प्लास्टिक बंदी; व्यापारी आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लास्टिक बंदी; व्यापारी आक्रमक
प्लास्टिक बंदी; व्यापारी आक्रमक

प्लास्टिक बंदी; व्यापारी आक्रमक

sakal_logo
By

34036
कणकवली : येथील नगराध्यक्ष दालनात व्यापारी प्रतिनिधी आणि नगरपंचायत अधिकारी, पदाधिकाऱ्यांची झालेली संयुक्‍त बैठक.


प्लास्टिक बंदी; व्यापारी आक्रमक

कणकवलीत सरसकट कारवाई; नगराध्यक्ष समीर नलावडेंना विचारला जाब

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ६ : शंभर मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या, तसेच कमी जाडीच्या प्लास्टिकचे इतर साहित्‍य आढळलेल्‍या शहरातील अनेक व्यापाऱ्यांवर नगरपंचायतीच्या पथकाने कारवाई केली. यात काही व्यापाऱ्यांकडून प्रत्‍येकी एक हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. त्‍यामुळे आक्रमक झालेल्‍या व्यापाऱ्यांनी आज नगराध्यक्ष दालन गाठले. यानंतर झालेल्‍या चर्चेत शासनाचा नवीन अध्यादेश आल्‍यानंतर आधी जनजागृती केली जाईल आणि नंतरच कारवाईचा विचार करून अशी ग्‍वाही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
केंद्राने १ जुलैपासून १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या तसेच सिंगल युज प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. त्‍याअनुषंगाने कणकवली नगरपंचायतीच्या पथकाने काल (ता.५) शहरातील अनेक व्यापाऱ्यांकडे जाऊन तपासणी केली. यात कमी जाडीचे प्लास्टिक साहित्‍य आढळलेल्‍या व्यापाऱ्यांवर हजार रूपये दंडाची कारवाई करण्यात आली. प्लास्टिक साहित्‍यही जप्त करण्यात आले. नगरपंचायतीच्या या कारवाई विरोधात कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर यांच्यासह राजन पारकर, प्रकाश मुसळे, उमेश सापळे, शेखर गणपत्ये, विशाल हर्णे, श्री. काळगे, सुशील पारकर, लल्लू ताम्हणेकर, नंदू आळवे, बंडू पारकर, बाळा धुपकर, सुनील काणेकर, सचिन चव्हाण, प्रशांत अंधारी, विलास कोरगावकर, राजू वाळके, राजा कामत आदींनी नगरपंचायतीमध्ये येऊन नगराध्यक्ष नलावडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर, अभिजित मुसळे, अॅड.विराज भोसले, नगरपंचायतीचे अधिकारी श्री. सावंत, ध्वजा उचले आदी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांच्यावतीने दीपक बेलवलकर, राजन पारकर आदींनी मुद्दे मांडले. केंद्राने १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली आहे. मात्र, सध्या ७५ मायक्रॉन जाडीच्याच पिशव्या उपलब्‍ध आहेत. इतर प्लास्टिक साहित्‍याची पूर्वीच खरेदी करण्यात आली आहे. तसेच कोल्‍हापूरहून प्लास्टिक पिशव्या व इतर साहित्‍य घेऊन येणारे विक्रेते ७५ मायक्रॉनच्या पिशव्या व इतर साहित्‍य वापरण्यास परवानगी असल्याचे सांगतात. त्‍यामुळे नगरपंचायतीनेच यावर तोडगा काढावा, अशी विनंती केली. ७५ किंवा १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या उत्‍पादीत करणाऱ्यांवर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश मुसळे यांनी केली.
नगराध्यक्ष नलावडे यांनी नगरपंचायत पथकाचे अधिकारी विनोद सावंत यांना बोलावून कारवाईबाबत विचारणा केली. कारवाई करण्यापूर्वी शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेणे आवश्‍यक होते. जनजागृती आधीच कारवाई करणे योग्‍य नाही. कुठल्‍या प्लास्टिक वापरावर बंदी आणि कुठल्‍या प्लास्टिकवर बंदी नाही याबाबतची ठोस माहिती व्यापारी वर्गाला द्या. शासनाकडून आलेले परिपत्रक ही व्यापारी प्रतिनिधींना द्या नंतर कारवाई करा, असेही श्री. नलावडे यांनी कारवाई पथकाला सुनावले. व्यापाऱ्यांच्या बैठकीवेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनीही येऊन मार्गदर्शन केले. यात थर्माकोलचा वापर कोणत्‍याही परिस्थितीत होता नये. गणेशोत्‍सव सजावट व मखर साहित्‍यासाठी कापड किंवा कागदाचा वापरा करा, असेही आवाहन केले. प्लास्टिक बंदीबाबत ज्‍या-ज्‍या वेळी शासनाचे आदेश येतील, त्‍यावेळी त्‍याबाबतची संपूर्ण माहिती व्यापारी वर्गाला दिली जाईल, अशीही ग्‍वाही श्री. तावडे यांनी दिली.
------------
चौकट
‘त्या’ व्यापाऱ्यांची माहिती शासनास
यापुढे बंदी असलेल्‍या प्लास्टिकचा साठा ज्‍या व्यापाऱ्यांकडे आढळेल, त्‍या व्यापाऱ्यांच्या जीएसटी नंबरसह संपूर्ण माहिती शासनाकडे पाठवली जाणार आहे. तसे निर्देश केंद्राकडून आल्‍याची माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली.
------------
कोट
प्लास्टिकचा साठा असणाऱ्या, विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा अधिकार नगरपंचायत पथकासह पोलिसांनाही दिला आहे. शिवाय केंद्र आणि राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळाची पथकेही शहरात केव्हाही येऊन तपासणी करून दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करू शकतात.
- अवधूत तावडे, मुख्याधिकारी, कणकवली

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74611 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..