
रिक्षाचालकांना लुटणाऱ्या टोळीतील एकास अटक
रिक्षाचालकांना लुटणाऱ्या
टोळीतील एकास अटक
गुजरात पोलिसांकडून घेतले ताब्यात, संशयित मध्यप्रदेशचा
रत्नागिरी, ता. ३ : रिक्षा भाड्याचा बहाणा करून दोन रिक्षाचालकांना प्रसादाच्या नावाखाली लाडूतून गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या मध्यप्रदेशमधील टोळीतील एका संशयिताला शहर पोलिसांनी गुजरात पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
रत्नागिरी शहरातील दोन रिक्षा चालक ११ जून रोजी बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर ही घटना उघड झाली होती. ११ जून रोजी सकाळी ९.३० वाजण्याचा सुमारास बाजारपेठेतून दोन रिक्षा व्यावसायिकांना गणपतीपुळे येथे भाडे असल्याचे सांगून एक टोळके घेऊन गेले. त्यानंतर दोन्ही रिक्षा चालकांचा संपर्क होत नव्हता. नंतर एक रिक्षा चालक दुपारी व एक रिक्षा चालक सायंकाळी परटवणे, उद्यमनगर या ठिकाणी रिक्षातच बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.
या घटनेत आशिष संजय किडये (रा. मांडवी), विनेश मधुकर चौगुले (रा. कसोप) या दोन्ही रिक्षा चालकांच्या अंगावरील सोन्याचे दागिने टोळीतील तिघांनी लांबविले होते. त्यानंतर शहर पोलिसांनी तिघां संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. मात्र टोळीचा थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, गुजरात राज्यात अशाच प्रकारे रिक्षा व्यावसायिकांना लुटणाऱ्या टोळीला तेथील पोलिसांनी अटक केली होती. शहर पोलिसांनी मध्यप्रदेशमधील एका तरुणाला गुजरात पोलिसांच्या ताब्यातून आपल्या ताब्यात घेतले. त्याला उद्या (ता. ३) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या चोरट्याने कबुली दिल्यास या टोळीचे रत्नागिरीसह कोकण रेल्वेतील गुन्हेही उघड होण्याची शक्यता आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73904 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..