
बहुगुणी कुळीथ
लोगो ः कृषी संस्कृती (३० जून रोजी टुडे ४ वर प्रसिद्ध)
-----
55823
कुळीथ
---
34045
डॉ. विलास सावंत
बहुगुणी कुळीथ
कुळीथ हे महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. इतर कडधान्य पिकांच्या तुलनेत कुळीथामध्ये भरपूर प्रमाणात लोह व मॉलीब्डेनम असते. कुळीथ पिकाला ‘हुलगा’ असेही म्हटले जाते. कुळीथापासून आमटी, उसळ, पिठी, डांगर, पिठले, पोळा, लाडू, कढण, डाळ, थालीपीठ असे विविध पदार्थ बनविले जातात. कुळीथाच्या सेवनाने वात व कफ कमी होतो. कुळीथ मूतखड्यावर औषधाप्रमाणे काम करतात. तसेच जंतांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. कुळीथ धान्य पोषक घटकांनी भरलेले असते. १०० ग्रॅम कुळीथामध्ये ५७.० टक्के कर्बोदके, २२ टक्के प्रथिने, ५.३ टक्के तंतुमय पदार्थ, ०.५ टक्के स्निग्ध पदार्थ, ३.२ मि.ग्रॅम खनिज, २८७ मि.ग्रॅम कॅल्शियम, ३११ मि.ग्रॅम फॉस्फरस, ७.७७ मि.ग्रॅम लोह व कॅलरीज आदी पोषक घटक असतात.
कोकणामध्ये भात शेतीची कापणी झाल्यावर रब्बी हंगामामध्ये जमिनीच्या अंग लोलीवर किंवा काही ठिकाणी सिंचनाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात कुळीथाची लागवड केली जाते. अतिशय कमी पाण्यावर हे पीक घेता येते. कुळीथ हे कडधान्य मानवाच्या आहारात उत्कृष्ट पोषक अन्न म्हणून वापरले जाते. कुळीथाच्या पिठीला मोठी मागणी आहे. कुळीथ लागवडीमुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. हे पीक द्विदल वर्गातील कडधान्य पीक असून, हवेतील नत्र शोषून ते आपल्या मुळातील गाठीमध्ये स्थिर करते. त्यामुळे जमिनीमध्ये नत्राची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होऊन त्याचा फायदा दुसऱ्या पिकाला होतो. कुळीथ पीक ९० ते १०० दिवसांत तयार होते. या पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव अतिशय कमी प्रमाणात असतो. कोकणात भात लागवडीनंतर ओलाव्यावर कोणतेही रासायनिक खत न वापरता कुळीथ केला जातो. त्यामुळे हे धान्य अतिशय पौष्टिक असते.
हे पीक खरीप हंगामातही घेतले जाते. या पिकाला २१० से. ते ३५० से. तापमान लागते. प्रति हेक्टरी १८ ते २० किलो बियाणे लागते. दोन ओळींमध्ये ३० सें.मी. व दोन दाण्यात १० सें.मी. अंतर ठेवावे. कुळथाची पेरणी १५ ऑक्टोबर ते नोव्हेंबर अखेरपर्यंत करावी. बियांवरील साल टणक असल्यामुळे पेरणीपूर्वी कुळीथ बी रात्रभर पाण्यात भिजत घालावी व दुसऱ्या दिवशी पेरणी करावी. पिकाला पेरणीपूर्वी हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ६० किलो पालाश या अन्नद्रव्यांची मात्रा ओळीत मातीमध्ये चांगली मिसळून द्यावीत. कोकण कृषी विद्यापीठाने ''दापोली १'' ही अधिक उत्पन्न देणारी सुधारीत जात विकसित केली आहे. तसेच सीना व माण या जातींची शिफारस केली आहे. कुळथाला मोड काढणे व भाजणे या प्रक्रियेने त्याची पोषकता व पाचकता अधिक वाढते. या पिकास हलकी व मध्यम, उताराची जमीन चालते. जमिनीतील नत्र स्थिरीकरण व सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी हे पीक उपयुक्त आहे. पूर्व मशागत करताना शेणखत आणि बीज प्रक्रिया करून पेरणी केल्यास उत्पादन वाढते. शेंगा पक्व झाल्यावर पिवळसर रंगाच्या दिसू लागताच व पाने वाळून गळण्यास सुरू झाल्यावर पिकाची सकाळच्या वेळी कापून काढणी करावी. काढणीस उशीर झाल्यास शेंगा तडकून नुकसान होते. पिकांचे अवशेष गुरांसाठी पौष्टिक खाद्य म्हणून वापरले जाते.
- डॉ. विलास सावंत, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74616 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..