निसर्गाचे संकेत ओळखा; दरडीचा टाळा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Identify the signs of nature; Avoid the risk of landslide
रत्नागिरी-दरडी कोसळण्याआधी निसर्गाचा धोक्याचा इशारा

रत्नागिरी : निसर्गाचे संकेत ओळखा; दरडीचा टाळा धोका

रत्नागिरी - गतवर्षी ढगफुटीसारख्या पावसाने महापूर, दरडी कोसळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले होते. या घटनांमुळे बांधित होणाऱ्‍या गावे, वाड्यांना सतर्कसंदर्भातील धडे देण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाकडून हाती घेण्यात आला आहे. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यातील काही क्षेत्र दरडप्रवण आहेत.

जिल्ह्याच्या हद्दीतील आंबा घाट, तिवरे (चिपळूण), अणुस्कुरा घाट यासह खेडच्या पश्‍चिमेकडील सह्याद्री भागात दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. याचा विचार करुनच उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. गेल्या ४ दिवसांत पांगरीत दोनदा, कशेडी घाट, आंबेड, परशुराम घाट दरडी कोसळल्या. हे लक्षात घेता दरड प्रशिक्षणाचे महत्व ध्यानी येते.

सह्याद्री परिसर म्हणजे पर्वतमय, भूकंपप्रवण आणि भरपूर पाऊस पडणारा प्रदेश आहे. भूकंपामुळे किंवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावरील माती आणि खडकांमधील सच्छिद्र भूपृष्ठाला तडे जातात. या तड्यांमध्ये पाणी जाऊन नवीन झरे निर्माण होतात. अखेरीस अतिवृष्टीमध्ये या तड्यांपासून दरडी कोसळतात. तसेच नवीन रस्ते, रेल्वेसाठीचे खोदकाम, बोगद्यांची कामे, खाणकामासाठीचे सुरुंग, शेतीसाठी, घर बांधणीसाठीचे सपाटीकरण, जंगलतोड यामुळेही दरडी कोसळतात.

दरड कोसळणे ही नैसर्गिक आपत्ती असली तरी, ती रोखण्यासाठी आपण उपाययोजना करू शकतो. दरडी थांबण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाय करता येतात. डोंगर भागात अतिक्रमण करू नका, सापटीकरण टाळावे. डोंगर उतारावर बांबू सारख्या वृक्षांची लागवड करणे. पाण्याचा निचरा लवकर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, संरक्षक भिंती आणि जाळ्या बसवणे महत्वाचे ठरेल.

वेळीच ओळखा निसर्गाचा धोक्याचा इशारा
दरडी अचानक कोसळत नाहीत. त्या कोसळण्याआधी निसर्ग आपल्याला धोक्याचा इशारा देत असतो. निसर्गाचा हा इशारा वेळीच ओळखणे गरजेचे आहे. अशी लक्षणे काही वर्षे, काही महिने, काही दिवस एवढेच नाही तर काही तास आधीही स्पष्ट दिसू लागतात. अशी लक्षणे दिसू लागताच गावकऱ्‍यांनी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी सज्ज होणे गरजेचे आहे. दरड साक्षरता कार्यक्रमातून याबाबत जाणीव करून देण्यात आली.

दरड कोसळण्यापूर्वीची सर्वसाधारण लक्षणे

डोंगर उतारांना तडे जाणे
तडे गेलेला भूभाग खचू लागणे
घरांच्या भिंतींना भेगा पडून पडझड
झाडे, विद्युत खांब, कुंपणे कलणे
नवीन झरे निर्माण होणे
जुने झरे मोठे आणि गढूळ पाणी येणे
विहिरींच्या पातळीमध्ये अचानक वाढ

