दापोलीत योगेश कदमांसाठी संघर्ष अटळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogesh Kadam
चिपळूण - योगेश कदमांचा संघर्ष अटळ

दापोलीत योगेश कदमांसाठी संघर्ष अटळ

चिपळूण - दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार योगेश कदम यांना आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भविष्यात शिवसेना आणि अंतर्गत विरोधकांशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्याकडून खच्चीकरण होत असताना योगेश कदम यांना शिवसैनिकांची वेगळी सहानुभूती होती; पण कदम यांनी बंडखोरी केल्यामुळे आता शिवसैनिकांची त्यांच्याविषयी भूमिका काय असेल, हेही त्यांना तपासून पाहावे लागणार आहे.

तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी योगेश कदम यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचे वेळोवेळी प्रयत्न केले. दापोली मतदारसंघामध्ये माजी आमदार सूर्यकांत दळवी, संजय कदम आणि वैभव खेडेकर हे त्यांचे राजकीय स्पर्धक मानले जातात. त्यांना हाताशी धरूनच योगेश कदम यांचे पंख छाटण्याचे काम परब यांनी केले होते. तेव्हा माजी मंत्री रामदास कदम यांनी अनिल परब यांच्या विरोधात मातोश्रीपर्यंत तक्रारी केल्या; परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती.

दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीवर परब यांनी राष्ट्रवादीच्या मदतीने वर्चस्व मिळवले होते. भविष्यात कदमविरोधी सर्वजण एका व्यासपीठावर आले, तर योगेश कदम यांच्यासाठी राजकीय वाटचाल संघर्षमय असणार आहे. ‘मी मरेपर्यंत भगव्याची गद्दारी करणार नाही’, असे एका बाजूला रामदास कदम सांगत असताना दुसरीकडे त्यांच्या मुलाने शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यामुळे आगामी निवडणुकीत ते कोणता विषय घेऊन मतदारांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर जातील, याची सर्वांना उत्सुकता आहे. योगेश कदम यांनी बंडखोरी केल्याचे समोर आल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते दापोली विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. त्यांना मानणारा कार्यकर्ता अजूनही या मतदारसंघात आहे. बैठका घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांची चाचपणी सुरू केली आहे.

योगेश कदमांसमोर संघर्ष अटळ
आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी योगेश कदम भाजपमध्ये गेले तर उत्तर रत्नागिरी विभागाला त्यांच्या रूपाने युवा चेहरा मिळेल. उत्तर रत्नागिरी भागात भाजपची फरशी ताकद नाही. कदम गट भाजपमध्ये विलीन झाला तर भाजप ग्रामीण भागात नक्कीच बळकट होईल; मात्र राजकारणात केंद्रस्थानी टिकून नेतृत्व करण्यासाठी कदमांचा संघर्ष अटळ आहे.

उत्तर रत्नागिरी भागात शिवसेना कालही भक्कम होती, आजही आहे. लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्यानंतरसुद्धा मी मतदार आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतो. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर मी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. शिवसेनेसाठी वातावरण चांगले असल्याचे मला दिसले. कोणत्याही लोभासाठी पक्षाशी गद्दारी करणारा आमचा कार्यकर्ता नाही, हे भविष्यकाळात स्पष्ट होईल.
- अनंत गीते, माजी खासदार.

संजय कदम यांचा मार्ग मोकळा?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार संजय कदम यांना शिवसेनेत घेऊन त्यांना दापोली मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी कदमविरोधी गटाकडून प्रयत्न सुरू होते, मात्र रामदास कदम यांनी आपले मंत्रिपद पणाला लावून आपल्या पुत्राला विधानसभेची उमेदवारी मिळवली; पण संजय कदम यांच्यासमोर निवडून आणताना रामदास कदम यांना फार संघर्ष करावा लागला होता. अडीच वर्षांनंतर येणाऱ्या निवडणुकीत योगेश कदम यांनी भाजपचे कमळ हातात घेतले, तर संजय कदम यांचा शिवसेनेतील प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74084 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top