
खेड-लोटेत पाईपलाईनचे काम संतप्त ग्रामस्थांनी रोखले
अतिरिक्त औद्योगिक वसाहत .......लोगो
....
पाईपलाईनचे काम लोटेत रोखले
एमआयडीसीकडून फसवणूक झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप; काम बेकायदा, पोलिसांकडे पुरावे सादर
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २ : सात वर्षे उलटूनही जमीन मालकांना बदली जमिनीचा सातबारा अथवा कोणतेही कागदपत्र एमआयडीसीने दिली नाहीतच, उलट या ग्रामस्थांच्या जमिनीतून पाईपलाईनचे काम सुरू केल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी सदर काम रोखून धरले. शेतकऱ्यांच्या खासगी मालकीच्या जमिनी घेताना अंमलबजावणी एका दिवसात झाली आणि बदली जमिनीचे कागदपत्र पूर्ण करून शेतकऱ्यांना जमिनींचा ताबा देण्यास यांना सात वर्षे का लागतात, असा सवालही केला.
एमआयडीसीसाठी संपादित न केलेल्या खासगी जागेमधून पाईपलाईन जात असल्यामुळे, एमआयडीसीने त्या जागेतील जमीन मालकांना अदलाबदल पद्धतीमध्ये जमीन देण्याची कबुली दिली. ग्रामस्थांनी परिसरामध्ये उद्योग येतील, परिसराचा विकास होईल, बेरोजगारांना रोजगार मिळेल, या आशेवर व बदली जमीन मिळेल, या आशेने एमआयडीसीला आपल्या जमिनी दिल्या. या दहाही ग्रामस्थांकडून एकाच दिवशी एमआयडीसीने हक्क सोडपत्र करून घेतले व बदली जमीन देण्याचे कबूल केले. मात्र, दिलेला शब्द न पाळता, अचानक एमआयडीसीचे अधिकाऱ्यांनी पोलिस संरक्षणामध्ये काम पूर्ण करण्याचा घाट घातला व तसे पत्र पोलिस अधीक्षक रत्नागिरी यांना दिले. आज लोटे पोलिस दुरक्षेत्रावर सदर ग्रामस्थांना बोलावणे आले व त्यांना याबाबत आपली बाजू मांडण्यास सांगितले. ग्रामस्थांनी खेडच्या पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्यासमोर या विषयातील सर्व पुरावे कागदपत्रांसह सादर केले व शेतकऱ्यांची बाजू मांडली.
..
चौकट
पोलिसांचीही फसवणूक..
ग्रामस्थ एमआयडीसीला कायम सहकार्य करतात. मात्र, एमआयडीसी पोलिस संरक्षणात बेकायदेशररित्या पाइपलाइनच्या कामाची पूर्तता करण्याचा घाट का घालत आहे? एकीकडे एमआयडीसी अधिकारी हे शेतकऱ्यांबरोबर चर्चा करत आहेत. बदली जमिनीचा विषय लवकरात लवकर निकाली काढून कागदपत्रांसह जमिनीचा ताबा शेतकऱ्यांना देण्याबाबत आश्वासने देतात आणि दुसरीकडे पोलिस प्रशासनाकडे आपला खोटेपणा झाकून पाइपलाइनच्या कामासाठी पोलिस संरक्षण मागतात. याचा अर्थ पोलिसांचीही फसवणूक करीत आहे, असा आरोप एमआयडीसी भूमिपुत्र विकास समिती, अतिरिक्त लोटे-परशुरामचे अध्यक्ष हुसैन ठाकूर, कार्याध्यक्ष मनोहर पाडावे, उपाध्यक्ष संदीप चांदीवडे, सदस्य रवींद्र बुरटे, इस्माईल काद्री, श्रीकांत फडकले, गंगाराम इप्ते आदींनी केला.
---------------
चौकट
सहकार्य पोलिसांनाही करू
हुसैन ठाकूर म्हणाले,''आम्ही एमआयडीसीला सहकार्य केले तसेच पोलिसांनाही करू. परंतु कांगावा करून एमआयडीसीचे अधिकारी पोलिस प्रशासनाच्या डोळ्यात धुळ फेक करून संरक्षण मागत असतील आणि शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनीत अतिक्रमण करून पोलिसीबळाचा वापर करून बेकायदेशीररित्या पाईपलाईनचे काम पूर्ण करणार असतील, तर आम्हा शेतकऱ्यांपैकी एकही गप्प बसणार नाही. आम्ही आजवर या विषयात कायदा हाती घेतलेला नाही. यापुढेही कायदेशीर मार्गाने लढू. यातही अपयश आले तर आमच्या प्राण्यांची आहुती देऊ.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73632 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..