बापूसाहेबांनी व्हिएन्ना शहरातील मुक्काम हलवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Footprints of Sindhudurg Bapusaheb Maharaj Part-76
पाऊलखुणा

बापूसाहेबांनी व्हिएन्ना शहरातील मुक्काम हलवला

व्हिएन्ना येथील बापूसाहेब महाराजांचा कुटुंबासह असलेला मुक्काम अनेक गोष्टींमुळे महत्त्वपूर्ण ठरला. येथेच असताना ते ब्रिटिश साम्राज्याच्या नव्या बादशहांना भेटून आले. सावंतवाडी संस्थानच्या दृष्टीने आणखी काय करता येईल, याचा अभ्यासही त्यांनी केला; मात्र राणीसाहेबांची प्रकृती अपेक्षेप्रमाणे सुधारत नसल्याने या मुक्कामावरही काळजीचे ढग कायम होते.

राणीसाहेबांवरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली होती. त्या रुग्णालयातच होत्या. त्याचदरम्यान २१ जानेवारी १९३६ ला ब्रिटिश साम्राज्याचे बादशहा पंचम जॉर्ज यांचे निधन झाल्याची माहिती बापूसाहेब महाराजांना समजली. बादशहांशी महाराजांचे संबंध चांगले होते. ते या बातमीने अस्वस्थ झाले. त्यांनी बादशहांच्या अंत्यविधीला जायचा निर्णय घेतला. हा अंत्यविधी २८ जानेवारीला लंडनमध्ये होणार होता. महाराज २४ जानेवारीला व्हिएन्ना येथून निघाले. दुसऱ्या दिवशी साडेपाचच्या दरम्यान लंडनला पोहोचले. तेथे उतरल्यावर ते लगेचच मिस मॉक्सन यांच्या बहिणीला भेटायला गेले.

शिक्षणासाठी युरोपात असताना ते सुट्टीच्या काळात अगदी घरच्यासारखे त्यांच्याकडे यायचे. महाराजांसाठी त्या मावशीच्या रुपात होत्या. महाराज मॉक्सन यांना ‘ग्रॅनी’ असे म्हणायचे. तर त्यांच्या या बहिणीला ‘आँट बेटी’ या नावाने हाक मारायचे. यावेळी त्यांचे वय ७६ वर्षे होते. महाराजांवर त्यांचे मुलासारखे प्रेम होते. त्यातच महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने मिळविलेली कीर्ती त्यांच्यासाठी अभिमान आणि प्रेम व्दिगुणीत करणारी होती. अचानक महाराजांच्या आगमनामुळे त्यांना अत्यानंद झाला.

दुसऱ्या दिवशी महाराज रे कॅनन होम्स् यांना भेटायला गेले. त्यांच्यावरच महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी होती. आपला विद्यार्थी कर्तृत्वाने मोठा झालेला पाहून त्यांनाही कौतुक वाटले. आपल्या महाविद्यालयीन जीवनातील मित्रमंडळींनाही ते भेटले.

इकडे पंचम जॉर्ज यांच्या निधनानंतर आठवे एडवर्ड यांना पुढचा बादशहा म्हणून घोषित करण्यात आले. त्यांचा स्वागत समारंभ २७ जानेवारीला बकींगहॅम येथील राजवाड्यात होता. त्यांना भेटायला महाराज गेले. त्यांच्याशी झालेली भेटही संस्मरणीय ठरली. दुसऱ्या दिवशी २८ जानेवारीला पंचम जॉर्ज यांचा दफनविधी होता. रिवाजानुसार अंत्ययात्रा सकाळी ९ ते दुपारी साडेतीनपर्यंत चालली. यात ब्रिटिश साम्राज्यातील विविध राजकीय प्रतिनिधी, जगभरातील प्रमुख राष्ट्रांचे वकील, विविध राजघराण्यातील मंडळी हजर होती. अंत्यविधी आटोपल्यानंतर महाराज व्हिएन्ना येथे परतीच्या प्रवासाला निघाले.

२९ जानेवारीला निघून ३० जानेवारीला सायंकाळी पोहोचले. तोपर्यंत राणीसाहेबांना हॉस्पिटलमधून इंम्पिरीयल हॉटेलमध्ये नेण्यात आले होते. आता महाराजांना थोडी उसंत घ्यायला वेळ होता. ते कारखाने, उद्योगधंदे पहायला जाऊ लागले. बर्फावरून फिरण्याचा आनंदही घेत होते. सोबत युवराज आणि हेमलताराजे असायच्या. या फिरण्यामागेसुध्दा अभ्यास असायचा. तेथील एका म्युझियममध्ये ते गेले. त्याच्या डायरेक्टरसोबत ओळख करून घेत पूर्ण माहिती मिळविली. त्या काळात सावंतवाडीमध्ये वेस्ट्रॉप म्युझियम होते. ते वाढविण्याचा त्यांचा विचार होता. ते लोकांना कसे जोडता येईल, याबाबतची चर्चा महाराज त्या डायरेक्टरांसोबत करत होते.

