
बांद्यात प्रशासनाने अलर्ट रहावे
33929
बांदा ः तेरेखोल नदीपात्राच्या पाहणीस आलेले आमदार आशिष शेलार, नीतेश राणे, राजन तेली, संजू परब, अक्रम खान. सोबत ‘महसूल’चे अधिकारी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
बांद्यात प्रशासनाने ‘अलर्ट’ राहावे
शेलार, राणेंच्या सूचना; पुराच्या पार्श्वभूमीवर तेरेखोल नदीची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ ः बांदा शहर हे पूरप्रवण असल्याने शहरात महसूल व पोलिस प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने २४ तास ‘अलर्ट’ राहावे. पूरस्थिती उद्भवल्यास प्रसंगी स्थानिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत. यासाठी आपत्ती व्यवस्थापनची टीम याठिकाणी कार्यरत ठेवावी. तसेच रेस्क्यूसाठी अतिरिक्त साहित्य लागल्यास द्या, अशा सूचना भाजप नेते तथा आमदार आशिष शेलार व आमदार नीतेश राणे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. तेरेखोल नदीपात्राची पाहणी करत ‘महसूल’च्या अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांची तत्काळ अंमलबजावणी करण्यास सांगितले.
पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार शेलार व राणे यांनी कार्यकर्त्यांसह सायंकाळी बांदा शहराला भेट देत पूरस्थितीची माहिती घेतली. यावेळी सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, ‘महसूल’चे नायब तहसीलदार मनोज मुसळे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, संजू परब, मंडल अधिकारी आर. वाय. राणे, तलाठी वर्षा नाडकर्णी, सरपंच अक्रम खान, शेर्ले सरपंच उदय धुरी, पंच सदस्य जावेद खतीब, राजेश विरनोडकर, तंटामुक्ती अध्यक्ष गुरू सावंत, पोलिस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, मधुकर देसाई, विनेश गवस, शाम सावंत, सुनील धामापूरकर आदी उपस्थित होते.
--
शहरात पूर ‘अलर्ट’ यंत्रणा
प्रांताधिकारी पानवेकर म्हणाले की, बांदा शहर हे पूरबाधित असल्याने प्रशासनाचे येथे पूर्णपणे लक्ष आहे. बांदा शहरात पूर ‘अलर्ट’ यंत्रणा बसविली आहे. पूरस्थितीची माहिती स्थानिकांना मिळावी, यासाठी अलार्म वाजविण्यात येणार आहे. पूर क्षेत्रातील नागरिकांनी घरातील किंवा दुकानातील साहित्य तत्काळ सुरक्षितस्थळी हलवावे. तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. सरपंच खान यांनी बांदा शहरात महसूल प्रशासनाला मदत करण्यासाठी व पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांच्या दोन रेस्क्यू टीम तयार केल्याची माहिती त्यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74436 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..