सिंधुदुर्गात डेंग्युचे रुग्ण वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dengue patients increased in Sindhudurg
टुडे पान एक-सिंधुदुर्गात डेंग्युचे रुग्ण वाढले

सिंधुदुर्गमध्ये डेंग्युचे रुग्ण वाढले

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात साथीचे आजार वाढू लागले असून जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात डेँगूचे १२३ रूग्ण सापडले आहेत. त्यामध्ये जूनमध्ये २३ तर जुलैमध्ये ६३ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, घराजवळील परिसरात पाणी साचू देऊ नये तसेच कोणताही ताप आल्यास तात्काळ शासकीय दवाखान्यात उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर यांनी केले आहे.

जिल्ह्यात जानेवारीपासून डेंग्यूचे १२३ तर हिवतापाचे १८ रुग्ण सापडले असून त्यापैकी डेंग्युचे मेमध्ये ३७, जूनमध्ये २३ तर जुलैत तब्बल ६३ रूग्ण सापडले आहेत. सावंतवाड़ी व दोडामार्ग तालुक्यात डेंग्युची साथ असून तळकट प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात ४७ रूग्ण सापडल्याने तळकट आणि डिंगणे या गावात डेंग्यूची साथ जाहीर करण्यात आली आहे.

या दोन गावाना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, दोडामार्ग गटविकास अधिकारी यांनी भेट देऊन पहाणी केली. त्यांनी खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात फवारणीच्या दोन राउंड पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच डास निर्मूलनाच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत.

मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रूग्ण सापडले, अशा ठिकाणी नियमित सर्वेक्षण पथक कार्यरत ठेवण्यात आले आहे. जिल्हा स्तरावरुन विशेष आरोग्य पथक उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यात साथीच्या रोगांच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत असून पावसाळ्यात घराच्या आजूबाजूला साचणाऱ्या पाण्याच्या डबक्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊ नये, गटारे वाहती रहावी यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. डास अंडी घालतात अशा साचलेल्या पाण्यामध्ये जळके ऑईल टाकण्याच्या तसेच गप्पी मासे सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

डेंग्यूची लक्षणे
डेंग्‍यू हा डासापासून पसरणारा विषाणूजन्‍य आजार आहे. डेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्‍य गंभीर तापाच्‍या लक्षणांसारखीच असतात. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी ही डेंग्‍यू तापाची गंभीर अवस्‍था आहे. याची सुरुवात तीव्र तापाने होते व त्‍याचा सोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात. सुरुवातीच्‍या काही दिवसात याची लक्षणे साध्‍या तापासारखी असतात व क्‍वचित त्‍वचेवर पुरळ दिसून येतात.

आरोग्य यंत्रणा सतर्क
जिल्ह्यात जानेवारीपासून तपासण्यात आलेल्या ६६ हजार ९०० नमुन्यामध्ये १८ हिवतापाचे रूग्ण सापडले. ७५० नमूने तपासले. त्यामध्ये १२३ डेंग्युचे रूग्ण सापडले आहेत. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यात ४१ तर दोडामार्ग तालुक्यात ८२ रूग्ण सापडले आहेत. पावसाळा सुरु झाल्यावर डेंग्युच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून जूनमध्ये २३ व जुलैमध्ये ६३ असे एकुण ८६ रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. आवश्यक औषधसाठा तसेच अळीनाशक कीटकनाशक औषधांचा पुरवठा प्राथमिक आरोग्य केंद्रांना करण्यात आला आहे. आवश्यक त्या ठिकाणी डास निर्मूलनासाठी फॉगिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात डेंग्युची साथ असून सावंतवाड़ी, दोडामार्ग तालुक्यात अधिक रूग्ण सापडले आहेत. आरोग्य यंत्रणा साथ रोखण्यासाठी उपाययोजना करत असली तरी प्रत्येक नागरिकांनी याबाबत खबरदारी घ्यावी. घर परिसरात डास उत्पत्ती होऊ नये, यासाठी पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या. कोणताही ताप आल्यास तात्काळ शासकीय दवाखान्यात उपचार करून घ्यावेत.
- रमेश कर्तस्कर, जिल्हा हिवताप अधिकारी.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75341 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..