीत सुरू असली तरी पावसाचा जोर वाढल्यास अजून दोन ठिकाणी मोठ्या दरडी खाली येण्याची शक्यता आहे. यामुळे घाटातून प्रवास करताना वाहनचालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73255 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..