व्हिएन्ना येथील घरगुती उद्योगांबाबतही त्यांनी माहिती घेतली. काही व्यवसाय त्यांनी स्वतः जाऊन पाहिले. सावंतवाडीत लाकडी खेळणी बनवली जायची. त्या अनुषंगाने व्हिएन्ना येथे साधर्म्य असलेले व्यवसाय आहेत का, याची माहिती त्यांनी घेतली. तेथे विविध वस्तू रंगवण्याचे कारखाने असल्याचे त्यांना समजले. ते जाऊन पाहण्याबरोबरच तेथे वापरल्या जाणार्‍या यंत्रसामुग्रीची माहिती त्यांनी घेतली. विशेषतः स्प्रे मशीन त्यांना उपयुक्त वाटली. सावंतवाडी असे मशीन नेऊन सहकारी तत्वावर ते उपलब्ध केल्यास लाकडी खेळण्यांचा व्यवसाय विस्तारेल, अशी कल्पना त्यांनी त्या काळात मांडली. हातमाग व्यवसायही पाहिला. तेथे उपलब्ध तंत्रज्ञान सावंतवाडीत कसे नेता येईल, याचाही अभ्यास त्यांनी केला.

सात-आठ दिवस सगळे ठिक होते; मात्र नंतर राणीसाहेबांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना न्युमोनिया झाला. थंडप्रदेशात हा आजार चिंतेचे कारण असतो. त्यातच शस्त्रक्रियेमुळे राणीसाहेबांची प्रकृती आधीच अशक्त झाली होती. ७ ते १० फेब्रुवारी हा कालावधी खूप चिंतेचा होता. नंतर मात्र उतार पडू लागला. राणीसाहेबांची प्रकृती सुधारली; मात्र या सगळ्या दगदगीत महाराज सर्दी पडशाने आजारी पडले. तीन-चार दिवस ते अंथरुणालाच खिळून होते. नंतर तेही बरे झाले. पुन्हा मुलांना घेऊन व्हिएन्ना फिरण्याचा क्रम सुरू झाला.

काही प्रेक्षणीय स्थळे, व्यापारी संस्था यांची माहिती त्यांनी मिळविली. विविध व्यवसायांच्या संघटनांविषयी अभ्यास केला. डेअरी, तंबाखूचा कारखाना, वनखात्याची व्यवस्था आदी पाहण्याचा त्यांचा क्रम सुरू होता. मोठमोठ्या विद्वानांना जेवणासाठी बोलावून ते त्यांच्याशी चर्चा करत. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राविषयी माहिती घेण्यासाठी ते आतुर असायचे. एकुणच हा मुक्काम सावंतवाडी संस्थानच्या दृष्टीने अभ्यासपूर्ण ठरला. संस्थानच्या विकासासाठी आणखी काय करता येईल, याच्या अनेक कल्पना या दौऱ्यातून सुचल्या. असे असले तरी राणीसाहेबांच्या प्रकृतीत हवीतशी सुधारणा होताना दिसत नव्हती. डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली. यावेळी वातावरणाच्या प्रभावामुळे प्रकृतीत वेगाने आराम पडत नसावा, असा त्यांचा निष्कर्ष निघाला. यामुळे इतक्या थंड प्रदेशात राहण्यापेक्षा दक्षिण फ्रान्समध्ये समुद्र किनारी जाऊन राहिल्यास आराम मिळेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यामुळे व्हिएन्नाचा निरोप घेऊन हे कुटुंब फ्रान्समधील कॅन शहराकडे निघाले.

हातमागाला प्रोत्साहन देण्याचे होते स्वप्न
व्हिएन्ना येथील दौऱ्यात महाराजांनी हातमाग व्यवसायाबाबत जास्त अभ्यास केला. त्यांनी संस्थानात शेतकऱ्यांसाठी हातमागाचा जोड धंदा सुरू करण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यात यश आले नव्हते. व्हिएन्नामध्ये हा व्यवसाय बऱ्यापैकी यशस्वी होता. त्याचा महाराजांनी अभ्यास केला. सावंतवाडीत सहकार स्वरुपात हा व्यवसाय वाढवण्याचा त्यांचा विचार होता. यासाठी अनुकुल स्थिती निर्माण करण्याचा विचार त्यांनी सोबत असलेल्या डॉ. जी. के. देशपांडे यांना बोलून दाखवले. सरकारतर्फे काही सवलती देण्याचेही त्यांनी यावेळी ठरवले होते. इच्छा असल्यास डॉ. देशपांडे यांनीही हा व्यवसाय सावंतवाडीत सुरू करावा यासाठी सवलती देण्याचे आश्‍वासन महाराजांनी यावेळी त्यांना दिले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75815 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SindhudurgKokan
go to top