सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुवाँधार पावसाने जनजीवन विस्कळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy rains disrupt life in sindhudurg district
पान दोन मेनसाठी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुवाँधार पावसाने जनजीवन विस्कळीत

सावंतवाडी तालुका
सावंतवाडी - तालुक्यात काल (ता.४) सकाळपासून दुपारपर्यंत कोसळलेल्या धुवाँधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. नदी, नाले पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सायंकाळपर्यंत तालुक्यात पाऊस सुरुच होता. ग्रामीण भागात मात्र पूरस्थिती उशिरापर्यंत कायम होती.

तालुक्यात सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत ढगफुटीसारखा पाऊस कोसळल्याने सर्वत्रच नदी, नाले ओसंडून वाहू लागले. सखल भागात पाणी साचल्याने पूरजन्यस्थिती काही गावात दिसून आली. बऱ्याच सखल भागातील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतुक विस्कळीत झाली. होडावडा पूल, आरोस कोंडूरा, सोनुर्ली तिठा, रेवटावाडी, मळगाव सावळवाडी, कारीवडे, निरवडे आदी अनेक गावातील सखल पुले पाण्याखाली गेली.

नदीकाठची शेतीही पूर्णतः पाण्याखाली गेल्याने शेती शिवाराला तळ्याचे स्वरूप आले होते. तळवडे बाजारपेठेत दरवर्षीप्रमाणे पाणी साचले. व्यावसायिकांना याचा फटका बसला. दुकानात पाणी साचल्याने नुकसान झाले. सकाळपासूनच कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने आंबोलीतील मुख्य धबधबा तसेच इतर छोटे मोठे धबधबे पुर्ण क्षमतेने प्रवाहित झाले. मळगाव धबधबाही पुर्ण क्षमतेने वाहू लागला. एसटीचे वेळापत्रक मात्र कोलमडले.

बांद्याला झोडपले
बांदा - बांदा शहर व परिसराला आज दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसाळ्यापूर्वी गटारांची साफसफाई न केल्याने आज झालेल्या मोठ्या पावसात शहरातील सर्व गटारे तुंबून शहरातील रस्ते जलमय झालेत. बांदा-निमजगा रस्ता तब्बल तीन फूट पाण्याखाली गेल्याने बांदा-दाणोली मार्गावरील वाहतूक बंद होती. याठिकाणी असलेल्या परप्रांतिय कामगारांच्या वस्तीत पाणी शिरल्याने एकच हाहाकार उडाला.

स्थानिक प्रशासनाच्या पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने आज आठवडा बाजारासाठी आलेल्या नागरिकांची व भाजी विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. काल (ता.३) रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने तेरेखोल नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. शहरातील निमजगा, जुनी नाबर शाळा, ग्रामपंचायत रस्ता, गडगेवाडी यासह ठिकठिकाणी गटारे तुंबून पाणी रस्त्यावर आल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना कसरत करत पाण्यातून वाट काढावी लागत होती. निमजगा रस्ता तब्बल तीन फूट पाण्याखाली गेल्याने या रस्त्यालगत असलेल्या दुकानात, गॅरेजमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने एकच तारांबळ उडाली.

याठिकाणी परप्रांतिय कामगार वस्तीत तब्बल कमरेपर्यंत पाणी साठल्याने कामगारांचे झोपड्यातील सामान वाहून गेले. पाण्याचा जोर वाढल्याने कामगार झोपडीतील सामान सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी कसरत करत होते. शहरातील ग्रामपंचायत रस्ता, जुनी नाबर शाळा येथील रस्ते देखील गटाराच्या पाण्याखाली गेले होते. पाण्यातून वाहन चालवताना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अनेकजण कसरत करत पाण्यातून वाट काढत होते. बांदा-दाणोली रस्ता निमजगा येथे पाण्याखाली गेला होता. तेरेखोल नदीची पाणी पातळी वाढल्याने शेर्ले येथील जुने कापई पुल पाण्याखाली गेले होते. बांदा-वाफोली रस्त्यावर पाटकर बागेजवळील रस्ता पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक सकाळच्या सत्रात बंद होती. याठिकाणी ओहळाच्या पुराचे पाणी लगतच्या शेतात घुसल्याने शेतकऱ्यांच्या तरव्याचे नुकसान झाले.

बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी गटार व नालेसफाई न केल्यानेच आजची परिस्थिती उद्भवली आहे. शहरातील निमजगा येथील रस्ता हा पावसाळ्यात दरवर्षी पाण्याखाली जातो. याठिकाणी गटार खोदाई करण्याची मागणी होत असूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना व दुकानदारांना जीव मुठीत घेऊन दिवस काढवे लागतात. स्थानिक प्रशासनाने याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.
- शामू धुरी, ग्रामस्थ बांदा-निमजगा.

वैभववाडीत शेतीचे नुकसान
वैभववाडी
- तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून नद्यांनाल्याच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. वैभववाडी रेल्वे स्थानकातील रूळांवर पुराचे पाणी आल्यामुळे वाहतुक विस्कळीत झाली. याशिवाय तालुक्यातील अनेक मार्गावरून पुराचे पाणी वाहत होते. वाभवे परिसरात पुराचे पाणी भातशेतीत शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले. नापणे येथील एका घराच्या अंगणापर्यत पुराचे पाणी पोहोचल्यामुळे त्या कुटुंबाचे स्थंलातर करण्यात आले. वैभववाडी शहरात रस्त्यावरून गुडघाभर पाणी वाहत होते.

तालुक्यात दोन दिवस हलका पाऊस सुरू होता. परंतु, आज पहाटेपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. अकरा वाजल्यानंतर पावसाचा जोर अधिकच वाढला. पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली. वैभववाडी शहरातील रस्त्यावरून गुडघाभर पाणी वाहत होते. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय झाली. मुसळधारेमुळे शुक आणि शांती या दोनही नद्या दुथडी भरून वाहत होत्या. करूळ नदी देखील दुथडी भरून वाहत होती. दरम्यान, कुसुर येथे नदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे येथील वाहतुक विस्कळीत झाली. सोनाळी येथे देखील काही ठिकाणी रस्त्यावर पुराचे पाणी साचले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली.

वाभवे परिसरातील लावणी केलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले. शासकीय विश्रामगृहानजीक लावणी केलेल्या भातशेतीमध्ये पुराचे पाणी साचले होते. भातरोपांवर फुटभर पाणी साचल्यामुळे ही शेती कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाबा मांजरेकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय नारायण मांजरेकर यांच्या भातलावणीत पुराचे पाणी शिरले होते. नापणे येथील विष्णु जैतापकर यांच्या घराच्या अंगणात पुराचे पाणी पोहोचल्यामुळे त्यांचे तत्काळ स्थंलातर करण्यात आले.

वैभववाडी रेल्वे स्थानकात पाणी
वैभववाडी रेल्वे स्थानकात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. येथील रेल्वे रूळावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे वाहतुक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांची चांगलीच कुचंबणा झाली. करूळ आणि भुईबावडा घाटात काही ठिकाणी किरकोळ दगड रस्त्यावर कोसळले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74085 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..