पूर ओसरला तरी धोका कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर ओसरला तरी धोका कायम
पूर ओसरला तरी धोका कायम

पूर ओसरला तरी धोका कायम

sakal_logo
By

33857
खारेपाटण : येथील मच्छीमार्केट परिसर सोमवारी रात्री उशिरापर्यंत पाण्याखाली होता.
33858
खारेपाटण : पाण्याखाली असलेली विजयदुर्ग खाडीलगतच्या परिसरातील भातशेती.
33855
खारेपाटण : येथील बाजारपेठेतील श्री.तळगावकर यांच्या दुकानात अजूनही पाच फुटापर्यंत पाणी आहे.
33856
खारेपाटण : पूरस्थिती ओसरल्‍यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.(सर्व छायाचित्रे : रमेश जामसंडेकर)
---

पूर ओसरला तरीही धोका

खारेपाटणमधील स्थिती; भातशेती अजूनही पाण्याखाली, बाजारपेठेत चिखलाचे साम्राज्य

सकाळ वृत्तसेवा
खारेपाटण, ता. ५ ः पूराने वेढल्या गेलेल्‍या खारेपाटणवासियांना मध्यरात्री बारानंतर दिलासा मिळाला. पहाटे तीन वाजता शहरात आलेले पुराचे पाणी पूर्णतः ओसरले. मात्र, दिवसभर मुसळधार सरी कोसळत असल्‍याने शहरावर पुराची टांगती तलवार कायम राहिली आहे. विजयदुर्ग खाडी भागातील भातशेती मात्र अजूनही पाण्याखाली आहे. आज सकाळपासून येथील बससेवा देखील सुरळीत करण्यात आली. पुराचा धोका टळल्‍याने महामार्गावर नेण्यात आलेल्‍या बसेस पुन्हा बसस्थानकात आणण्यात आल्‍या.
खारेपाटण शहरात काल (ता.४) सायंकाळी सहानंतर अचानक पाण्याचा शिरकाव झाल्‍याने व्यापारी वर्गाची मोठी धावपळ उडाली. रात्री आणखी पाणी येण्याची शक्‍यता असल्‍याने खारेपाटणवासीयांनी रात्र जागून काढली. दशक्रोशीत सायंकाळी सातनंतर पावसाचा जोर कमी होता. रात्रीही पावसाने उसंत घेतली. त्‍यामुळे मध्यरात्री बारानंतर शहरातील पूरस्थिती हळूहळू निवळू लागली. पहाटे तीनला शहरात येणारे दोन्ही मार्ग खुले झाले. त्‍यामुळे व्यापारीवर्गासह नागरिकांना दिलासा मिळाला.
खारेपाटणसह विजयदुर्ग खाडी परिसरातील मुटाट, मणचे, कोर्ले, धालवली, पोंभुर्ले, कुणकवण, बांधीवडे, प्रिंदावन, वाल्‍ये आदी गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या भागातील भात शेती अजूनही पाण्याखाली आहे. दरम्‍यान, खारेपाटणमधील जैनवाडीचा इतर भागाशी संपर्क तुटला होता. सायंकाळी साडेसातनंतर तर मच्छीमार्केट आणि बसस्थानक परिसरातील दुकानांना पाण्याचा वेढा बसला होता. शहरातील अनेक दुकानांमध्ये दोन ते तीन फुटापर्यंत पाणी होते. आज मात्र खारेपाटण शहरातील जनजीवन पूर्ववत झाले; मात्र बाजारपेठेत चिखल आणि घाणीचे साम्राज्‍य होते.
खारेपाटण शहरालगतच्या सुखनदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. सुमारे दहा वर्षापूर्वी येथील गाळ उपसा झाला होता. त्‍यामुळे पुढील पाच-सहा वर्षे खारेपाटण शहरात पुराची समस्या निर्माण झाली नव्हती; मात्र पाच वर्षापासून अतिवृष्टी कालावधीत खारेपाटण शहरात वारंवार पुराची समस्या निर्माण होत आहे. महामार्गावरील नवीन पुल उभारणीवेळी नदीपात्रात बंधारा घालण्यात आला. हा बंधारा काढला नसल्‍याने यंदा नदीचे पात्रही काही प्रमाणात बदलले असून थेट बाजारपेठेत पाणी येण्याचा धोका वाढला आहे.
------------
चौकट
एसटी अलर्ट
रात्री पुराची शक्‍यता असल्‍याने खारेपाटण बसस्थानकातील सर्व बसेस मुंबई-गोवा महामार्गावरील सेवा रस्त्यावर नेऊन ठेवण्यात आल्या होत्या. पूरस्थिती कायम राहिल्यास येथील पिकअप शेडमधून वाहतुकीचे नियोजन करण्याची तयारी एस.टी. महामंडळाने केली होती. रात्री पाणी ओसरल्‍याने आज सकाळी येथील सर्व बसेस पुन्हा बसस्थानकात नेण्यात आल्या आणि बसस्थानकातून वाहतूक पूर्ववत झाली.
------------------
चौकट
दुपारनंतर पाणी पातळीत वाढ
पूरस्थिती ओसरल्‍याने खारेपाटणवासियांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता; मात्र दुपारी दोन वाजल्‍यानंतर विजयदुर्ग खाडीपात्र धोकादायक पातळीवरून वाहू लागले आहे. शहरातील सखल भागात पुन्हा पाण्याचा वेढा पडू लागल्‍याने नागरिकांसह व्यापारांमध्ये पुन्हा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पूराची शक्‍यता असल्‍याने व्यापारी वर्गातून सतर्कता बाळगली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74346 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top