
किंजलघर येथे दरड कोसळली
मंडणगड - तालुक्यातील सावित्री खाडी किनारी वसलेल्या किंजलघर येथे दरड कोसळली. त्यामुळे तीन घरांना धोका निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांनी घटनास्थळी भेट देत मार्गदर्शक सूचना करीत तीन घरातील १६ जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले.
सकाळी १० च्या सुमारास दरडीचा काही भाग पावसाच्या पाण्यासोबत खाली आला. सुदैवाने पावसाचा जोर ओसरला असल्याने मोठा अनर्थ टळला. मातीचा भराव घराच्या जवळ स्थिरावला. घटना समजताच तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, गटविकास अधिकारी सुवर्णा बागल, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सकपाळे व महसूल कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी भेट दिली.
परिस्थितीची पाहणी केली असता या ठिकाणी तीन घरांना धोका निर्माण झाला असल्याचे निदर्शनास आले. तस्लिम अयुब ओंबिलकर यांच्या घरातील ६ सदस्य, हसमत महमद शेख३ सदस्य, तन्वीर अयुब ओंबीलकर ७ सदस्य अशा एकूण १६ रहिवाशाना गावातीलच त्यांच्या अन्य नातेवाईक यांच्याकडे आवश्यक सामानासहित सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले. तसेच त्यांना अन्नधान्य किटही देण्यात आले आहे.
पावसाचा जोर वाढल्यास निर्माण होणारा धोका मोठा असल्याने महसूल विभाग याकडे लक्ष लेवून असल्याचे तहसीलदार बेर्डे यांनी सांगितले. सदरचा परिसर हा संवाद क्षेत्राच्या बाहेर येत असल्याने संपर्क होणे अडचणीचे ठरत आहे. तातडीच्या प्राथमिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरड खाली येत असल्याने आणि अतिवृष्टीने डोंगराला भेगा पडल्याने भूगर्भतज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे लागणार असून त्याबाबतची कार्यवाही करण्यात आल्याचे तहसीलदार बेर्डे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75516 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..