
सिंधुदुर्ग कॉलेजसाठी आजपासून बसफेऱ्या
विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार
मालवण आगाराकडून दखल; सिंधुदुर्ग कॉलेजसाठी आजपासून बससेवा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ ः येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे तालुक्यातून एसटी बसने येणाऱ्या विद्यार्थ्यांना येथील एसटी स्थानकावर उतरून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी एक किलोमीटरची पायपीट करावी लागते. विद्यार्थ्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी कॉलेजच्या मागणीनुसार येथील एसटी आगाराने सकाळी सातच्या सुमारास दोन बसफेऱ्या थेट महाविद्यालयापर्यंत नेण्याची व्यवस्था केली आहे. ही बसफेरी उद्या (ता. ४) पासून सुरू होणार आहे.
येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात शहरासह तालुक्यातील विविध गावातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. गावातील विद्यार्थी एसटी बसने मालवणात दाखल होत असल्याने एसटी स्थानकावर उतरल्यावर त्यांना एक किलोमीटरची पायपीट करत कॉलेज गाठावे लागते. या प्रकारात कधी गाडी उशिरा आल्याने, तर कधी पायी पोहोचण्यास उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये वेळेत पोहोचणे शक्य होत नाही. विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन कॉलेजच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत यांनी येथील आगाराकडे निवेदन देऊन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कॉलेजपर्यंत बसफेरी ठेवावी, अशी मागणी केली होती. यावर आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, या सुविधेमुळे कसाल-मालवण मार्गावरील गावातून येणारे विद्यार्थी तसेच देवबाग, तारकर्ली, वायरी भूतनाथ या गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसह स्थानकावर पोहोचलेल्य़ा विद्यार्थ्यांना कॉलेजपर्यंत जाण्यास सुलभ होणार आहे. या बसफेरीचा सर्व्हे काल सिंधुदुर्ग कॉलेजपर्यंत एसटी बस नेऊन करण्यात आला. यावेळी कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे सचिव गणेश कुशे यांच्या हस्ते बसफेरीचा प्रारंभ करण्यात आला. ही फेरी उद्यापासून सेवेत दाखल होणार आहे. यावेळी आगारप्रमुख सचेतन बोवलेकर व एसटी कर्मचारी यांच्यासह कॉलेजच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत, प्रा. डॉ. देविदास हरगिले, प्रा. सुमेधा नाईक, प्रा. एम. आर. खोत, प्रा. हसन खान, प्रा. के. के. राबते, प्रा. एस. पी. खोबरे, प्रा. संकेत बेळेकर, प्रा. स्नेहा बर्वे, प्रा. मीलन सामंत, प्रा. हर्षदा धामापूरकर, श्री. कदम, श्री. साळुंखे, श्री. अटक आदी उपस्थित होते.
--
बससेवेच्या वेळा अशा
कसाल येथून सकाळी सहाला सुटणारी कसाल-मालवण बसफेरी व सकाळी साडेसहाला देवबाग येथून सुटणारी देवबाग-मालवण या दोन बसफेऱ्या सकाळी सातच्या सुमारास मालवणात दाखल होतात. या दोन्ही बस फेऱ्या मालवण एसटी स्थानकावरून थेट सिंधुदुर्ग कॉलेजपर्यंत नेण्याची सुविधा आगाराने उपलब्ध करून दिली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73865 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..