चांदेराई बाजारपेठ पुरमुक्तचे स्वप्नच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांदेराई बाजारपेठ पुरमुक्तचे स्वप्नच
चांदेराई बाजारपेठ पुरमुक्तचे स्वप्नच

चांदेराई बाजारपेठ पुरमुक्तचे स्वप्नच

sakal_logo
By

rat5p22.jpg
33872
रत्नागिरीः आठ दिवसांपुर्वी काजळी नदीच्या किनारी चांदेराई येथे साचवून ठेवलेला गाळ.
rat5p23.jpg
33873
रत्नागिरीः नदीला आलेल्या पुरामुळे गाळ वाहून गेला.
(छायाचित्रः राजेश कळंबटे, सकाळ छायाचित्रसेवा)

चांदेराई बाजारपेठ पुरमुक्तचे स्वप्नच
अर्धवट काम; काढलेला गाळ गेला वाहून
रत्नागिरी, ता. ५ ः काजळी नदी किनाऱ्यावरील चांदेराई येथे गाळ काढण्याचे काम वेळेत न झाल्यामुळे बाजारपेठेवरील पूराचे संकट कायम आहे. गेले दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे काजळी नदीला आलेल्या पुराचे पाणी चांदेराईत भरु लागले होत. त्यामुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले. दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी नेण्याची तयारीही त्यांनी केली होती.
आंबा घाटातून वाहत आलेल्या काजळी नदीचे पात्र दिवसेंदिवस गाळाने भरुन चालले होते. हा गाळ काढला तर बाजारपेठे दरवर्षीच्या पुराच्या संकटातून मुक्त होईल यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील होते. शिवसेनेच्या माजी सभापती देवयानी झापडेकर, महेंद्र झापडेकर यांच्यासह ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार आमदार उदय सामंत यांनी २५ लाख रुपयांची तरतूद जिल्हा नियोजनमधून करुन दिली होती. गाळ काढण्याचे काम पाटबंधारे विभागाकडे होते. गाळ काढण्यासाठी एक पोकलेन ठेवला होता. तो ही सलग काम करत नव्हता. काढलेला गाळ किनाऱ्यावर रचून ठेवला गेला. ९०० मीटर अंतरावरील गाळ काढण्यात येणार होता. पाऊस सुरु होईपर्यंत त्यातील अवघा २०० मीटर गाळ काढला गेला. याबाबत भाजपचे दादा दळी, श्री. झापडेकर यांनी आवाज उठवल्यानंतर काढलेला गाळ भरुन बाहेर टाकण्यासाठी एक डंपर ठेवला गेला. ते काम अपूर्ण राहिल्यामुळे हजारो क्युबीक मीटर गाळ किनाऱ्यावरच राहिला. गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे काजळीला पूर आला आहे. पुराच्या पाण्याबरोबर काढलेला गाळ पुन्हा पात्रात आला आहे. यामध्ये लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.
गाळ काढण्याचे काम सुरु केल्यामुळे चांदेराई बाजारातील व्यावसायिकांनी यंदा पुरमुक्त होण्याची आशा व्यक्त केली होती; परंतु वेळेत काम पूर्ण न झाल्याने गेले दोन दिवस बाजारपेठवासीय पुराच्या भितीने त्रस्त झाले आहेत. सोमवारी सायंकाळी पुराचे पाणी चांदेराई-लांजा मार्गावर आले होते. कालांतराने ते ओसरल्यामुळे नागरिकांनी निःश्‍वास सोडला. मंगळवारी पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे बाजारपेठेत पाणी शिरु लागले होते. भरतीमुळे पाणी वाढत होते. पुराच्या भितीने अनेक व्यावसायिकांनी सामान सुरक्षित ठिकाणी नेण्याची तयारीही केली होती. पुढील तीन महिने पुराची टांगती तलवार चांदेराईवासीयांवर कायम राहणार आहे.

कोट
गाळ वेळेत काढला जावा यासाठी जिल्हा प्रशासनाला निवदेन दिले होते. त्यावर योग्य ती कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे यंदा पुराचा त्रास सहन करावा लागणार आहे.
- महेंद्र झापडेकर, सदस्य, माजी पंचायत समिती

कोट
नदी पात्रातील दहा मीटर खोलीचा गाळ काढणे आवश्यक आहे. अवघा दोनशे मीटर अंतरातील गाळ काढला गेला. तोही किनाऱ्यावर ठेवल्यामुळे पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. याला प्रशासनच जबाबदार आहे.
- दादा दळी, चांदेराई

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74424 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..