
रत्नागिरी ः समर्थनावरून सेनेते जोरदार खदखद
सेनेच्या तरुण पदाधिकाऱ्याने
भडकावली ज्येष्ठाच्या श्रीमुखात!
रत्नागिरी शिवसेनेत खदखद; मध्यस्थीमुळे वाद टळला
रत्नागिरी, ता. ४ ः राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आणि सत्तापालट झाला. या सर्व राजकीय घडामोडींमुळे रत्नागिरी शिवसेनेचा सर्वसामान्य कार्यकर्ता गोंधळात आणि बुचकळ्यात पडला आहे. उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थक, असे गट पडले आहेत. एकमेकांच्या समर्थनार्थ शिवसैनिकच शिवसैनिकाच्या विरोधात उभा ठाकला असून, संघर्ष हाणामारीपर्यंत पोचला आहे. यातून जुन्या समर्थकाने ७ वर्षांपूर्वी सेनेत आलेल्या समर्थकाला चिथावले. यातून वाद झाला. त्यामध्ये ज्येष्ठाच्या श्रीमुखात भडकावली. या घटनेने राजकीय वातावरण चांगलेच तापले. मोठा राडा होण्याची शक्यता होती; परंतु जाणत्या नेत्यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद तूर्तास तरी टळला.
तालुक्यात शिवसेनेची मोठी ताकद होती. त्यात उदय सामंत सेनेत दाखल झाल्याने ही ताकद दुप्पट झाली. जुने आणि नवे एकत्र आल्याने सेनेला आता प्रतिस्पर्धीच राहिलेला नाही; परंतु गेल्या काही दिवसांपासून सेनेत मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने सेनेतील ४० आमदार सत्तेतून बाहेर पडून त्यांनी वेगळा गट तयार गेला. यामध्ये आमदार उदय सामंत यांचा समावेश आहे. या राजकीय घडामोडीमुळे तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बुचकळ्यात पडले. कोणाचे समर्थन करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला.
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे कोणाला निवडावे हे कळत नव्हते. अखेर शिवसेना तालुका कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत ९० टक्के पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना, तर १० पदाधिकाऱ्यांनी सामंतांना समर्थन दिले. शिवसेनेत समर्थनासाठी अंतर्गत स्पर्धा दिसून आली. याचा एका ठिकाणी उद्रेक झाला.
एका जुन्या शिवसैनिकाने ठाकरे समर्थनाबाबत एका नव्या आणि तरुण शिवसैनिकासमोर काही भाष्य केले. हे नव्या सैनिकाला खटकले आणि त्याने रागाच्या भरात त्याच्या श्रीमुखात भडकावली. यातूनच सेनेतील अंतर्गत कलह पुढे आला. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर जुन्या शिवसैनिकांनी त्या नव्या शिवसैनिकाला इंगा दाखवण्यासाठी जवळच्या गावातील त्याचे समर्थक आणले. यामुळे सेनेतेच मोठा राडा होण्याची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे वातावरण गरम झाले. अखेर सेनेतील ज्येष्ठांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि या वादावर पडदा पडला; परंतु याचा मोठा परिणाम सेनेच्या एकजुटीवर झाला आहे. सेनेत पुन्हा नवा-जुना वाद उफाळणार की काय, असा प्रश्न आहे.
..............शेळके...................
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74185 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..