
म्हैसाळ हत्याकांड
लोगो ः
म्हैसाळ हत्याकांड
...
विषारी गोळ्या देणाऱ्या
मांत्रिकाच्या मित्रास अटक
---
पोलिस कोठडी; मांत्रिकाच्या बहिणीचा शोध सुरू
सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. ४ ः म्हैसाळ (ता. मिरज) येथील हत्याकांड प्रकरणात मांत्रिकास विषारी औषधाच्या गोळ्या देणाऱ्या त्याचा मित्रास पुण्यातून अटक करण्यात आली. मनोज चंद्रकांत क्षीरसागर (वय ४८, रा. तळेगाव दाभाडे, पुणे) असे त्याचे नाव आहे. त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, मांत्रिक अब्बास महंमदअली बागवान (सोलापूर) याच्या बहिणीचा शोध सुरू असून, चार पथके रवाना करण्यात आली आहेत.
अधिक माहिती अशी, की डॉ. माणिक आणि पोपट वनमोरे यांना गुप्तधन शोधण्याचा नाद लागला होता. त्यांच्या संपर्कात सोलापूर येथील मांत्रिक अब्बास बागवान हा होता. ‘गुप्तधन शोधून देतो,’ असे सांगून वेळोवेळी त्याने पैसे उकळले होते. अखेर गुप्तधन मिळत नसल्याने वनमोरे यांनी पैशांसाठी तगादा लावला होता. त्या वेळी मांत्रिकाने या कुटुंबाचा काटा काढण्याचे ठरविले. १९ जूनची तारीख वनमोरे यांना दिली होती. त्यानुसार मांत्रिक बागवान व त्याचा चालक धीरज सुरवसे त्या दिवशी सोलापूरमधून म्हैसाळला आले. रात्री नऊच्या सुमारास डॉ. माणिक यांच्या घरी दोघांनी जेवण केले. डॉक्टर दांपत्यास अकराशे गहू काढून दिले. ते सात वेळा मोजण्यास सांगितले. त्या वेळी विषाच्या गोळ्या मांत्रिकाने आणल्या होत्या. त्यांची पावडर करून ती नऊ बाटल्यांमध्ये आधीच भरलेल्या द्रवात मिसळली. रात्री एकच्या सुमारास पोपट वनमोरे यांचे कुटुंब संपविले. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास डॉ. माणिक यांचे कुटुंब संपवून कृत्य करण्यापूर्वी लिहून घेतलेली चिठ्ठी खिशात ठेवून पसार झाले.
दरम्यान, मांत्रिकाला विषारी औषधाच्या गोळ्या देणारा त्याचा मित्रच असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. तो मूळचा सोलापूरचाच असून, पुण्यात तो प्लॉट देण्या-घेण्याचे काम करतो. त्याने त्या गोळ्या कोठून आणल्या, त्या कोणत्या होत्या, याची माहिती तपासात पुढे येईल. दरम्यान, मांत्रिकाच्या बहिणीचा शोध सुरू आहे. पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तपास करीत आहे.
...
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74509 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..