शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा
शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा

शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा

sakal_logo
By

पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा
कैलास ढेपेः सहभागासाठी ३१ पर्यंत मुदत
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ९ः शेतीच्या संभाव्य नुकसानीच्या भरपाईसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन येथील तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे यांनी केले आहे. यामध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे.
याबाबत कृषी विभागाच्यावतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, चालूवर्षीच्या खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड रोगापासून नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येते. तालुक्यातील सर्व आठ महसूल मंडळांकरिता भात व नाचणी पिकासाठी योजना लागू करण्यात आलेली आहे. या योजनेत खातेदारांव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना हवामान घटकाच्या व हवामानातील प्रतिकुल परीस्थितीमुळे भात व नाचणी पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किडरोग आदी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि काढणी पश्‍चात होणारे नुकसान या सर्व बाबींकरिता विमा संरक्षण मिळणार आहे. चालू खरीप हंगामाकरिता सहभागाची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र हंगामाच्या आधी किंवा योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी बँकेत सादर करणे अपेक्षित आहे. घोषणापत्र दिलेल्या शेतकऱ्यांना पुढील हंगामाकरिता योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल. पीकविमासाठी अर्ज सादर करताना बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, आधार कार्ड, बँकखात्याची तपशील प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकरी शासनाच्या पीक विमा संकेतस्थळावरून व विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून वैयक्तिकरित्याही योजनेत सहभागी होऊ शकतात. विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उदभवल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहित धरण्यात येईल. विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे क्रमांकानुसार बाधित पीक व क्षेत्राबाबत घटना घडल्यापासुन ७२ तासाच्या आत संबंधित विमा कंपनीस कळविणे आवश्यक राहील.

चौकट
कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा
शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरण्यासाठी अधिक माहितीसाठी आपले गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. शेतकऱ्यांनी भात व नाचणी पिकाची जोखीम कमी करण्यासाठी व पीक विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याकरिता योजनेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75744 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top