अशा वेळी घडते काय ?
* अतिवृष्टीत झऱ्‍यांची क्षमता वाढणे,
* भात खाचरांना भेगा पडणे
* जमिनीला हादरे बसणे
* संपर्क साधने निकामी होणे
* भिंत कोसळणे, घरांना तडे जाणे
* घरांच्या जमिनीखालून पाणी येणे
* विहीर वाहू लागणे
* बोअरिंगमधून पाणी उसळणे

गावकऱ्‍यांनी काय करावे?
दरड कोसळण्याची लक्षणे दिसू लागल्यास गावकऱ्‍यांनी तातडीने धोक्यापासून दूर होण्याचा विचार करावा. जीव वाचवणे महत्वाचे आहे. हा एकमेव विचार ठेवावा. त्यासाठी तात्पुरत्या स्थलांतरास सज्ज व्हा. त्याची तयारी म्हणून शेती, बँकेची कागदपत्रे, सोने-नाणे, पैसा, औषधे यांची जोडणी करून ठेवावी. प्रथम वृद्ध, आजारी माणसे, लहान मुले तसेच जनावरांना हवलण्यास प्राधान्य दिले पाहिजे.

नागरिक, विद्यार्थ्यांचाही हवा सहभाग
शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थी गावाचा नकाशा प्राप्त करून डोंगर उतारावर दिसलेली दरडींची लक्षणे आणि त्यावर अधारित धोकादायक परिसराचे नकाशे तयार करु शकतात. पुररेषा आखू शकतात. गावाच्या पर्यावरणीय समस्यांबाबत निबंध, पथनाट्य, पोवाडे यांच्या माध्यमातून जनजागृती करून धोकादायक परिसराचे चित्रीकरण करून पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांना पाठवू शकतात.

प्रशासनाचे आवाहन
निसर्गाने दिलेला इशारा वेळीच ओळखून त्यास दिलेला प्रतिसाद हा कुटुंबीयांचेही प्राण वाचवू शकतो. वाड वडिलांपासून रहात असलेले घर कसे सोडू, असा विचार न करता आपले व आपल्या कुटुंबीयांचे प्राण लाख मोलाचे आहेत, ही बाब लक्षात ठेवा. दरडीच्या दुर्घटनांमधील जीवितहानी टाळण्यासाठी सजग रहा, सज्ज व्हा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मानवनिर्मिती कारणेही
निसर्गनिर्मित कारणांसह काही मानवनिर्मिती कारणांमुळेही दरडी कोसळत आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे कशेडी, परशुराम घाटात दरडी कोसळण्याची भीती आहे. तर बावनदी-देवरुख रस्ता रुंदीकरणामुळेही पांगरी पासून काही भागात दरडी कोसळत आहेत. या बाबींचा विचार करुन घाटातील चौपदरीकरणाच्या भागातील धोकादायक गावांमध्येही प्रशासन करडी नजर ठेवून आहे.

कोकण रेल्वेने मिळवले यश

डोंगर-दऱ्‍यातून प्रवास करणाऱ्‍या कोकण रेल्वेला दरवर्षी दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यावर उपाययोजना म्हणून रेल्वे प्रशासनाने ‘व्ही’ शेपमध्ये डोंगर कापले. त्यामध्ये पायर्‍या (स्टेप) तयार केल्या. बोल्डर घरंगळून येऊ नयेत, यासाठी जाळी लावण्याचाही प्रयोग केला.

डोंगरातून येणाऱ्‍या झऱ्,‍यांचे पाणी निचरा होण्यासाठी व्यवस्था केली गेली. माती वाहून जाऊ नये, यासाठी वृक्ष लागवड केली. निवसर सारख्या ठिकाणी वाहतूकीचा मार्ग बदलण्यात आला. गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने केल्या जाणाऱ्‍या प्रयत्नांमुळे गेल्या काही वर्षात दरडी कोसळून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकारांवर अंकुश ठेवण्यात कोकण रेल्वेला यश आले आहे. हाच प्रयोग महामार्गावर शक्य असेल तेथे केल्यास निश्‍चित तो यशस्वी ठरु शकतो.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73772 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..