
राजापूर-राजापूर तालुक्याला पावसाने झोडपले
-rat4p42.jpg
33687
ःराजापूरः जवळेथर येथे रस्त्यावर पडलेले झाड.
..
-rat4p43.jpg
22L33688
राजापूर ः पावसाचा जोर ओसरल्याने मूर पाटीलवाडी येथील मोरीवरील पाण्यातून मार्ग काढत सुरक्षितपणे पलिकडे जाणारे विद्यार्थी, ग्रामस्थ.
------------------
राजापूर तालुक्याला पावसाने झोडपले
जामदा नदीच्या पाणीपातळीत वाढ; काजिर्डा, कोळंबकडे जाणारा मार्ग बंद
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ४ ः गेल्या दोन-तीन दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज तालुक्यामध्ये सकाळपासून जोरदारपणे बरसण्याला सुरवात केली. दुपारपर्यंत सातत्याने पडणार्या पावसामुळे तालुक्याच्या पूर्वपरिसरातून वाहणाऱ्या जामदा नदीच्या पाण्यामध्ये काहीशी वाढ झाल्याने संभाव्य पूरस्थितीचा धोका ओळखून नदीकाठावरील मूर सुतारवाडी येथील काही घरांसह दुकानातील साहित्य तात्पुरत्या काळासाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मूर-कोळंब रस्त्यावर मूर पाटीलवाडी येथील मोरी पाण्याखाली गेल्याने काजिर्डा, कोळंब आदी गावांकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे.
दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने जामदा नदीच्या पाणीपातळीमध्ये झालेली वाढ कमी झाली आहे. मूर-कोळंब रस्त्यावरील मोरीमध्ये अडकलेले ओंडके बाजूला करणे आणि जवळेथर रस्त्यावर कोसळलेल्या दरडीची माती बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे काम बांधकाम विभागाने तातडीने हाती घेतल्याची माहिती नायब तहसीलदार दीपाली पंडित यांनी दिली.
आज सकाळपासून पाऊस दुपारपर्यंत जोरदारपणे बरसला. यामध्ये पाचल परिसरातून वाहणाऱ्या जामदा नदीसह शहरातून वाहणार्या अर्जुना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. वाढ होत असल्याचे निदर्शनास येताच नदीकाठावरील घरामधील ग्रामस्थांसह परिसरातील दुकानदारांशी मंडल अधिकारी, ग्रामकृतिदल यांच्यासमवेत संपर्क साधून त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर, घरांसह दुकानातील मालही सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार दुकानदारांसह ग्रामस्थांनी दुपारी घरासह दुकानातील साहित्य अन्यत्र सुरक्षित ठिकाणी हलवल्याची माहिती तलाठी सचिन पाटील यांनी दिली. मूर येथील काही घरांमधील लोकांना तात्पुरत्या काळासाठी स्थलांतरित केले आहे.
...
चौकट
शाळकरी मुले पडली अडकून...
मूर-कोळंब-काजिर्डा रस्त्यावरील मूर पाटीलवाडी येथील मोरीच्या ठिकाणी पाण्यासोबत वाहून आलेले ओंडके अडकल्याने मोरीवरून पाणी वाहू लागल्याने तेथील मार्ग बंद झाला झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून कोळंब, काजिर्डा आदी गावांकडे होणारी वाहतूक थांबली आहे. दुपारनंतर पाऊस कमी झाल्याने मोरीच्या ठिकाणचे काही प्रमाणात पाणी कमी झाले. त्यामुळे रस्त्याच्या पलीकडे अडकून पडलेली शाळकरी मुले यांना ग्रामस्थांसह पालकांनी सुखरूपणे पलीकडे आणण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती मूरचे माजी सरपंच संजय सुतार यांनी दिली; मात्र, सायंकाळी पावसाचा जोर कायम असल्याने पुन्हा मोरीवरील पाणी वाढून रस्ता बंद होण्याची शक्यताही सुतार यांनी वर्तवली आहे.
..
चौकट
पडझड सुरू
दरम्यान, पावसामुळे तुळसवडे येथील जिल्हा परिषद शाळेच्या किचनशेडच्या पत्र्याचे नुकसान झाले आहे तर, पाचल-जवळेथर रस्त्यावर जवळेथर येथे झाड कोसळल्याची घटना घडली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74138 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..