
चिपळूण ः आता लढाई बंडखोर विरुद्ध निष्ठावंताची
34552ः संग्रहीत
....
जिल्ह्यात आता लढाई बंडखोर विरुद्ध निष्ठावंत
स्थानिक स्वराज्य संस्थांत सुरवात; बंडखोरांची कृती भाजपला पोषक
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यांत होणार आहेत. या निवडणुकांमध्ये बंडखोर आमदारांना कार्यकर्ते आणि मतदांरासमोर अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे बंडखोरविरुद्ध निष्ठावंत हा सामना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये रंगलेला पाहायला मिळणार आहे.
कोकण हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. आघाडी सरकारच्या दहा वर्षाच्या काळात राष्ट्रवादीने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला; परंतु मतदारांची साथ नेहमीच शिवसेनेला राहिली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर कोकणातून शिवसेना संपली, असे भाकित वर्तवले गेले होते. त्या वेळी शिवसेना काही काळासाठी मागे गेली; परंतु संपली नाही. तशीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीपक केसरकर, रत्नागिरीचे उदय सामंत आणि दापोलीचे योगेश कदम या तीन आमदारांनी शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केली.
नारायण राणे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे होते; परंतु शिवसेनेची सत्ता येणार नाही. त्यामुळे शिवसेनेत राहून मी मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, असे गृहित धरून राणे तेव्हा काँग्रेसमध्ये गेले. यावेळी भाजपला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवायचे होते. त्याचबरोबर शिवसेनाही संपवायची आहे, त्यासाठी भाजपने शिवसेनेत फोडाफोडीचे राजकारण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारले. त्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन आमदार सहभागी झाले. दीपक केसरकर बंडखोरांचे प्रवक्ते झाले. उदय सामंत यांनी वेळ मारून नेण्यासाठी राष्ट्रवादीवर टीका केली. या तिघांनी आम्ही शिवसेनेतच आहोत, असे सांगण्याचा प्रयत्न केला. काही काळ कार्यकर्त्यांनाही तसेच वाटले; परंतु उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि बंडखोरांचा जल्लोष सर्वांनी पाहिला. यापुढे दिवसागणिक शिवसेना आणि बंडखोर आमदारांमधील संघर्ष आणखी तीव्र होत आहे.
...
चौकट
...याचे उत्तर लवकरच मिळेल
बंडखोर आमदारांची कृती शिवसेनाविरोधी आणि भाजपला पोषक असल्याचे दिसते. आमदारांच्या बंडखोरीनंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन आम्ही शिवसेनेसोबत असल्याची साक्ष दिली असताना आता खासदार विनायक राऊत मैदानात उतरले आहेत. त्यांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेण्यास सुरवात केली आहे. जुने कार्यकर्तेही आता सक्रिय झाले आहेत. पैशाने सत्ता आणि सत्तेतून पैसा मिळवत नेहमी राजकारणात केंद्रस्थानी राहण्याचा प्रयत्न करणारे आता कोठे, याचे उत्तर लवकरच मिळेल. त्यामुळे बंडखोरविरुद्ध निष्ठावंत अशी लढाई आता सुरू झाली आहे.
---------------
कोट
आमचा कार्यकर्ता वडापाव खाऊन प्रसंगी दिवसभर उपाशी राहून संघटनेसाठी काम करतो. कार्यकर्त्यांची संघटनेवर निष्ठा आहे. आमच्या कार्यकर्त्यांना हॉटेल, झाडी, हिरवळ याचे अप्रूप नाही. शिवसेना आणि निसर्गाने कोकणला खूप काही दिले असताना तुम्ही गुवाहाटीला शिवसेनेच्या विरोधात का गेलात, याचा जाब कार्यकर्ता बंडखोर आमदारांना विचारल्याशिवाय राहणार नाही.
- विनायक राऊत, खासदार
----------------
चौकट
मतदारांना पटवून द्यावे लागेल
विधानसभा निवडणुकीसाठी अजून अडीच वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. या अडीच वर्षात बंडखोर आमदार राजकारणाच्या केंद्रस्थानी असणार आहेत. आम्ही शिवसेनेत होतो, असे कालपर्यंत सांगणारे बंडखोर आमदार आम्ही शिवसेनाविरोधी का गेलो, हे त्यांना मतदारांना पटवून द्यावे लागणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75312 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..